Sunday, April 9, 2017

| कडबा ©

जवारीची सुगी झाली की रानात कडब्याच्या राशी लागत्यात ; मग त्येची गंज लावायची आन् तिवढुश्याच कडब्यावर शेतकऱ्याला वरिसभर रानातली गुरू ढोरं पोसावी लागत्याती. आज गावाकडं जाताना रस्त्यातच एक स्री शेतकरी बैलगाडीत कडबा भरून न्हेताना दिसली. आसल्या उन्हाच्या तडाख्यात शेतातली जवारी काढुन-बांधुन-भरून गंज लावायला न्ह्ययची म्हंजी हि लई जिकीरीचं काम आसतंय. पहिलं जवारी उपटत होती पण आता पाण्याआभावी रानं जाम वाळल्यामुळं जवारी कापावीच लागती. आश्या बिनबुरकुंडाच्या कडब्याच्या गंजी टकल्या मानसावनी दिसाय लागल्यात्या.
शेतामदी पुरूषांसोबतच स्रीयाबी खंद्याला खंदा लावुन काम करत्यात. ईतर कोणत्याबी क्षेत्रापेक्षा हितं शेतात आसं राबनं जाम आवघड आसतंय. आजवर शेतकरी मनलं कि फक्त माणुसच डोळ्यासमोर येतंय पण तितक्याच ताकदिनं त्येच्यासोबत रानात राबणारी स्री कधी समोर येत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील स्रिया नवऱ्याच्या आत्महत्येचं भांडवलं न करता तितक्याच नेटानं पुन्हा रानात राबत्यात हे तितकच सत्य आहे. शेतात राबणाऱ्या शेतमजुरांमध्ये स्रीयांची संख्या जास्तय हे गावागावातुन सकाळी टुप्पा घिऊन निघालेल्या गाड्या बघितल्या की लक्षात येतंय.
पहिलं घरातलं जाणतं गडी रानात राबायचं आन् घरातल्या बायका ते पिकल्यालं धान शिजवुन, भाजुन खाऊ घालायच्या. आता त्यंच्या नशिबातली चुल आन् मुल हि चौकट तर म्हागच तुटुन पडलीया तरीबी चुलीच्या सरपनाची आन् चुलीवर ठिवल्याल्या भगुण्यातल्या भाजीची सोय करायला आजची शेतकरी स्री अहोरात्र झटत हाय. सोबतच नवऱ्यानं घेतलेल्या कर्जाचं हाप्तं बी प्रामाणिकपणे फेडत हाय.
एकीकडं शाळेतुन घरी येणाऱ्या लेकरांची वाट बघत बसल्याली आई तर दुसरीकडं रानातुन घरी येणाऱ्या आईची वाट बघणारी पोरं आन् गोठ्यातली ढोरं; हाच फरक आहे शेतकरी आणि ईतर कुटुंबातला....

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ मार्च २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...