Friday, May 12, 2017

| आंबेराणी ©

हि आहे मामाच्या गावाला येऊन शेतातल्या आंब्यावर यथेच्छ ताव मारणारी "स्वरा" म्हणजेच माझी भाच्ची. हि दिसायला जितकी गोड आहे त्याहुन जास्त बोलायला मधुर आहे. म्हणुनच अशी फळे खाताना तिला पाहिलं कि एक गोड फळ दुसऱ्या एका फळाला खात असल्याची जाणिव होते. सई, स्वरा आणि गौरांग या माझ्या भांजे कंपनीने सध्या घरात धुमाकुळ घातला आहे. आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यामुळे उन्हाळा सुट्टीत सगळ्या बहिणींची आणि आत्यांची लेकरं आली कि घर हाऊसफुल्ल होऊन जातं. मुदपाकखाण्यातली लगबग जरा जास्तच वाढते. त्यात शेतातले आंबे घरी आणुन जुन्या वाड्यात पिकु घातलेले असतात त्याच्या दरवाज्याला कुलुप लावुन चावी आमच्या आबांकडे असते. आंब्याच्या सिझनमध्ये आबांकडे वशीला लावावा लागतो तेव्हाच मनसोक्त आंबे खाता येतात. आबांच्या गैरहजेरीत जर चुकुन चावी हाती लागली कि हेच आंबे चोरून खाण्यासाठी पाहुणेमंडळींसोबत मी लहाणपणी त्या वाड्यावर दरोडा टाकायचो. एक जणाला दरवाज्याजवळं बसवायचं अन् दुसऱ्याला घरातला अंदाज घ्यायला घरी थाबवायचं. एक बॅटरी घेऊन अंधारलेल्या खोलित प्रवेश व्हायचा, त्या खोलितला पिकलेल्या आंब्याचा वास घेऊन तोंडाला पाणी सुटायचं. उसाच्या वाळलेल्या पाचटाखाली ठेवलेले आंबे अलगद दाबुन बघायचे.
शेंद्र्या, साखरगोटी, आंबडगोटी, लालगोटी, शेप्या, खसखशा, केळ्या, आणि कलमी हे आमच्या शेतातलं गाजलेले आंबे याच खोलित वेगवेळ्या खुत्त्यात पिकु घातलेले असायचे. सगळ्या खुत्त्यातलं चार-दोन, चार-दोन आंबे उचलुन पुन्हा पाचट जैसे थे स्थितीत ठेऊन. कुलुपाची चावी जिथे सापडली तिथेच अडकवुन आम्ही घरासमोरील वडाच्या झाडावर चढुन आंबे खायचो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या कुया सुद्धा उकिरड्यात पुरून टाकायच्या कारण आंबेचोरांनी चोरी केली हे आबाला कळलं कि आमची खैर नसायची, परंतु आता मात्र आबा स्वतःहुनच त्या आंब्याची टोपली समोर आणुन ठेवतात आणि म्हणतात "खावा काय खायचंय ती" तेव्हा आंबे चोरून खाता येत नसल्याची खंत मनात वाटते.
आज स्वराला पाहुण मला माझे लहाणपण आठवले. परंतु शहरीकरणाच्या नादात आणि जाहिरातींच्या विळख्यात अडकलेली सध्याची लहान लेकरं कॅडबरी खाण्यात व्यस्त असताना. मामाच्या गावाला जाऊन शेतातलं आशिल आंबे खाण्याची परंपरा काहीअंशी अजुनही टिकुन असल्याचे समाधान वाटते.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...