Friday, May 5, 2017

| पाईपलाईन ©

प्रत्येक शेतकऱ्याच्या जिवनातला हा एक अविभाज्य घटक असतो. माझ्या काॅलेजसमोर मोठं तळं आहे या तळ्यातुन शेतात पाईपलाईन नेण्यासाठी हरएक शेतकरी प्रयत्न करतो. आज सकाळी सकाळी काॅलेजला जाताना हि पाईपलाईन पाहुन मनात एक छान विचार आला. मग काय बसलो कि तिथंच लिहित. तळ्यातल्या पाण्यावर शेतातली पिकं फुलवुन उत्पन्न काढण्याचा विचार प्रत्येकजण करतो किंवा विहीरीचे पाणी सगळ्या शेतात फिरवण्यासाठी पाईपलाईन महत्वाचीच असते. मोकाट पाणी पद्धतीपेक्षा हि कितीतरी पटीने उपयुक्त असते. माणसाच्या आयुष्यातही अशा पाईपलाईनी असतात काही जन्मजात असतात तर काही आपल्याला तयार कराव्या लागतात. जन्मजात पाईपलाईनी ह्रदयातलं रक्त आपल्या शरिररूपी शिवारात फिरवतात परंतु विचार फिरवणारी पाईपलाईन मात्र आपणाला स्वतःलाच तयार करावी लागते. हि पाईपलाईन करताना विचारांचा मुख्य स्त्रोतही तितकाच महत्वाचा असतो तो स्त्रोत किती मोठा, किती खोल आणि किती सामर्थ्यवान आहे यावरच आपलं वैचारिक उत्पन्न अवलंबुन असते; नाहीतर दुष्काळात कोरड काय उपयोगाची. मी सुद्धा असंच करतो, कुठेतरी एखादे चांगल्या विचारांचे तळे साचलेले दिसले कि विचारांची पाईपलाईन मी माझ्यापर्यंत टाकुन घेतो. आजवर वेगवेगळ्या विचारांच्या अनेक पाईपलाईनी मी माझ्या मेंदुशी जोडल्या आहेत. ती पाईपलाईन फुटु नये म्हणुन मध्ये-मध्ये एअर वाॅल पण टाकले आहेत. जेणेकरून आयुष्याच्या या फिरस्तीत अनेक वाटसरूंना देखील त्यातुन तृप्ती मिळावी. माझ्या विचारांच्या कोरड्या विहिरीत आता बऱ्यापैकी पाणीसाठा साचलाय; भर दुष्काळातही हा पाणीसाठा मला जिवंत ठेवील यात शंका नाही. मी इकडुन तिकडुन जमवलेल्या या पाणीसाठ्यात आता ईतरांनीही पाईपलाईनी टाकल्या आहेत. शब्दांच्या आणि विचारांच्या पाईपलाईनींचे हे अखंड जाळे असेच वाढत जावो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : ०५ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...