Sunday, October 30, 2016

| कष्टमेव जयते ©

आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, प्रतिक ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)

Friday, October 28, 2016

| दिवाळी ©

दिवाळीची उद्या पहिली आंघोळ. आई बहिणींचे हात वर्षात पहील्यांदाच अंगावरून फिरतील. शरीरावर बसलेला मळ काढण्यासाठी अगदी दगडाने घासुन आंघोळ घातली जाईल. ज्वारीच्या पिठाच्या थंड स्पर्शाने शरिरातला थकवाच निघुन जाईल, सुवासिक तेलाच्या मालिशने शरीराला एक चकाकी येईल. उटण्याच्या सुवासाने मन प्रसन्न होईल. असा हा पहिल्या अभ्यंगस्नानाचा अनुभव दरवर्षी सारखाच असतो. नात्यांची वैधता वाढवणारा हा सण प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो तसे  लहाणपणीचा आनंद मात्र दुर दुर जात राहतो. मग घरातल्या लहाणांकडे पाहुण आपले लहाणपण आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही.
मी लहाण असताना शाळा सुटल्यावर घरी येताना गावात फटाकड्याचे दुकान थाटण्यासाठी दुकानदार खड्डे खांदताना दिसले की आनंदाची पहिली उकळी फुटायची. मग आठवडाभर आधी नदीत फिरून महानंदीचे लाकुड, सायकलची तार आणि रबरापासुन एक बंदुक तयार करायची. टिकल्याच्या पाकीटाचा एक बुरूज दोन तिन दिवस सहज जायचा. त्या छोट्याशा टिकलीचा आवाज आजच्या आदली पेक्षाही जास्त आनंद द्यायचा. लवंगी फटाकड्या, लक्ष्मी तोटे, नाग गोळी, भुईचक्कर, झाड, बाण, तुडतुडी, फुलबाज्या हे फटाकडे आवडीचे होते. अॅटमबाॅम्ब फक्त मोठी मुले उडवायची त्यामुळे घरी कितीजरी हट्ट केला तरी अॅटमबाॅम्ब मिळत नसायचा. पहाटे लवकर उठुन आई आम्हाला घासुन पुसुन आंघोळ घालायची पण उठल्यापासुन कधी एकदा नवीन कपडे घालुन, उदबत्ती लावुन फटाकडे उडवतोय असेच व्हायचे. शेणाच्या गवळणी दारात रांगोळी घालुन घातल्या जायच्या; नंदी, पेदा, बैल राखणारी, जात्यावर दळणारी, भाकऱ्या घेऊन जाणारी अशा विविध शेणापासुन तयार केलेल्या गवळण्यांनी अंगण भरून दिसायचं, आकाशदिव्याच्या उजेडात फटाकड्या उडवताना खुप मजा यायची.
फटाके उडवताना प्रदुषण होते, मोठ मोठ्या आवाजांनी कानांना इजा होते, डोळ्यांना त्रास होतो, हात भाजण्याची भिती असते अशा सल्ल्यांपासुन लहाणपण खुप दुर असते. एकदा घेतलेले फटाकडे चार दिवस पुरवायचे आणि त्यातलेच काही तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवायचे ही तारेवरची कसरत असायची. फटाकड्याच्या दुकानात उभे राहुन तासंतास तिथे असलेल्या फटाक्यांवरून नजर फिरवायचा आनंद सुद्धा फटाके उडवण्यासारखाच असायचा.
आजवरच्या दिवाळीत मोठ मोठ्या आवाजांच्या फटाकड्यांपेक्षा लहाण टिकल्यांच्या पाकिटांनीच जास्त आनंद दिलाय. आजही रस्त्यावर जेव्हा टिकल्यांच्या मोकळ्या पडलेल्या डब्या दिसतात, नागगोळी पेटवल्याचे व्रण जेव्हा फरशीवर दिसतात, जुन्या बंदुका जेव्हा लाकडाच्या कपाटात दिसतात तेव्हा लहाणपण अजुनही जिवंत होते. फटाके उडवणे म्हणजेच दिवाळी हि लहाणपणीची व्याख्या हळूहळू बदलू लागते आणि मग हे हरवलेलं बालपण आपल्या लेकरांमध्ये पहायला सुरूवात होते. या दिवाळीत आपले घरं लख्ख दिव्यांनी उजळुन टाका, तुम्ही पाहिलेली स्वप्न त्या प्रकाशात उजळुन टाका, सर्व कुटुंबाला एकत्र घेऊन आपापसातले स्नेहसंबंध असेच वृद्धिंगत करा. आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २८ ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ६ ते ७ वा (दिवाळी पुर्वसंध्या)

