Monday, March 20, 2017

| शेतकरी ©

आज काॅलेजची माझी ड्युटी संपवुन पांगरीला निघालो होतो रस्त्यातच स्वतःची दिवसभराची ड्युटी संपवुन घरी निघालेला एक शेतकरी दिसला. सोबत चार गाई, दोन म्हशी आणि काही शेरडं होती. दिवस उगवायलाच एखादी भाकरी फटकरात बांधुन, एखाद्या रिकाम्या बिसलेरीच्या बाटलीत घरचं पाणी भरून, खंद्यावर चाबुक आणि हातात कुऱ्हाड घेऊन हा शेतकरी माळरानावर वन वन भटकत असतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी आधी या गुराढोरांचं पोट भरणं जास्त गरजेचं असतं हे त्याला ठाऊक आहे म्हणुनच त्याची हि दिवसभराची ड्युटी तो प्रामाणिकपणे पार पाडतो.
काॅलेजला जाताना असे चार पाच शेतकरी मला रोज भेटतात. दोघांच्या ड्युट्या सारख्याच वेळेला सुरू होतात आणि संपतात म्हणुन भेटनं आमचं रोजचंच. गाडीवर जाता जाता एखादा रामराम ठरलेलाच. ओसाड माळरानावर जनावरं सांभाळणे हे खरंच जिकिरिचे काम आहे. काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळण्यापेक्षा नक्कीच हे अवघड आहे.
दिवसभर उन्हाच्या कारात करपलेल्या माळरानावर जनावरांना काय खायला मिळत असलं? कुणास ठाऊक पण कडबा विकत घ्यायची ऐपत नसल्यावर अशी भटकंती आलीच. कर्जाचा एक हप्ता भरण्यासाठी महिण्यातले असे कित्येक हप्ते शेतकरी राजा उन्हात राबतो. दुध डेअरीच्या तुटपुंज्या पगारीवर आणि कवडीमोल किंमतीत विकलेल्या शेतमालाच्या पट्टीवर कर्जाचा डोंगर रेटण्याचा प्रयत्न करतो पण जिद्ध हारत नाही. भले व्याज वाढलं तरी चालेल पण मी कर्ज बुडवणार नाही या शेतकऱ्याच्या प्रामाणिकतेची दखल कुठेच का घेतली जाऊ नये याची खंत वाटते. कधी-कधी हाच चांगुलपणा त्याचा जिव सुद्धा घेतो.
मला भेटणारा प्रत्येक शेतकरी चाळीशी ओलांडलेला असतो. अशातही शेतात राबण्याची त्याची धमक तरण्या पोराला लाजवेल इतकी जबरदस्त असते. हि शक्ती येते तरी कुठुन तर याचं उत्तर आहे पोरीचं लग्न, मुलाचं शिक्षण, सण वार उत्सव, संसाराचा बारदाना आणि बँकेचे कर्ज याच गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्याला कष्टातुन रिटायरमेंट देत नाहीत.
एक छाटान आणि धोतरावर वर्षानुवर्ष शेतात राब-राब राबणाऱ्या या शेतकरी राजाची हि दैना कधी संपेल तेव्हा संपेल पण तुर्तास तरी "स्वतःच्या रक्ताचं पाणी करत काळ्या आईच्या पोटाला पाझर फोडुन आपल्या पोटाची सोय करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकानेच सन्मानाची वागणुक देणे हिच काळाची गरज आहे." कारण तो जर खचला तर उद्या आपल्या पोटाची खळगी भरनं अवघड होऊन जाईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...