Tuesday, February 14, 2017

मी आन् माझा बाप ©

आजवर लई पाठबळ दिलंय मला माझ्या बापानं, समाजात पहिली वळख ह्यंनीच मला दिल्याली हाय. नौकरी आणि शेत संभाळत संभाळत राजकारण केलंय. दहा वरीस सत्तेत व्हतं पण घरावरचा पत्रा निघाला नाय, गाडी बदलली नाय आन् जगण्यातला साधेपणाबी आज्याबात बदलला नाय. ज्ये काय केलं ते लोकांसाठीच. खोटारडं जगणं आमच्या दादांला आज्याबात जमत नाय. माझ्या जन्मापसुनच राजकारणाचा नाद त्यंला पण नेता एकदाबी नाय बदलला. मला कळतंय तसं त्यंचा एकच नेता हाय त्यो म्हंज्ये राजाभाऊ राऊत. समाजात ह्या नेत्यानंच आमचा मान वाढीवलाय त्येंचं ऋण कधीच नाय फिटायचं. आजवर पेठकरी आणि पांगरीकरांच्या जिवावर लई वरीस राजकारण केलंय दादांनी. आता यंदाच्या निवडणुकीतबी नेत्याचा स्वाभिमान जपण्यासाठी आन् ईस्कटलेली घडी पुन्ह्यांदा बशीवण्यासाठी दादा पंचायत समितीला उभा ऱ्हायल्यात.
आजपतुर प्रामाणिक राजकारण केल्यानं आर्थयवस्थेची जरा आबाळ हाय पण माणसांच्या श्रीमंतीनं आमच्या दादांचं समदं खिसं भरल्यालं हायतं. आपला ईरोधक किती पैशावाला हाय त्येज्यापेक्षा त्येला जवळुन वळखणारी माणसं किती हायती ह्यज्यावर जय पराजय आसतंय आसं त्ये म्हणतात. राजकारणाच्या लढतीत आजवर कुणाच्या बा ला ह्यो माणुस भ्याला नाय. नेत्यासाठी न्हाय न्हाय त्या कश्ता खाल्या, वैर घेतलं, पण नेत्यावरचं प्रेम कधीच कमी नाय हु दिलं. नेत्यानंबी त्येजी उतरायी म्हणुन तालुक्याचं पद दिऊन नावलौकीक मिळवुन दिला. 'नेता एकदा लढ म्हणला कि म्हागं पुढं बघायचं नाय निटच भिडायचं' असं त्ये म्हणत्यात नेत्याच्या अखंड पाठबळामुळंच ह्ये शक्य आसतंय.
आजपसनं प्रचार सुरू झालाय. आजवर माझा लई प्रचार केलाय दादांनी आता त्यंला माझी गरज हाय. बापाची राजनिष्ठा संभाळण्यासाठी मला माझी बापनिष्ठा संभाळायलाच पायजे. त्ये जरी राजकारणात आसले तरी माझ्या पावलावर पावलं टाकत ये आसं मला कधीच मनले न्हाईत; म्हणुनच म्या पण माझी येगळी वळखं तयार करू शकलो.
येत्या तिवीस तारखीला विजय तुकाराम गरड ह्या नावापुढं पं.स.सदस्य हे बिरूद लावण्यासाठी पुढील सात दिस पायला भिंगरी आन् तोंडाला माईक लावुन फिरणाराय. धनशक्तीला जनशक्तीनं ढोस देणाराय. निवडणुकीत हारिवनं आन् जिकिवनं ह्ये समदं मायबाप जनतेच्या हातात हाय पण सध्या तरी माझा बाप लई भारी लढतोय आन् त्येच्या सोबत फिरू फिरू म्या बी थोडं थोडं राजकारण शिकतोय.

लेखक : प्रा.विशाल विजय गरड (पांगरीकर)
दिनांक : १४ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...