Tuesday, October 25, 2016

| अभिप्राय ©

अभिप्राय माणसाला आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणिव करून देतात. काही अभिप्राय आपल्या चुका दाखवणारे असतात तर काही आपले कौतुक करणारे असतात. प्रगतीसाठी हे दोन्ही अभिप्राय महत्वाचे असतात. एखाद्या कलाकाराला अभिप्राय मिळणं हे त्याच्या रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग आहे. आजवर मलाही व्याख्यान संपल्यावर, माझा लेख वाचल्यावर, माझे पुस्तक वाचल्यावर, माझी चित्र पाहिल्यावर रसिक श्रोते आणि वाचकांकडुन नेहमीच अभिप्राय मिळत आले आहेत. माझ्या समृद्धीत त्यांचा मोठा वाटा आहे. परंतु आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याच क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या दस्तुर खुद्द व्यक्तीचा अभिप्राय जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तो नक्कीच अविस्मरणीय आणि प्रेरणादाई ठरतो. आज असाच माझ्यासाठी समुद्राएवढे विशाल विचार असणाऱ्या माणसाचा मला मिळालेला अभिप्राय तुमच्याशी शेअर करतोय.
महिन्याभरापुर्वी जेष्ठ साहित्यिक श्री.उत्तम कांबळे सर यांची नाशिक येथे भेट घेतली होती. खुप मनमुराद गप्पा मारून त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. त्यांचा प्रत्येक शब्द प्रचंड एकाग्रतेने ह्रदयात साठवला होता. त्या अडीच तासांच्या भेटीत त्यांनी मला शब्दांची आणि विचारांची अविस्मरणीय शिदोरी दिली होती. परंतु त्यांना भेटण्यासाठी मी मात्र भरलेल्या डोक्याने आणि मोकळ्या हातानेच गेलो होतो. माझा "ह्रदयांकित" ह्या काव्यसंग्रहाच्या प्रती उपलब्ध नसल्याने त्यावेळेस मी त्यांना तो देऊ शकलो नाही परंतु मागच्या आठवड्यात तो उपलब्ध करून मी माझी पहिली व छोटीशी साहित्यकृती त्यांना पोस्टाने पाठवली.
परवा त्यांचा अभिप्राय मला पत्र स्वरूपात घरपोच मिळाला. त्यांच्या नावाचा छापील लिफाफा फोडला, लेटर पॅडच्या तिन घड्या घालुन लिफाफ्यात असलेला कागद अलगद बाहेर काढला. घड्या उघडल्या आणि माझे डोळे उत्तम कांबळे सरांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या त्या सोनेरी शब्दांवरून फिरू लागले.

प्रिय विशाल, | स.न (सप्रेम नमस्कार)
तुझा बहुचर्चित काव्यसंग्रह मिळाला. मी आभारी आहे. साहित्य क्षेत्रात तु टाकलेले पहिले पाऊल दमदार आणि अपेक्षा वाढवणारे आहे. तुझ्या भावी प्रवासाला शुभेच्छा !
- उत्तम कांबळे (सही)

त्यांचे हे अनमोल शब्द वाचुन माझ्या आत्मविश्वासासोबत जबाबदारीही वाढली आहे. माझ्या सारख्या जमेल तसं लिहिणाऱ्या आणि सुचेल तसं बोलणाऱ्या एका सर्व सामान्य युवकाकडुन साहित्याच्या मानबिंदुने दर्जेदार साहित्य निर्मितीची अपेक्षा ठेवणे हा माझ्या अभिव्यक्तीचा सन्मान आहे.
प्रिय कांबळे सर, तुमच्यासोबतच तमाम साहित्यरसिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहील.
धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २४ ऑक्टोंबर २०१६

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...