Friday, March 3, 2017

| लिफ्ट ©

आज नेहमीप्रमाणे काॅलेज सुटल्यावर घरी निघालो होतो. माझ्या नेहमीच्या पायवाटेवरून साक्षी आणि गौरव चालत निघाले होते. शाळेचा मळलेला गणवेश आणि पाठीवर दफ्तर टाकुन हि जोडी शेतातुन घराकडं निघाली होती. सध्या उन्हाळ्यामुळं गावाकडच्या शाळा एकपारगी झालेल्या असल्याने दुपार नंतर शेताकडं अभ्यासासाठी हि लेकरं आली होती. चलता चलता माझी गाडी दिसली की दोघंपण हसत थांबली. गाडी थांबोस्तवरच अगदी बिनधास्त गाडीवर बसली. सुरूवातीला आधी मला लिफ्ट मागायला हात करायची  पण त्यांना जवा समजलं की पाठीवर दफ्तर दिसलं की सरं आपुणमात्याच थांबत्यातं तेव्हापासुन ठरलेल्या वेळी ती ठिकाण्याला थांबायची. सकाळी काॅलेजला निघाल्यावर रस्त्याने दिसेल त्या विद्यार्थ्याला शाळेच्या गेटपर्यंत सोडणे हि माझी जुनी सवय आहे.
अजुनही ग्रामिण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थांना पायपीट करावी लागते. गाडीवर जात असताना अशा लेकरांना शाळेपर्यंत सोडण्याचा आनंदच वेगळा असतो. मी तर आजवर कधीच शाळेची पायरी न चढलेल्यांना सुद्धा शाळेत बसवलंय. रस्त्याने चालताना शेकडो गाड्या जवळुन जातात पण सगळेच काही लिफ्ट देत नाहीत.
घरून निघाल्यावर शाळेची पहिली घंटा वाजायच्या आत शाळेच्या आत पोहोचण्याची लेकरांची धडपड जबरदस्त असते. गावाबाहेरील विद्यार्थी अगदी जमल तसं शाळा गाठण्याचा प्रयत्न करत असतात. कोण सायकलवर तर कोणी दुसऱ्यांच्या सायकलच्या कॅरेजवर नाहीतर नळीवर बसुन, कोणी एस.टी. ने तर कोणी थेट चालत पण प्रत्येक गावातुन किमान शे दोनशे मोटारगाड्या हेलपाटं मारत असतात तरी रस्त्याच्या कडेने शाळेला जाणारी लेकरं त्यांना का बरं दिसत नसावीत. शहरी भागात स्कुलगाड्या असतात परंतु दुसऱ्याच्या शेतात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या लेकरांना पायपीटीशिवाय पर्यायच नसतो. तेव्हा आपण जर कधी सकाळ सायंकाळ शाळा ते गावं हा प्रवास करत असु तर रोडच्या कडेने पाठीवर दफ्तर अडकुन चालेल्या लेकरांना नक्की लिफ्ट द्या कारण गाडीवर बसल्यावर गाडीच्या आरशात दिसणारा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुण गाडीचं पैसेच फिटल्यासारखं वाटतंय...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०३ मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...