Saturday, April 8, 2017

| पानगळ ©

जिद्द आणि प्रतिकुल परिस्थितीतही तग धरून राहण्याची क्षमता असली कि मातीच काय पण पाषाणातही उगवता येते; हे एका पानगळ होऊन दगड धोंड्यांच्या विळख्यात ताठ मानेने उभा असलेल्या झाडाकडुन मला शिकायला मिळाले. या झाडावर लांबुन नजर टाकणाऱ्याला वाटेल कि हे झाड वटुन गेलंय, काहीजन तर कुऱ्हाडीचा गाव घालुनही बघतील पण तरिही हे झाडं उभेच असेन त्या मृगाच्या पहिल्या सरीसाठी. माणसांच्याही आयुष्यात बहर आणि पानगळ असते अशा वेळी जर आपणही या झाडांसारखेच आचरण केले तर दिर्घकाळ जगता येते. कित्येक जण अजुनही स्वतःचा बहर सदैव टिकुन राहण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु कधीतरी पानगळ झाल्याशिवायही बहर चांगला येत नाही.
त्या पाषाणात रूतलेल्या झाडांच्या मुळ्यांना किती चटका सोसावा लागत असेल तरिही मृगाच्या फक्त एका सरीच्या बरसण्याने त्याच मुळ्यांमध्ये जगण्याचं आणि पानांमध्ये उगवण्याचे सामर्थ्य निर्माण होते. उन्हाळ्यात एखाद्या कोऱ्या कागदावर काळ्या पेनच्या रेष्या ओढाव्या तशा सावल्या या झाडाखाली असतात परंतु श्रावणात काळ्या कुट्ट सावल्यातुन सुर्य सुद्धा झाकला जातो. दिवस सगळ्यांचेच येत असतात फक्त जिंदगीच्या या चढ उतारात आपण टिकुन रहायला हवे. आपल्यावर जळणारी माणसे व आपले वाईट चिंतणारी माणसे आपल्या वटण्याची (संपण्याची) वाट आतुरतेने पाहत असतात कधी-कधी ते सुद्धा माणुसरूपी झाडावर कुऱ्हाडीचा घाव घालुन त्या झाडाचे खोड जिवंत आहे का मेलेलं हे तपासुनही पाहत असतात. अशा वेळी वरवरून जरी वटलेलो दिसत असलो तरी आतुन मात्र जगण्याचं आणि सामर्थ्यानं लढण्याचं रक्त शिल्लक असल्याची जाणिव आपणाला करून द्यावीच लागते अन्यथा एखाद्याच्या चुलीचे सरपण म्हणुन आपल्यालाच जळावे लागेल...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...