Saturday, March 11, 2017

| लोमपाट ©

आज काॅलेज सुटल्यावर घराकडं निघालो तेव्हा स्त्यातच वस्तीवरची पोरं लोमपाट खेळताना दिसली. लोमपाट किंवा आट्यापट्या हा माझा लहाणपणीचा आवडीचा खेळ होता. आम्ही त्याला भुर्रर्र म्हणायचो. सुर्र घेतल्यावर प्रतिस्पर्धी संघाचा मुख्य स्पर्धक फाटीवर सावध उभा राहुन माझ्या छातीला हात लावुन ईकडे तिकडे रास्ता मारण्याच्या जय्यत तयारीत असायचा मग अशा परिस्थितीत कुंडीतल्या आपल्या गड्याचा अंदाज घेऊन "आपले गडी कुंडीत..भुर्रर्र..र्र" अशी आरोळी देऊन कुंड्या ओलांडत खाली जाऊन पाणी आणण्याचा प्रयत्न करायचो. हा सगळा भुतकाळ डोळ्यासमोर जिवंत झाला.
आम्ही लहाण असताना पांगरीतल्या श्रीराम पेठेतल्या जनावराच्या दवाखाण्यातल्या वडाखाली आमचं लोमपाटाचं मैदान असायचं. कुदळीने खांदुन फट्या आखायच्या; शाळा सुटली कि दफ्तर टाकुन थेट दवाखाण्यात पळायचो. शारिरिक व्यायाम आणि आयुष्यात संकटे भेदायला शिकवणारा हा खेळ आता मोबाईल आणि टि.व्ही गेमच्या जमाण्यातल्या आधुनिक युवागिरीच्या नादात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शहरी भागातुन तर केव्हाच झालाय. असंच कुठंतरी ग्रामिण भागात वाड्या वस्त्यांवर तो शेवटच्या घटका मोजतोय.
लोमपाट हा खेळ कमीत कमी चार बैली किंवा जास्तीत जास्त बारा बैली असतो. एक बैली म्हणजे दोन कुंड्या. फाटीवर उभा राहुन वरल्या गड्याला थांबवायचं हा जिकिरीचा प्रयत्न असतो. फक्त सुर्र घेणाऱ्यालाच लाथाने हानायचा परवाना असतो बाकीच्यांनी नुसतं हिकडं तिकडं पळत गडी हाताने आडवायचे असतात. खालुन पाणी घेऊन येणाऱ्याचा आणि कुंडीतुन पाणी घ्यायला जाणाऱ्याचा जर एकाच वेळेस प्रवेश झाला तर त्याला "खाली वर गाबडं" म्हणुन मोठ्याने जल्लोश साजरा करायचा, रास्ता मारताना मन खाऊन झपाटा द्यायचा.
आज एकपारगी शाळा आटोपुन सायंकाळच्या कवळ्या उन्हात उक्कडगांवच्या वस्तीवरची आज्या, स्वाजा, नागीशा, विज्या, पिंकी, सज्या, सदा, तायडी हि सगळी लेकरं लोमपाट खेळताना दिसली आणि त्यांचं दोन डाव मी आवर्जुन थांबुन पाहिले. नवीन शिकणाऱ्या ह्या पोरांना जुनं जाणतं भिमा भाऊ मार्गदर्शन करत होतं. सर्व खेळाचे नियम समजाऊन सांगत होतं. आज पोरांसोबत मी सुद्धा खुप दिवसांनी थोडं लोमपाट खेळलो पण लगेच दमुन पुन्हा बाजुला बसलो.
अशा गावरान खेळाची आता कुठे पुस्तकं उपलब्ध नाहीत फक्त जुन्या माणसांकडुन हे समजुन हा वारसा असाच पुढे चालवणे हिच खरी काळाची गरज आहे. आजच्या आयुष्यात जेव्हा काही माणसं आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा लहाणपणीच्या खेळातले काही डाव आजही ती कोंडी फोडायला उपयोगी पडतात.
"मोबाईलच्या गेम्समागं कितीबी पळा
पण कधीतरी एकदा लोमपाट खेळा"
लई भारी वाटतंय...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...