Wednesday, April 12, 2017

| जत्रा ©

सायंकाळची येळ मी, राहुल्या, काक्या, बंड्या आन् किट्या टु व्हिलरवर येडाईच्या जत्रला निघालाव. पांगरी ते येडाई रोड मुंग्यावनी वाहत व्हता. दर दुन तीन गाड्यागणीस एकांद्या गाडीत आराध्यांचा ताफा आसायचा. जहांजा आन् संबळाचा आवाज दुमदुमत व्हता. उक्कडगांवच्या घाटातुन वरी गेलं किच येडाईच्या बुरजाचं दर्शन झालं. दर्शन घेणं बोतच नाय; ही तोबा गर्दी. नुसतं डोंगराकडं बगुनच हात जोडलं आन् थेट येरमाळ्याच्या जत्रत घुसलावं. स्वतःचं व्यक्तिमत्व, मानसन्मान, आब ईबात, वळख पाळख, गाडीच्या हँडलला आडकुन जत्रचा आनंद घ्ययला माझ्या लहाणपणीच्या सवंगड्यांसोबत "पंचमीचं चांदणं चमकतंय लकलका आंबा खेळती झोका" ह्ये गाणं गुणगुणत रस्त्याकडंच्या दुकानांकडं बगत-बगत आमराईकडं निघालाव. काय-काय बगु, कुठं-कुठं बगु आन् काय-काय घिऊ नुस्ता धिंगानाच डोस्क्यात. जत्रतल्या सगळ्यात मोठ्या पाळण्यात बसणं, मौत का कुआ बघणं, तमाशाची आण पिच्चरच्या टुरींग टाक्यांची पोष्टरं बघतं बसणं, लईच भुक्याजल्यावर काॅन्ट्री करून आंडा आम्लेट खाणं आन् पुना राह्यलेल्या पैशात कलिंगडावर ताव मारणं, टुरींग टाकीजचा पिच्चर वावरात झुपुन बघणं हे समदं केल्याबीगीर येडाईच्या जत्रला गेल्यावणीच वाटत नाय.
गेल्या-गेल्या मोठ्या पाळण्यात बसुन एकदा समदी जत्रा डोळ भरून बगायची मग तासंतास हारेक दुकानावरून विंडो शाॅपिंग करत फिरायचं. खिशात फक्त मोजकंच पैशे ठिवायचं त्येज्याशिवाय तारांबळीची मजा येत नव्हती. येटीएम मदी बक्कळ पैसा व्हता पण जत्रत तसलं नखरं चालत न्हायतं म्हणुन हजार रूपयाच्या दहा दहाच्या नोटावर जत्रा उरकायची. साबणात गोल काडी टाकायला, बंदुकीनं फुगं फोडायला, कुडमुड्यावर पैसं लावायला ह्या दहा रूपड्याची लई मदत व्हयची.
आज जत्रत लई मनसोक्त फिरलो पण
भोंगे आन् पिपाण्यांच्या आवाजानं कान किर्रर्र झालं, ब्रेक डान्स मधल्या पाळण्यांनी आंग मोकळं झालं, गोल पाळण्यात वर जाताना मजा ययची पण खाली येताना पोटात गोळा ययचा आन् पायातला जिव छाताडात जायचा. मौत का कुव्या समोर कसल्यातरी गाण्यावर कसल्यातरी बाया नाचत व्हत्या त्येना बघायलाच माणसांची मुरकंड पडल्याली. तमाशाचा बाज तर निराळाच व्हता. दिवस मावळतीला लागला व्हता, दिवसभर आमराईत ठिवल्याल्या पालखीकडं जाणारं पाय आता हळु हळु घराकडं निघालं व्हतं. मुक्कामी राहुट्या मधल्या चुली पेटल्या होत्या आन् आम्ही परतीच्या मार्गाला लागला व्हताव एवढ्यातच चालता-चालताच एक अपंग माणुस भुक लागली मनुन भिक मागत व्हता आन् त्येज्या शेजारी आसल्याल्या एका मोठ्या दगडावर पाच पन्नास निवद ठिवलं व्हतं पण देव पाप करलं म्हणुन त्यो खाऊ शकत नव्हता. ह्यो आसला ईरोधाभास बगुन काळीज पिळवटुन गेलं राव.
खरंच जत्रत लय काय-काय बगाया मिळतंय आन् शिकायला तर त्याऊन जास्त मिळतंय म्हणुनच दर वरसाला म्या माज्या लहाणपणीच्या दोस्तांबरूबर येडाईच्या जत्रला जातोच. कमी येळंत मला हितं हजारो चेहरं आन् त्येंच्या येगयेगळ्या तऱ्हा आनुभवायला मिळत्यात. आता पुढच्या वर्षीच्या चैतीलाच आमराईत जायचं तवर आपली रोजची जत्रा सुरूच राहणार येडाबाईच्या आशिर्वादानं.
बोला आई राजा उदं उदं......

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...