Thursday, May 4, 2017

| साधी माणसं ©

शेळके बापु गरड बापुंना म्हणत आहेत, "च्यायला ह्ये आवकाळ गाबणं कधी संपतंय कुणास्ठाव, किर्तीका, रोहिण्या कधी सुरू व्यत्यान्या आसं झालंय".
बापु, यंदा जवारी जरा निवांत पेरावी म्हणतुय "आगात धाऊन, रबी पडुन" म्हंत्यात तसं; पण औदांची लेकरं पार सटी सक्रातीपतोर पेरत्याती राव. च्यायला ह्या प्रिरतीमीनी समदं चकीरच बदलुन टाकलंय बगा...मग थोडासा पाॅझ घेऊन आमच्या घराच्या दारातल्या वडाच्या झाडाकडं बघुन "औंदा नाय काय फटं हाणायचं?"
शेळके बापुंकडे मळणी यंत्र आहे त्यांचा तो पारंपारीक व्यवसाय आहे म्हटलं तरी चालेल. आयुष्यात जवारीची पहिली मळणी मी यांच्याच मशनीवर बघीतली. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायावर त्यांच्या मुलासह नातवानेही पकड बसवली आहे. हा सर्व प्रपंच शेतकरी, पाऊस आणि पिकांवर अवलंबुन असल्याने त्यासंदर्भातला त्यांचा अभ्यास तगडा आहे.
हि दोन जिगरी दोस्त मंडळी सांच्यापारी रोज आमच्या दारात गप्पा हाणत बसतात. यात त्यांच्या काळातल्या आठवणींना रोजच उजाळा दिला जातो. काही झालं तरी हरिणाम सप्त्याचा, भजनी मंडळाचा आणि ह.भ.प महाराजांचा विषय चर्चील्या शिवाय यांच्या गप्पा पुर्णच होत नाहीत. आज नुकताच अवकाळी पाऊस पडुन गेलता म्हणुन वरिल विषय ऐकायला मिळाला. अधुन मधुनही  मला वेळ मिळेल तसा त्यांचे जुनात साहित्य मी अनुभवत असतो. जे कोणत्याच पुस्तकात वाचायला मिळत नाही ते मला या दोन बापुंच्या गप्पांत मिळते. हल्लीच्या माॅडर्न घरांच्या रचनेत म्हाताऱ्या माणसांचे स्थान गायब झालंय. बहुतांशी जणांना त्यांचा सहवास आवडेनासा झालाय म्हणुनच वृद्धाश्रमे हाऊसफुल्ल झालीत.
घरातल्या वृद्धांनी खुप दिवस बघीतलेले असतात म्हणुनच घराचा बंगला झाला आणि दारात गाडी आली तरी त्यांच्यातला  साधेपणा तसाचं जिवंत राहतो. अशी साधी माणसं घरात असली कि लहान मुलांना संस्काराची टिव्हिशन लावायची गरज पडत नाही, हे काम आजी आणि आजोबा खुप मस्त करतात. सरतेशेवटी एवढंच वाटतं कि, घरात संस्कार शिकवणारी चार पुस्तके कमी असली तरी चालतील पण संस्कार सांगणारी एक दोन तरी बुजुर्ग माणसे असायलाच हवीत.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...