Sunday, February 14, 2021

हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे विरा

एका प्रियकराला प्रियसीला सतत सांगावे लागत असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण संसारात मात्र ते सतत सांगायची गरज न पडू देणे हेच खरे प्रेम आहे. अडीच अक्षराच्या या शब्दावरच सारं जग उभं आहे. आता आपले आपण ठरवायचं इथे बसून राहायचं का उभं राहायचं. तसेही नाती, वय, रंग, भाषा, प्रांत, जात, धर्म, लिंग या सगळ्यांना भेदून ह्रदयावर ताबा मिळवणारी एकमेव गोष्ट जर कोणती असेल तर ती 'प्रेम' आहे. निसर्गाने बहाल केलेला हा जन्मसिद्ध हक्क मर्जीने मिळवण्यासाठी कुणाच्याही एन.ओ.सी ची गरज नसते फक्त दोन ह्रदयाचा निखळ संवाद हवा.
Do Love,
Take Love,
Spread Love.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०२१


बुचाडला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार

अखेर 'बुचाड' लघुचित्रपटाने पुरस्कारावर मोहर उमटवली
आज नॅशनल कमुनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल, तेलंगणा (आंध्रप्रदेश) मध्ये 'बुचाड'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मी शेतकरी वेशात स्वीकारून अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केलाय.

दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडले आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न होता, स्क्रिनिंगच्या वेळेस सर्वांच्या डोळ्यात आलेले पाणी आणि आज मिळालेल्या पुरस्काराने ते अधोरेखित झालंय.

फिल्म फेस्टिव्हल मधील सर्व नामवंत परीक्षकांचे मनापासून आभार, बुचाड च्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या प्रत्येकाचे आभार, इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टीमचे आभार आणि आमच्या सोबत पुरस्कार प्राप्त झालेल्या सहविजेत्यांचे अभिनंदन.

या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय. यातून मिळालेला आत्मविश्वास आणि उत्साह भविष्यात माझ्याकडून अजून दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठीचे कारण ठरेल. दोस्तांनो, आमचे कष्ट आणि तुमच्या शुभेच्छा फळास आल्या. धन्यवाद !

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०२१
स्थळ : झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश)

Friday, February 12, 2021

विचारांची शिवजयंती २०२१

शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थिक सुबत्तेचे धोरण समजून सांगणे ही माझ्या व्याख्यानातली प्राथमिकता असेल.

शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही ना कुणी ईतिहासतज्ञ. मी तर फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करून प्रबोधन करणारा एक सामान्य मावळा आहे.

शिवजयंतीचा हा संपुर्ण सप्ताह दिवसभर वाचन, चिंतन, मनन, प्रवास आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या बळावर प्रबोधनाची मशाल अशीच तेवत राहील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड

Tuesday, February 9, 2021

बुचाड लघूचित्रपटास नामांकन

काल दुपारी मी लेक्चर घेऊन नुकताच ऑफिस मध्ये आलो होतो. सध्या व्याख्यानासाठी नविन नंबर वरून अनेक फोन येत असतात तसाच एका नविन नंबर वरून एक कॉल आला. मी मोबाईल कानाला लावून हॅलो म्हणलो तेवढ्यात तिकडून आवाज आला. "Congratulation ! Mr.Vishal Garad, your film 'Buchad' is Nominated for award in National Community Media film festival at Telangana." खरंतर हे शब्द ऐकून माझ्यातल्या कलाकाराला एवढा आनंद झाला होता की तो चार दोन शब्दात मांडणे कठीण होते. पहिल्याच प्रयत्नाला मिळालेले हे यश स्वतःवरचा विश्वास वाढवणारे ठरलंय. बाकी १३ फेब्रुवारी रोजी झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश) येथे पुरस्काराची घोषणा होणार आहे. इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टिमने घेतलेले कष्ट आणि तुम्हा मायबाप कलारसिकांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर 'बुचाड' १३ तारखेला पुरस्कारावर नक्की नाव कोरेल अशी आशा ठेवुयात, तूर्तास नामांकन मिळालंय हे ही काही कमी नाही. We are hopeful.

