Wednesday, April 19, 2017

| उतराई ©

भिमा बगाडे, निर्मला बगाडे या मातंग समाजातील कष्टकरी दाम्पत्याला आज मी काॅलेजला जाताना लिफ्ट दिली. उन्हाच्या कारात हे जोडपं रोज पिंपळवाडीच्या शिवारात हळदीचा सोरा वेचण्यासाठी जातं. कालपण काॅलेजहुन येताना मी त्यांना पांगरीपर्यंत ट्रिपल सिट घेऊन आलतो. दोघांच्या डोक्यावर दोन मोठी चुंगडी होती हे ओझं घेऊन ती दिवसाकाठी रोज सोळा किलोमिटरची पायपीट करतात. आजही सकाळी मी नेहमीप्रमाणे पांगरीहुन काॅलेजला निघालो असता. उक्कडगांवच्या घाटावर हि जोड चालत निघालेली दिसली; मी गाडी थांबवुन त्यांना बसवलं.
गाडीवर बसल्यावर भिमा भाऊ बोलाय लागले. "आव धाकलं मालक, आसल्या उन्हाच्या कारात तुम्ही आमच्यासाठी गाडी थांबीवली राव. कालपण तुमच्यामुळच लवकर गेलाव घरी नायतर रात झाली आस्ती आम्हास्नी बगा" मी भिमा भाऊ ला मध्येच थांबवत म्हणलो "भिमा भाऊ मला मालक वगैरे म्हणु नका, मिळालेल्या आयुष्याचे आपणच आपले मालक असतो जरी भुतकाळात कोणी तुम्हाला चार घास दिले असतील तरी ते तुमच्या कष्टाचे फळ होते हे लक्षात असुद्या; मी तुमच्या लहाण मुलासारखा आहे" त्यावर भिमाभाऊ उत्तरले " न्हाय पण आमच्या तिन पिढ्या तुमच्या घरात जगल्यात, आमची आय झुंमका म्या गुडग्याएवडा आसल्यापसुन तुमच्यात शेण झालवट करत व्हती, आता तुम्हास्नी आठवत नसलं पण तुमचं पंजुबा नाना आन् आजुबा बापुंनी आमाला लई संभाळलय बगा आन् आता दादा, आण्णा बी लई जिव लावत्यात. म्हागल्या महिण्यात तुमच्या घरचं सरपान फोडल्यावर आण्णांनी चाहा पाजुन चारशे रूपये दिलतं बगा.
या व अशा कित्येक मातंग समाजातील दांम्पत्यांनी भुतकाळात फक्त भाकर तुकड्यावर केलेल्या कामांची उतराई आजच्या घडीला त्यांचे पाय धुतले तरी फिटणार नाही. प्रेम आणि जिव्हाळा यांच्या वाणीत ठासुन भरलेला आहे तो जाणुन घ्यायचा असेल तर प्रत्येकाने एकदा त्याना प्रेमाने जवळ करायला हवे. जुनी जाणती हि माणसं उपकार कधीच विसरली नाहीत, अडाणीपणा पदरी पडला असला तरी शहाणपण कधीच विसरली नाहीत.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...