Tuesday, October 25, 2016

| अभिप्राय ©

अभिप्राय माणसाला आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणिव करून देतात. काही अभिप्राय आपल्या चुका दाखवणारे असतात तर काही आपले कौतुक करणारे असतात. प्रगतीसाठी हे दोन्ही अभिप्राय महत्वाचे असतात. एखाद्या कलाकाराला अभिप्राय मिळणं हे त्याच्या रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग आहे. आजवर मलाही व्याख्यान संपल्यावर, माझा लेख वाचल्यावर, माझे पुस्तक वाचल्यावर, माझी चित्र पाहिल्यावर रसिक श्रोते आणि वाचकांकडुन नेहमीच अभिप्राय मिळत आले आहेत. माझ्या समृद्धीत त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याच क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या दस्तुर खुद्द व्यक्तीचा अभिप्राय जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो नक्कीच अविस्मरणीय आणि प्रेरणादाई ठरतो. आज असाच माझ्यासाठी समुद्राएवढे विशाल विचार असणाऱ्या माणसाचा मला मिळालेला अभिप्राय तुमच्याशी शेअर करतोय.
महिन्याभरापुर्वी जेष्ठ साहित्यिक श्री.उत्तम कांबळे सर यांची नाशिक येथे भेट घेतली होती. खुप मनमुराद गप्पा मारून त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. त्यांचा प्रत्येक शब्द प्रचंड एकाग्रतेने ह्रदयात साठवला होता. त्या अडीच तासांच्या भेटीत त्यांनी मला शब्दांची आणि विचारांची अविस्मरणीय शिदोरी दिली होती. परंतु त्यांना भेटण्यासाठी मी मात्र भरलेल्या डोक्याने आणि मोकळ्या हातानेच गेलो होतो. माझा "ह्रदयांकित" ह्या काव्यसंग्रहाच्या प्रती उपलब्ध नसल्याने त्यावेळेस मी त्यांना तो देऊ शकलो नाही परंतु मागच्या आठवड्यात तो उपलब्ध करून मी माझी पहिली व छोटीशी साहित्यकृती त्यांना पोस्टाने पाठवली.
परवा त्यांचा अभिप्राय मला पत्र स्वरूपात घरपोच मिळाला. त्यांच्या नावाचा छापील लिफाफा फोडला, लेटर पॅडच्या तिन घड्या घालुन लिफाफ्यात असलेला कागद अलगद बाहेर काढला. घड्या उघडल्या आणि माझे डोळे उत्तम कांबळे सरांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या त्या सोनेरी शब्दांवरून फिरू लागले.

प्रिय विशाल, | स.न (सप्रेम नमस्कार)
तुझा बहुचर्चित काव्यसंग्रह मिळाला. मी आभारी आहे. साहित्य क्षेत्रात तु टाकलेले पहिले पाऊल दमदार आणि अपेक्षा वाढवणारे आहे. तुझ्या भावी प्रवासाला शुभेच्छा !
- उत्तम कांबळे (सही)

त्यांचे हे अनमोल शब्द वाचुन माझ्या आत्मविश्वासासोबत जबाबदारीही वाढली आहे. माझ्या सारख्या जमेल तसं लिहिणाऱ्या आणि सुचेल तसं बोलणाऱ्या एका सर्व सामान्य युवकाकडुन साहित्याच्या मानबिंदुने दर्जेदार साहित्य निर्मितीची अपेक्षा ठेवणे हा माझ्या अभिव्यक्तीचा सन्मान आहे.
प्रिय कांबळे सर, तुमच्यासोबतच तमाम साहित्यरसिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहील.
धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २४ ऑक्टोंबर २०१६