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : ९ फेब्रुवारी २०२१


Sunday, January 10, 2021

दुर्दैवी

आईच्या स्तनात दूध भरेल तेव्हा ते प्यायला तिचे लेकरू नसेल, बापाला गोड मुका घ्यावा वाटेल तेव्हा त्याचे लेकरू नसेल. अजून तर कपडेही नव्हते त्यांना घालण्यासाठी नुकतीच बाळुत्यात गुंडाळलेली. त्या आईबापाचे दुःख मोजण्याचे एकक अस्तित्वातच येऊ शकत नाही. जग बघण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस पोटात राहून काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या लेकरांवर काळाचा असा घाला प्रचंड दुर्दैवी आहे. लागलेली आग पाण्याने विझवाल पण लेकरू गमावलेल्या त्या माता पित्याच्या हृदयातली आग कधीच विझणार नाही. भांडाऱ्यातील नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

Wednesday, December 30, 2020

मातीचे शत्रू

बूट आणि सूट मातीपेक्षा कसा काय बरं मोठा असू शकतो पण या असल्या मूर्ख मस्तवाल अधिकाऱ्यांसाठी तो तसा असेलही. जोपर्यंत हे असले कृषीशास्त्रज्ञ रेड कार्पेट टाकलेल्या  वातानुकूलित ऑफिस मध्ये बसून शोध लावत आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांची वाट लागणे स्वाभाविक आहे. जे शास्त्रज्ञ मातीची ऍलर्जी न ठेवता प्रामाणिक काम करतात त्यांचा सदैव अभिमानच राहील पण या असल्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा निषेधच.

अरे ये मातीची लाज वाटणाऱ्या साहेबांनो ! अरे तुम्ही अंगावर घातलेली कापडं ज्या सुतापासून तयार होतात तो कापूस याच मातीत उगवतो रे, तुम्ही जरी बुटाला घाण लागू नये म्हणून तिच्यावर तळवट अंथरला असेल तरी खरी घाण तर तुम्हीच आहात हे सिद्ध केलेत. अरे, तुमच्यासाठी ती फक्त चिखल होणारी 'माती' असेल पण आमच्यासाठी मात्र चिखल झालेल्या आयुष्यातून जगण्याचा कोंब उगवणारी ती 'माता' आहे.

अबे, आमच्या टॅक्स मधून तुम्हाला लाख दिड लाख पगार काय हे असले संशोधन करायला दिला जातोय काय ? अर तुमचे आईबाप याच चिखलात राबले असतील तेव्हा तुमचे शिक्षण पूर्ण झाले असावे. ही फक्त माती नाही तर माता आहे जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटून काम करत जा. मला मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार हे येडपाट अधिकारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शास्त्रज्ञ आहेत. कृषीमंत्री साहेब, घ्या जरा यांची एखादी बैठक आणि विचारा जाब मातीच्या अपमानाचा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३० डिसेंबर २०२०


Monday, December 28, 2020

दिशादर्शक दिग्दर्शक

लक्ष्यात राहतील अशा काही भेटी असतात, दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या निवासस्थानी झालेली आजची भेट त्यापैकीच एक. अक्षयला युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमीचा यंग सिनेमा अवॉर्ड मिळालाय. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या 'स्थलपुराण' या वैशिष्टयपूर्ण चित्रपटाची निवड करण्यात आली.

प्रचंड डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्रात चित्रपट तयार करून जर्मनीतले थेटर हाऊसफुल्ल करणारा. सिनेमाची पारंपारिक चौकट मोडून नव्या चौकटी उभारून त्याला वर्ल्ड सिनेमाची दरवाजे बसवणारा हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडीकर होय. जगावर आपल्या कलेची छाप सोडलेल्या अक्षयच्या हातचा स्पेशल चहा गळ्यात उतरवत उतरवत कानातून त्याने सांगितलेल्या चित्रपट क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टीही उतरवल्या.

जेव्हा केव्हा उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या आणि स्थलपुराण हे मराठी चित्रपट रिलिज होतील तेव्हा ते नक्की पाहा. अक्षयचा उधो उधो जागतिक दर्जाच्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये नेमका का होतो ? याची उत्तरे त्याने लिहून दिग्दर्शित केलेले हे सिनेमे पाहिले की लक्ष्यात येते. दोस्ता तु आजवर केलेले तीन आणि लिहिलेले तीन अशा एकूण सहा चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आता भेटत राहू पुन्हा पुन्हा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २८ डिसेंबर २०२०

सोनवणे सरांना अखेरचा सलाम.

​ सोनवणे सर या जगात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. अभाळाएवढा माणूस पण असा एका क्षणात संपावा हे माझ्या मनाला न पटणारं आणि न सुटणारं कोडं...