Tuesday, May 2, 2017

| पंक्चर ©

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी असं टायर वर्कसच्या दुकानात बसुन आपल्या गाडीची पंक्चर काढताना पाहिलेलीच असते. खरं म्हणजे अत्यंत कष्टाच्या जिवावर उभारलेला हा धंदा जितका गरजेचा तितकाच तो दुर्लक्षीत सुद्धा. आज तर कोणालाही उद्योग उभा करायचा असेल तर सायकल दुकान किंवा पंक्चर काढायचं दुकान हा ऑप्शन जरा लांबच असतो. याला कारणही तसंच आहे.
चाकाच्या छोट्याश्या छिद्रातुन बाहेर पडणारी हवा थांबवण्यासाठी १२-१३ चा पाना, १४-१५ चा पाना, १६-१७ चा पाना, १८-१९ चा पाना, ३ टामी, एक हातोडी, वाल डाय, कानस, सुलोचन, कात्री, कच्च रबर, आणि हवा. यांच्या योग्य क्रमाच्या वापरातुन पंक्चर झालेलं ट्युब हवाबंद करण्याचा आटापीटा एका पंक्चरवाल्याला करावा लागतो. अतिशय कष्टाचे काम आहे हे. हात चालवल्याशिवाय हातात पैसे येत नाहीत. मला सायकलची पंक्चर दोन रूपयापासुन तर दुचाकीची पंक्चर दहा रूपयापासुन असतानाची आठवते. महागाईमुळे हेच दर आता सुधारित झाले आहेत परंतु तरिही टायर वर्क करणाऱ्या दुकानदारांना त्यातुन म्हणावा तसा नफा मिळत नाही. त्यात अजुन आता ट्युबलेस टायरमुळे तर पंक्चर धंद्याला पार बुच्चनच बसल्यासारखं झालंय.
आज काॅलेजहुन पांगरीला येताना माझी दुचाकी अचानक पंक्चर झाल्याने येडशीच्या हरिभाऊच्या ढाब्याजवळील विनोदकडे पंक्चर काढण्यासाठी थांबलो होतो. तो त्याचे काम करत होता आणि मी माझे. समोर दिसणाऱ्या प्रत्येक कृतीकडे निरखुन पाहण्याची माझी सवय इथेही शांत बसली तर नवलंच. एवढ्याशा प्रसंगातुनही मी एक गोष्ट शिकलो; कि संकटांना तोंड देत पुढे चालत असताना मनात भरलेली प्रचंड आत्मविश्वासरूपी हवा कधी-कधी पंक्चर होऊन बाहेर पडु लागते तेव्हा वेळीच पंक्चर काढुन ध्येयाचे अंतर लवकरात लवकर पार करायला हवे. तसेच नुसती पंक्चर काढुन न थांबता तो काटा अजुनही तसाच टायर मध्ये रूतलेला असेल तर पुन्हा पंक्चर होण्याची शक्यता असते. तेव्हा असल्या गोष्टीही टायरच्या आत हात फिरवुन तपासुन पहायला हव्यात. टायर तपासणे सोप्पे पण अशी माणसे तपासणे महाकठीन असते. टायर मध्ये अति आणि कमी हवा असणे दोन्हीही चांगले नसते तसेच माणसातही अति आणि कमी आत्मविश्वास दोन्हीही चांगली नसते. म्हणुनच आपली सुद्धा हवा आपण वेळोवेळी चेक करायलाच हवी अन्यथा जिंदगीचे टायर खराब व्हायला वेळ लागणार नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०२ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...