Saturday, October 22, 2016

| अविस्मरणीय SGGS ©

गेल्या आठवडाभरापासुन भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारात स्वतःला गाढुन घेतले होते. ज्या क्षणासाठी हा अठ्ठाहास सुरू होता तो क्षण आज आला. आजपर्यंत लाखो माणसांना संबोधित केले परंतु श्री.गुरू गोबिंद सिंगजी इन्स्टीटुट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नाॅलाॅजी सारख्या नामांकीत संस्थेत एकाचवेळी हजारो इंजिनीअर्सना संबोधित करणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. परंतु अब्दुल कलाम यांच्या विचारांनी आज ते माझे स्वप्न सत्यात उतरवलं होतं. मी काॅलेजवर येतोय हे माहीत झाल्यापासुनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हरएकजण मला गुगल, युट्युबरून आणि फेसबुकवर सर्च करत होता सर्व इंजिनीअर्स असल्याने ते साहजिकच होतं. कदाचित यामुळेच एस.जी.जी.एस च्या कॅम्पस मध्ये पाऊल ठेवायच्या आधीच तेथील तमाम विद्यार्थी मला ओळखु लागले होते. काॅलेजचा विद्यापीठ प्रतिनिधी सतीश रंजवान आणि त्याच्या टिमने डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमच आयोजीत केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी खुप कष्ट घेतले होते.
संस्थेच्या संचालकांसमवेत मी ऑडिटोरीअम मध्ये पाऊल ठेवला तोच हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारा विद्यार्थ्यांचा जनसमुदाय उभा राहुन टाळ्यांचा कडकडाट करू लागला. त्यांच्या या अभिवादनामुळे शरिरात एक वेगळीच उर्जा संचारली, डोळ्यांच्या बाहुल्या रूंदावल्या, टाळ्यांच्या आवाजाने कान तृप्त झाले आणि आत्मविश्वास प्रचंड दुनावला. त्याच गर्दीमधुन सर्वांना हात जोडुन पायऱ्या उतरताना मला आजवर केलेल्या प्रत्येक व्याख्यानाची आठवण झाली. माझ्या विचारांवर व वक्तृत्वावर विश्वास ठेऊन आजवर माझी व्याख्याने आयोजित केलेल्या त्या प्रत्येक आयोजकांची आठवण झाली. कदाचित त्यांच्या पुण्याईनेच आज मी ईथपर्यंत पोहोचलोय.
दिप प्रज्वलन आणि सत्काराची औपचारीकता संपवुन मी थेट माईकसमोर उभा राहीलो. हजारो डोळ्यांशी माझी नजरा नजर होताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. हात उंचावुन तो थांबवुन एक वाक्य बोललो तोच पुन्हा कडकडाट आणि शिट्या. डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम आणि आजचा युवक या विषयावर सलग पावणेदोन तास व्याख्यान दिले. कधी स्वप्न दाखवली, कधी वास्तवाची जाणिव करून दिली तर कधी विचारांच्या प्रवाहात न आलेल्यांना विचार करायला भाग पाडलं. चारचाकी गाडीत बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला सुखोई  विमानात बसण्याचे स्वप्न दाखवले, दुचाकी गाडी बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला फायटर प्लेन बनवण्याचे स्वप्न दाखवले, घर बांधन्याचे स्वप्न पाहणाऱ्याला जगातली सर्वोच्च ईमारत बांधन्याचे स्वप्न दाखवले, फक्त इंजिनीअर व्हायचंय असे स्वप्न पाहणाऱ्याला संशोधक होण्याचे स्वप्न दाखवले. स्वप्न तर ते आधीपासुनच पाहत होते मी फक्त ती थोडी एन्लार्ज केली.
अशा विचारांच्या प्रवाहात तब्बल पावणे दोन तास एवढा वेळ कसा गेला हेच कळले नाही. ऑडिटोरीअमच्या सर्व खुर्च्या हाऊसफुल होऊन शेकडो विद्यार्थी मधल्या पॅसेजमध्ये बसले होते. त्यातुनही उरलेली शेवटी उभे राहीले होते. एका वक्त्यासाठी याहुन मोठे बक्षिस आणि प्रेम दुसरे काहीच असु शकत नाही.
माझे संस्थाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे सरांनी मला आजवर केलेले मार्गदर्शन, आजच्या व्याख्यानानंतर लाभलेला तमाम विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालाजी पाटील यांनी दिलेला पाहुणचार, संचालकांनी दिलेला आदर, गुरूद्वाराची भेट, सेल्फीचा पाऊस, दृष्टी टिमने घेतलेली माझी मुलाखत, मयुर गोफणे आणि रहीमची सोबत; हे सर्वच ह्रदयावर कोरलं गेलंय कधीही न पुसण्यासाठी.
 #Thanks_to_SGGS_Nanded

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २० ऑक्टोंबर २०१६

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...