Friday, February 17, 2017

आमचं दादा ©

गेल्या कित्येक वर्षापासुन प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचं राजकारण दादांनी केलंय. त्यांच्या राजकारणातील समर्पनाला आमच्या खान्दानात तोड नाही. माझ्या पंजोबापासुन सर्वांनी ग्रामपंचायतीच्या पुढं राजकारणच केलं नाही पण दादांनी मात्र तालुक्यावर प्रतिनिधीत्व केलं. निवडणुक कोणतीही असो, त्या बाबतीत ते फार पाॅझीटीव्ह असतात. पांगरी गणातील गावांचा आणि त्या गावातील माणसांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. हर एक गावातल्या चार पाच नेत्यांची नावे त्यांची तोंडपाठ आहेत. गावातल्या प्रत्येक गल्लीत व बोळातला रस्ता त्यांच्या अचुक लक्षात आहे हे मला त्यांच्या सोबत रोज सकाळची घर टु घर प्रचार मोहिम करताना अनुभवायला मिळालं. मी झोपलेलो असतानाच पहाटे पाच वाजता उठुन सहा वाजता दौऱ्यासाठी दादा तयार असतात. त्यांच्या मतदार संघात योणाऱ्या पांगरी, घारी, पुरी, चारे, शिराळा, पाथरी, काटेगांव, बोरगांव, वालवड, पिंपळगांव आणि धामणगांव या गावांपैकी दहा गावांचा प्रचार व सभांचा दौरा त्यांनी यशस्वी पुर्ण केलाय. जेव्हा आपल्याकडं खुप पैसा नसतो, गाड्या नसतात, तेव्हा पायाची चाकं जरा जास्त फिरवावी लागतात असं त्ये म्हणतात. एखादा उमेदवार किती लाखाच्या गाडीत फिरतो यापेक्षा तो सर्वसामान्यांसाठी किती लाखांचा निधी खर्च करतो हे महत्वाचे असते.
दादांच्या उजव्या गुडघ्यावर बेंड झालंय. ऐण प्रचाराच्या रणधुमाळीत ते पिकलंय. किती वेदना होत असतील त्यांनाच ठाऊक पण आराम करा म्हणलं तरी ऐकत नाहीत. मी उमेदवार आहे प्रत्येकाच्या उंबऱ्यावर जाऊन प्रामाणिकपणे मत मागणे माझे कर्तव्यच आहे असे ते सांगतात. मलाही हे आधी माहित नव्हतं पण काल शिराळा आणि पिंपळवाडी या गावचा घर टु घर दौरा आटोपल्यानंतर दादांच्या पँटीवर रक्ताचा डाग दिसला तेव्हा समजलं. तरीदेखील रोज संध्याकाळी घरी येऊन कापसाने ते रक्त दाबुन काढायचे आणि सकाळी पुन्हा तोच कार्यक्रम. दुःख लपवनं हा बापाचा एक गुणधर्मच असतो परंतु मला जिंकायचंय या त्यांच्या ईच्छाशक्तीपुढं ते दुःख ठिपकाच वाटतंय त्यांना. आजवर दादांसोबत समाजात एवढ्या जवळुन फिरण्याचा योगच आला नव्हता. दहा वर्षीपुर्वी जेव्हा दादा निवडणुकीला उभे होते तेव्हा मी नाशिकला शिक्षण घेत होतो त्यामुळे प्रचार यंत्रनेत सहभागी नव्हतो. पण यंदा मात्र त्यांच्यामुळे राजकारणातले अनेक पैलु अभ्यासायला मिळत आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंन्ट, इव्हेन्ट मॅनेजमेंन्ट, अकाऊंटंट अशा सर्व जबाबदाऱ्या ते स्वतः किती खुबीने पार पाडत आहेत. खरंतर माझ्या शिवजयंतीच्या सर्व तारखा डिसेंबर मध्येच बुक झाल्या होत्या परंतु दादांची उमेदवारी मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात फिक्स झाली. तेव्हा धुळ्याची एक तारीख वगळता मतदानापर्यंतच्या बहुतांशी व्याख्यानाच्या तारखा मी रद्द केल्या व काही ईतर वक्त्यांना दिल्या.
अशा परिस्थितही दादा मला म्हणायचे "तु तुझ्या तारखा नको रद्द करू, प्रचाराचे माझे मी पाहुण घेईन"
खरंच असा बाप मिळायला भाग्यच लागतंय राव. आजवर त्यांनी मला त्यांच्या राजकीय करिअर मध्ये कधिच जुंपलं नाही. तरीही यंदाच्या निवडणुकीत मात्र गावातील माझ्या काही निस्वार्थी मित्रांच्या पाठबळामुळे थोडीबहुत प्रचार यंत्रना सांभाळु शकलो याचे समाधान वाटतेय. अजुन तिन दिवस प्रचार आहे.  प्रचाराचा एक एक दिवस एका वर्षाएवढा मोठा वाटतो तर कधी तो एका तासाएवढा लहाण वाटतो. खरंच निवडणुकीच्या निमित्ताने अनेक माणसं तपासुन घ्यायला मिळतात. चोविस तास जवळ राहणारी काही माणसं आपलं समर्थन करत नाहीत तर कधीही न भेटलेली व पाहिलेली काही माणसं आपलं प्रचंड समर्थन करतात. त्यामुळे आपल्याला भविष्यात कुणाच्या पाठीशी रहायचं आणि कुणाला सन्मान द्यायचा हे स्पष्ट होते म्हणुन आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने निवडणुक लढवलीच पाहीजे.
राजकारणातला जय-पराजय पुर्णतः जनतेच्या हातात असतो. आपण फक्त प्रामाणिकपणे लढायचं असतं. जनता सुज्ञ आहे योग्य त्या उमेदवाराच्याच ती पाठीशी राहते. येत्या तेविस तारखेचा तिचा कौल आम्हास शिरसावंद्य असेल. #विजय_निश्चित

लेखक : प्रा.विशाल विजय गरड (पांगरीकर)
दिनांक : १७ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...