Saturday, October 22, 2016

| अविस्मरणीय SGGS ©

गेल्या आठवडाभरापासुन भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारात स्वतःला गाढुन घेतले होते. ज्या क्षणासाठी हा अठ्ठाहास सुरू होता तो क्षण आज आला. आजपर्यंत लाखो माणसांना संबोधित केले परंतु श्री.गुरू गोबिंद सिंगजी इन्स्टीटुट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नाॅलाॅजी सारख्या नामांकीत संस्थेत एकाचवेळी हजारो इंजिनीअर्सना संबोधित करणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. परंतु अब्दुल कलाम यांच्या विचारांनी आज ते माझे स्वप्न सत्यात उतरवलं होतं. मी काॅलेजवर येतोय हे माहीत झाल्यापासुनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हरएकजण मला गुगल, युट्युबरून आणि फेसबुकवर सर्च करत होता सर्व इंजिनीअर्स असल्याने ते साहजिकच होतं. कदाचित यामुळेच एस.जी.जी.एस च्या कॅम्पस मध्ये पाऊल ठेवायच्या आधीच तेथील तमाम विद्यार्थी मला ओळखु लागले होते. काॅलेजचा विद्यापीठ प्रतिनिधी सतीश रंजवान आणि त्याच्या टिमने डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमीत्त प्रथमच आयोजीत केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी खुप कष्ट घेतले होते.
संस्थेच्या संचालकांसमवेत मी ऑडिटोरीअम मध्ये पाऊल ठेवला तोच हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारा विद्यार्थ्यांचा जनसमुदाय उभा राहुन टाळ्यांचा कडकडाट करू लागला. त्यांच्या या अभिवादनामुळे शरिरात एक वेगळीच उर्जा संचारली, डोळ्यांच्या बाहुल्या रूंदावल्या, टाळ्यांच्या आवाजाने कान तृप्त झाले आणि आत्मविश्वास प्रचंड दुनावला. त्याच गर्दीमधुन सर्वांना हात जोडुन पायऱ्या उतरताना मला आजवर केलेल्या प्रत्येक व्याख्यानाची आठवण झाली. माझ्या विचारांवर व वक्तृत्वावर विश्वास ठेऊन आजवर माझी व्याख्याने आयोजित केलेल्या त्या प्रत्येक आयोजकांची आठवण झाली. कदाचित त्यांच्या पुण्याईनेच आज मी ईथपर्यंत पोहोचलोय.
दिप प्रज्वलन आणि सत्काराची औपचारीकता संपवुन मी थेट माईकसमोर उभा राहीलो. हजारो डोळ्यांशी माझी नजरा नजर होताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. हात उंचावुन तो थांबवुन एक वाक्य बोललो तोच पुन्हा कडकडाट आणि शिट्या. डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम आणि आजचा युवक या विषयावर सलग पावणेदोन तास व्याख्यान दिले. कधी स्वप्न दाखवली, कधी वास्तवाची जाणिव करून दिली तर कधी विचारांच्या प्रवाहात न आलेल्यांना विचार करायला भाग पाडलं. चारचाकी गाडीत बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला सुखोई  विमानात बसण्याचे स्वप्न दाखवले, दुचाकी गाडी बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला फायटर प्लेन बनवण्याचे स्वप्न दाखवले, घर बांधन्याचे स्वप्न पाहणाऱ्याला जगातली सर्वोच्च ईमारत बांधन्याचे स्वप्न दाखवले, फक्त इंजिनीअर व्हायचंय असे स्वप्न पाहणाऱ्याला संशोधक होण्याचे स्वप्न दाखवले. स्वप्न तर ते आधीपासुनच पाहत होते मी फक्त ती थोडी एन्लार्ज केली.
अशा विचारांच्या प्रवाहात तब्बल पावणे दोन तास एवढा वेळ कसा गेला हेच कळले नाही. ऑडिटोरीअमच्या सर्व खुर्च्या हाऊसफुल होऊन शेकडो विद्यार्थी मधल्या पॅसेजमध्ये बसले होते. त्यातुनही उरलेली शेवटी उभे राहीले होते. एका वक्त्यासाठी याहुन मोठे बक्षिस आणि प्रेम दुसरे काहीच असु शकत नाही.
माझे संस्थाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे सरांनी मला आजवर केलेले मार्गदर्शन, आजच्या व्याख्यानानंतर लाभलेला तमाम विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, बालाजी पाटील यांनी दिलेला पाहुणचार, संचालकांनी दिलेला आदर, गुरूद्वाराची भेट, सेल्फीचा पाऊस, दृष्टी टिमने घेतलेली माझी मुलाखत, मयुर गोफणे आणि रहीमची सोबत; हे सर्वच ह्रदयावर कोरलं गेलंय कधीही न पुसण्यासाठी.
 #Thanks_to_SGGS_Nanded

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : २० ऑक्टोंबर २०१६

1 comment:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...