Sunday, March 5, 2017

| बिनधास्त ©

बारावी बोर्ड परिक्षेचे टेंशन फाट्यावर हाणुन उद्या ईतिहासाचा पेपर असताना हा बहाद्दर निवांत उक्कडगांवच्या माळावर शेरडं राखायला निघालाय. एकीकडे पेपर अवघड गेला म्हणुन जिव देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यास सांभाळुण घरचं कर्तव्य पार पाडणारा अमोल मला श्रेष्ठ वाटतो. आणि तसंही घरची शेरडं राखायला लाज कसली आली म्हणा; त्यात रोज दुधाची सोय करणारी शेरडं जगली पाहीजे हे हि तितकंच महत्वाचं.
आज माझ्या काॅलेजवर रविवारची एक सराव परिक्षा ठेवल्याने सुपरव्हिजनसाठी भर दुपारी पांगरीहुन काॅलेजकडे निघालो होतो. तेवढ्यात भिमा भऊच्या कोट्याजवळ अमोल त्याच्या टायगर आणि वाघ्या कुत्र्यासोबत दहा बारा शेरडं राखताना दिसला. त्याला पाहुण मी क्षणभर थांबलो "आर लका बोर्डाची परिक्षा असताना तु अभ्यास सोडुन शेरडं कशाला राखायला आला रं" माझ्या या प्रश्नावर अमोल म्हणाला "आव सर, एका जाग्यावर बसुन अभ्यास करण्यापेक्षा आसं शेरडामागं फिरत फिरत बी माझा आभ्यास व्हतुय की, ह्ये काय पुस्तकं हायतीच की सोबत, आन् न्हायतर कुठं आपला बोर्डात नंबर ययलाय! म्या आज्याबात टेंशन घ्यत नाय परिक्षे बिरिक्षेचं"
अमोलचं हे उत्तर ऐकुण मी क्षणभर अचंबीत झालो परंतु त्याच्याकडुन हेच उत्तर अपेक्षित होते. याआधीही घरातली व शेतातली सगळी कामं करत करत काॅलेजला जाताना मी त्याला खुपदा पाहीलंय. खरंतर ग्रामिण भागात वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या सर्व लेकरांना अशा कामांची सवयच असते. माझ्यासाठी तर डोंगर, माती, गुरं ढोरं, झाडं, माणसं हिच पुस्तकं आहेत फक्त ती वाचण्यासाठी त्यांचा सहवास अनुभवता आला पाहीजे आणि आज अमोल नेमकं तेच करत होता. त्याच्याकडे पाहुन मलाही माझ्या परिक्षाकाळातला बिनधास्तपणा आठवला. आजवरच्या आयुष्यात जेवढ्या काही परिक्षा दिल्या त्या परिक्षाकाळात मी एकदाही माझं रोजचं जगणं आणि वागणं बदललं नव्हतं कारण परिक्षा ह्या सुद्धा रोजच्याच जगण्यातला एक छोटासा भाग आहेत त्यासाठी जिव पणाला वगैरे लावणे परवडत नाही किंवा उगाच त्याचा मोठाला बाऊ करून स्ट्रेस वाढवण्यातही काही मजा नाही. शिकण्याचा आणि रोजच्या जगण्याचा मेळ लावा आणि बिनधास्त जगा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...