Sunday, May 7, 2017

| सुखद ©

काल सुखदेवचा फोन आला "विशाल माझ्या मुलीचे बारसे आहे उद्या तुझी उपस्थिती हवी आहे मला" सुखदेव नारायणकर हा माझा लहाणपणीचा दोस्त. आमच्या वयात फारसं अंतर नाही फक्त मी शाळेत असताना तो काॅलेजला होता एवढंच. पत्रकारीता पेशा असणारा सुखदेव आता मुंबई मंत्रालयात नोकरीला लागलाय यापुर्वी तो लोकमतच्या गोवा आवृत्तीचा उपसंपादक होता. काही दिवसांपुर्वीच नारायणकर दांम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झालंय. तिच्याच बारशासाठी आज तिच्या आईबापानं आख्खी गल्ली सजवली होती. मी देखील आज दिवसभराचे कार्यक्रम आटोपुन संध्याकाळी आमच्या पांगरीच्या या ढोर गल्लीत सुखदेवच्या घरी आवर्जुन हजेरी लावली. पाळण्याशेजारीच टेबल मांडुन मस्त स्नेहभोजनाची तयारी केलेली. जेवताना ताट वाट्या पाहुण मी जरा आश्चर्यच व्यक्त केले कारण अशा समारंभांना सगळीकडेच थर्माकाॅलच्या पत्रवळ्यांचा सुळसुळाट असताना सुखदेवने मात्र ताट वाट्याचा बेत का बरे आखला असावा; त्याला विचारल्यावर तो म्हणला. कि "माझ्या पोरीच्या कार्यक्रमामुळे कुठेतरी घाण झालेली मला नाही आवडणार म्हणुनच हा अट्टाहास". एवढंच नाही जेवणानंतर ताटात शिल्लक राहिलेले अन्न मुतारीत वाया जाऊ नये म्हणुन खरखटं एकत्र करण्यासाठी एक भगुणं ठेवलेलं. ताटं धुण्यासाठी एक, पुसण्यासाठी एक, आणि वाढण्यासाठी स्वतः सुखदेव व त्याच्या गल्लीतली दोस्त मंडळी.
पुरी,भात-वरण,बैंगन,बटाटा,जिलेबी,गुलाबजामुन, आणि कोशिंबीर असा पंच पक्वानी मेनु खाऊन तृप्त झालो. पंक्तिला सोबत प्रविण डोके आणि अमोल लोहार होतेच. खरंतर सुखदेव आणि अनुराधाने त्यांच्या मुलीचे नांव #सांची ठेवलंय. बारसं वगैरे तर मित्रांना व आप्तेष्टांना जथेच्छ जेऊ घालायचे निमित्त होते. परंतु या जोडप्याने स्वच्छतेच्या बाबतीत पाळलेली आचारसंहीता जर सर्वांनी पाळली तर नक्कीच कुणाच्याही मुतारीत अन्नाचे कण दिसणार नाहीत आणि रोडच्या कडेला व नदीत युझ अॅण्ड थ्रोचे ढिग दिसणार नाहीत. थोडे जास्त कष्ट करू पण जेवण ताट वाटीतच देऊ या सुखदेवच्या विचारांस माझा सलाम.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...