Thursday, May 18, 2017

| माझा वाढदिवस ©

आज मी माझा वाढदिवस माझ्या आई वडीलांसह आळणी येथील स्वआधार संस्थेतील मतिमंद व अनाथ मुलींसोबत साजरा केला. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवण्याचे बळ जिच्या उदरात मिळाले आणि तसा संस्कार ज्या वडिलांनी माझ्यावर केला त्या दादा आणि आई सोबत आज सायंकाळी या अनाथालयात माझा वाढदिवस साजरा झाला. मी जाण्याआधीच तेथील शिक्षक वृंदांनी सर्व मुलींना शाळेसमोरील एका सुंदर लाॅनवर बसवलं होतं. आईसमवेत त्यांच्यापुढं जाताच; माझ्या आईला त्यांनी "नमस्ते आई" अशी हाक मारली. आम्ही सगळेच गहिवरून गेलो आणि आजचा वाढदिवस सार्थकी लागल्यासारखं वाटलं. या हरवलेल्या दुनियेच्या कुठल्यातरी कोपऱ्यात सापडलेल्या अनाथ आणि मतिमंद मुलींना सांभाळण्याचे थोर कार्य स्वआधार हि संस्था गेल्या कित्येक वर्षापासुन करत आहे. त्यांना शिकण्यासोबतच जगणं शिकवणारं हे संकुल मला स्वर्ग वाटतं म्हणुनच माझा दरवर्षीचा वाढदिवस मी ईथेच साजरा करतो. मागच्या रक्षाबंधनाला येथील मुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मला पोस्टाने पाठवल्या होत्या म्हणुन रक्षाबंधनाची राहीलेली ओवाळणी छोटीशी आर्थीक मदत म्हणुन आज त्यांना देताना माझ्या घासातला एक घास त्यांना दिल्याचे समाधान वाटले. सध्या या अनाथ मुली ईकोफ्रेन्डली गणपती तयार करत आहेत. गणोशोत्सव मंडळांनी देखील इथुनच मुर्त्या नेऊन त्यांना हातभार लावायला हवा.
ज्यांचे कोणी नाही त्यांना आपलेसे करण्यासारखा आनंद दुसरा क्वचितच असावा. मतिमंदता असतानाही माझ्या भाषणातील प्रत्येक वाक्याला दाद देण्याइतपत ज्ञान त्यांच्याकडे असल्याची जाणिव त्यांच्या टाळ्यांच्या आवाजातुन मला समजली. या जगात कोणीच मतिमंद किंवा गतिमंद नसतं फक्त त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी मंद नसायला हवी. आपलं स्थान समाजात किती मोठे आहे याहिपेक्षा आपण आपल्या आई वडीलांच्या नजरेत किती मोठे आहोत याला अग्रक्रम असायला हवा. माझ्या आजच्या उपक्रमामुळे आई वडीलांच्या नजरेतली आपली किंमत थोडीशी आणखीन वाढल्याचा मनस्वी आनंद होतोय.
वाढदिवसानंतर मुलींना वाटण्यासाठी मी खाऊ आणला होता; तो वाटताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निव्वळ शब्दात न सांगण्यासारखाच होता, मी सोबत आणलेला खाऊ येथील मुलींनी आवडीने खाल्ला परंतु पोट मात्र माझं भरलं होतं बस्स याचसाठी ही बांधीलकी जपायला हवी. दुसऱ्याचे पोट भलल्यानंतर जेव्हा आपले मन भरते तेव्हा समजायचं कि आपण सुख नावाच्या वास्तुत प्रवेश केला आहे.
आजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मदत केल्याबद्दल अधिक्षक थोडसरे सर व त्यांच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासुन आभार. हा जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी अशीच निरंतर राहील. धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...