Friday, October 28, 2016

| दिवाळी ©

दिवाळीची उद्या पहिली आंघोळ. आई बहिणींचे हात वर्षात पहील्यांदाच अंगावरून फिरतील. शरीरावर बसलेला मळ काढण्यासाठी अगदी दगडाने घासुन आंघोळ घातली जाईल. ज्वारीच्या पिठाच्या थंड स्पर्शाने शरिरातला थकवाच निघुन जाईल, सुवासिक तेलाच्या मालिशने शरीराला एक चकाकी येईल. उटण्याच्या सुवासाने मन प्रसन्न होईल. असा हा पहिल्या अभ्यंगस्नानाचा अनुभव दरवर्षी सारखाच असतो. नात्यांची वैधता वाढवणारा हा सण प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो तसे  लहाणपणीचा आनंद मात्र दुर दुर जात राहतो. मग घरातल्या लहाणांकडे पाहुण आपले लहाणपण आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही.
मी लहाण असताना शाळा सुटल्यावर घरी येताना गावात फटाकड्याचे दुकान थाटण्यासाठी दुकानदार खड्डे खांदताना दिसले की आनंदाची पहिली उकळी फुटायची. मग आठवडाभर आधी नदीत फिरून महानंदीचे लाकुड, सायकलची तार आणि रबरापासुन एक बंदुक तयार करायची. टिकल्याच्या पाकीटाचा एक बुरूज दोन तिन दिवस सहज जायचा. त्या छोट्याशा टिकलीचा आवाज आजच्या आदली पेक्षाही जास्त आनंद द्यायचा. लवंगी फटाकड्या, लक्ष्मी तोटे, नाग गोळी, भुईचक्कर, झाड, बाण, तुडतुडी, फुलबाज्या हे फटाकडे आवडीचे होते. अॅटमबाॅम्ब फक्त मोठी मुले उडवायची त्यामुळे घरी कितीजरी हट्ट केला तरी अॅटमबाॅम्ब मिळत नसायचा. पहाटे लवकर उठुन आई आम्हाला घासुन पुसुन आंघोळ घालायची पण उठल्यापासुन कधी एकदा नवीन कपडे घालुन, उदबत्ती लावुन फटाकडे उडवतोय असेच व्हायचे. शेणाच्या गवळणी दारात रांगोळी घालुन घातल्या जायच्या; नंदी, पेदा, बैल राखणारी, जात्यावर दळणारी, भाकऱ्या घेऊन जाणारी अशा विविध शेणापासुन तयार केलेल्या गवळण्यांनी अंगण भरून दिसायचं, आकाशदिव्याच्या उजेडात फटाकड्या उडवताना खुप मजा यायची.
फटाके उडवताना प्रदुषण होते, मोठ मोठ्या आवाजांनी कानांना इजा होते, डोळ्यांना त्रास होतो, हात भाजण्याची भिती असते अशा सल्ल्यांपासुन लहाणपण खुप दुर असते. एकदा घेतलेले फटाकडे चार दिवस पुरवायचे आणि त्यातलेच काही तुळशीच्या लग्नाला शिल्लक ठेवायचे ही तारेवरची कसरत असायची. फटाकड्याच्या दुकानात उभे राहुन तासंतास तिथे असलेल्या फटाक्यांवरून नजर फिरवायचा आनंद सुद्धा फटाके उडवण्यासारखाच असायचा.
आजवरच्या दिवाळीत मोठ मोठ्या आवाजांच्या फटाकड्यांपेक्षा लहाण टिकल्यांच्या पाकिटांनीच जास्त आनंद दिलाय. आजही रस्त्यावर जेव्हा टिकल्यांच्या मोकळ्या पडलेल्या डब्या दिसतात, नागगोळी पेटवल्याचे व्रण जेव्हा फरशीवर दिसतात, जुन्या बंदुका जेव्हा लाकडाच्या कपाटात दिसतात तेव्हा लहाणपण अजुनही जिवंत होते. फटाके उडवणे म्हणजेच दिवाळी हि लहाणपणीची व्याख्या हळूहळू बदलू लागते आणि मग हे हरवलेलं बालपण आपल्या लेकरांमध्ये पहायला सुरूवात होते. या दिवाळीत आपले घरं लख्ख दिव्यांनी उजळुन टाका, तुम्ही पाहिलेली स्वप्न त्या प्रकाशात उजळुन टाका, सर्व कुटुंबाला एकत्र घेऊन आपापसातले स्नेहसंबंध असेच वृद्धिंगत करा. आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा !

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २८ ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ६ ते ७ वा (दिवाळी पुर्वसंध्या)

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...