Sunday, March 19, 2017

| काटा ©

काही दिवसांपुर्वी माझ्या काॅलेजसमोर असलेल्या तळ्यावर फेरफटका मारायला गेलो होतो. तिथल्या भरावावर असंख्य काटेरी झुडुपं पाहिली. त्याला लागलेल्या काट्यांना खुप जवळुन न्याहाळलं. पाहता पाहता ते काटे माझ्या डोळ्यातुन थेट मनालाच टोचले आणि मग हे शब्द बाहेर आले.
हे काटे लहानपणी थेट टोचतात परंतु मोठेपणी हेच काटे काही माणसांच्या रूपात भेटतात आणि टोचतातही. अशा काट्यांच्या टोचण्यापासुन लांब राहण्यासाठी आपले मनही तितकंच गेंड्याच्या कातडीचे करावे लागते. ज्याला काट्याची सवय होते तो सराईतपणे काट्यांवरून चालतो. संवेदना मेलेल्या माणसांना रक्ताची काय किंमत; त्यांना तर फक्त ते वाहतानाच दिसते त्यात तो अंध असल्यावर तर खुपच अवघड. बाभळीवर फिरणारे मुंगळे, सरडे, खारूताई यांना ते काटे कधीच नाहीत टोचत कारण ते जपुन चालतात. काट्यांच्या मुळाशी राहतात. टोकावर उड्या नाहीत मारत. काटा हा स्वतःहुन कधीच टोचत नाही आपणच आपल्या चुकीने टोचुन घेतो. तो लवकर बाहेर काढला तर ठिक नाहीतर कुरूप बनतो. एखाद्या विषयावर स्वतःला निमुळतं करता आलं की आपल्या विचारांनासुद्धा एक टोकदारपणा येतो. कळत नकळत तो दुसऱ्याला टोचतोही. काटे आयुष्यात जपुन चालायला शिकवतात. आयुष्याच्या वाटेवर असे काटे प्रत्येकाच्याच वाट्याला येतात परंतु ते सगळे बाजुला सारत बसण्यापेक्षा आपल्याच पायात एखादे चांगले पायतान असले की ते टोचणार नाहीत. पायाला टोचनाऱ्या काट्यासाठी हाच रामबाण उपाय परंतु ह्रदयात आणि डोक्यात घुसणाऱ्या काट्यांसाठी प्रतिकाटे तयारच ठेवावे लागतात.
ओल्या काट्यापेक्षा वाळलेला काटा जास्त टोचतो. काही काही काटे कुणालाही न टोचताच कुजुन जातात तर काही काटे त्यांचा टोकदारपणा दुसरा काटा बाहेर काढण्यासाठी वापरतात. स्वतःचं सजिवपण विसरलेले काटे दुसऱ्याला रक्तबंबाळ करण्यात माहिर असतात.
कधी आपल्या आयुष्यात कोणी काटा बनुन येतं तर कधी आपणंच कुणाच्यातरी आयुष्यात काटा बनुन जातो. कुणी आपला काटा काढतो तर कधी आपण कुणाचातरी. या वास्तववादी, माणुसरूपी काट्यांपेक्षा काळजाला जिवंत करणारे शब्द ऐकल्यावर सर्वांगावर येणारा काटा श्रेष्ठ असतो. तोच तुम्हाला तुमच्या संवेदनशिलतेची जाणिव करूण देतो. म्हणुनच काटा रस्त्यावर असो, माणसात असो किंवा शब्दांत कधीतरी टोचायलाच हवा.

"मनी उठी विचार लाटा,
जेव्हा घुसे शब्दकाटा"

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...