Saturday, April 15, 2017

| बुट पाॅलिश ©

बुट पाॅलिश हा बड्या शहरातील लोकांचा रोजचा विषय आहे परंतु चपला वापरणाऱ्यांसाठी तो कधीमधीचा विषय असतो. तसंच काही माझंही आहे. पाच वर्षापुर्वी घेतलेल्या रेड चिफला अजुनही पाॅलिस करून वापरतोय. घेतल्यापासुन फक्त तिनदा पाॅलिश केलाय. उद्या एका हाय प्रोफाईल कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी बुटाडं पाॅलिश करून घ्यायची होती म्हणुन आमच्या पांगरीच्या ज्योतीर्लिंग फुट वेअरचे संचालक नितीन रामगुडे यांच्याकडे गेलो होतो. बुट पाॅलिश करणे हा नितिनचा पारंपारिक व्यवसाय आहे आणि माणसांच्या डोक्याला विचारांची पाॅलिश करणे हा माझा छंद आहे. आमची क्षेत्र वेगवेगळी असली तरी पेशा एकच आहे.
आपण आरशापुढे गेल्यावर जितक्या तल्लिनतेने चेहऱ्यावर मेकअप करतो त्याहिपेक्षा जास्त मन लावुन नितीन बुटाला पाॅलिश करत होता. मी आपलं शेजारी बसुन एकटक त्याच्या कृतीकडं पाहत होतो. खरंतर चेहरा चमकण्यासाठी जेवढी सौदर्य प्रसाधनं तोंडावर थापावी लागतात त्यापेक्षा जास्त सौदर्य प्रसाधनं बुट चमकवायला वापरली जातात. साधी क्रिम, कलर क्रिम आणि चमक क्रिम या तिन्ही क्रिम अधुन मधुन बारका ब्रश, कलरचा ब्रश आणि चमक ब्रश वापरून बुटाला लावाव्या लागतात. सलग दहा मिनीटांच्या अथक प्रयत्नातुन फुफाट्यात मळलेला बुट लग्नातल्या नवरदेवासारखा चमकायला लागतो.
बुटाडांच्या पाॅलिश एवढीच मनाची पाॅलिश सुद्धा तितकीच महत्वाची असते. यात वेगवेगळी पुस्तके आणि प्रेरणादाई माणसं विविध क्रिम सारखी कामं करतात. दुसऱ्यांच्या मनावरची धुळ झटकुन त्यांचे व्यक्तिमत्व चमकवण्यासाठी आणि ऊसवलेली मने शिवण्यासाठी आपणही कधीतर चांभार व्हायला हवे. बुटावर नुसती क्रिम लावुन बुट चमकत नाही त्यावरून पुन्हा-पुन्हा फिरवलेल्या ब्रशमुळेच त्याला चकाकी मिळते तसेच आपल्याही आयुष्यात फक्त पुस्तक घेऊन किंवा विचार ऐकुण आपली मनं चमकत नसतात तर परत-परत त्या विचारांचे अनुकरण केल्याने आणि पुस्तकांचे चिंतन केल्याने मनाला झळाली मिळते.
जसे मळलेले पाय पाॅलिश केलेल्या बुटात झाकुन जातात तशेच मळलेली मने आणि विचारही सुंदर चेहऱ्या मागे झाकले जाऊ शकतात. परंतु असं करण्यापेक्षा आपण आपल्या डोक्यातल्या विचारांनाही सतत पाॅलिश करत रहायला हवे जेणेकरून ते चकाकत राहतील आणि इतरांनाही चमकवत राहतील. शेवटी बुटाच्या पाॅलिश पेक्षा आणि चेहऱ्याच्या मेकअप पेक्षा डोक्यातल्या मेंदुला चांगल्या विचारांची क्रिम लावुन त्यावरून अनुकरणाचे ब्रश सतत फिरवत राहिल्यानेच समाजात आपले व्यक्तीमत्व चमकत राहते.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...