Sunday, May 28, 2017

| गावरान कोंबडा ©

ह्यजं नुसतं नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतंय, व्हय, गावाकडं दहा बारा कोंबड्या सोबत घिऊन उकिरडं हुंगणारा आशील बेण्याचा गावरान कोबडा खायची मजाच ईगळी हाय राव.
प्युवर नाॅनव्हेज माणसांचा हा खेडेगावातला एकदम आवडीचा खाद्यपदार्थ, गावरान कोंबड्याच्या चिकनपुढं तर मटान आन् मच्छी; दुनीबी फिक्कच. सध्या रोजची धावपळ काल शांत झाली तवा माझा नेहमीचा आड्डा म्हंजी धनगरवाडीला कालच्या राती उशीराच बेत आकला, आगळगांवचा माझा आवडता मास्टर शेफ अमोल बावकरनं आवतान धाडलं आन् गावरान कोंबडा खायला म्या पांगरीहुन निघुन धनगरवाडी गाटली. कापा कापी आन् कांडा कुटा करायला रातीच्या साडे दहा वाजल्या, कोंबडा शिजायला लई झार आसतंय तवा सरपान जरा जास्तच गोळा केलतं. पण रातीला वारं जणु ताशी ऐंशीच्या स्पीडनं चालू व्हतं. जाळ लागता लागीना आन् लागल्यावर भगुण्याच्या बुडाखाली राहिना. आमोल आन् मावली जाळ लावता-लावता कटाळुन गिली. शिवटी तिन दगडाच्या चुलीच्या कडंनी मोटरीवर झाकायचा पत्रा लावला आणि चुलीला घेरा करून उगं कोंबडा शिजायची वाट बघत बसलाव. शिजोस्तोर सुद्धा दम नव्हता. मध्येच पळी घालुन एकांदा पिस भाहीर काढायचा आन् शिजला का नाही बगतो म्हणत फस्त करायचा. पावकिलो कोंबडा तर आम्ही भगुण्यातच खाल्ला.
शेरवा आटरून गेल्यानं तिखट झाला आन् अचानक पाणी बी कमी पडलं; मग म्या अन् मावलीनं जाऊन बंड्या बावकराच्या हिरीवरून मडक्याची घागर भरून आणली. काळ्याकुट्ट अंधारात हातात माॅबाईलची बॅटरी धरत नांगरटितनं रस्ता काढत-काढत बंड्याबापुच्या हिरीत उतरून पाणी आनुस्तोर आमोलरावनी हिकडं कांदा, लिंबु, आन् टंबाट्याचं सॅलड तयार करून ठिवलं. ज्या चिचंखाली आमची तिन दगडाची चुल व्हती तीलाच लागुन कलींगडाचा फड व्हता. घरचं तिखटं असल्यानं शेरवा जरा जास्तच झंकार झाला व्हता. म्हणुन जेवना आधीच लालभडक दोन टरबुज खाऊन पोटात लागलेली आग ईजिवली. पाणी प्यालाच न्हाऊ, नुसती टरबुजं खाऊनच तहान भागीवली.
कायबी मना पण फाईव्ह स्टार हाटेलातल्या पेक्षा भारी मजा तिन दगडाच्या चुलीवर शिजीवल्याला गावरान कोंबडा खायला यीती. मम्बई मदल्या सचिन तिंडुलकरच्या फाईव्ह स्टार हाटेलात बी म्या जिवलुय तरिबी आम्ल्याच्या हातची चवच न्यारी हाय राव. माझं बरंच लहाणपणं धनगरवाडीवर आम्ल्या सोबत पार्ट्या करण्यात गेलंय. आता जरा बीजी झालोय पण तेवढ्यातुनबी कधीतरी असा गावरान कोंबडा खायला म्या जातोच.
पिण्यासाठी बाजुला काढलेल्या सुपाच्या वाटीचा फुर्रर्रकाऽऽ मारित-मारित शेरव्यात चुरल्याली जवारीची भाकर खाऊन तृप्त झालाव. पुन्हा थोड्या येळानं आजुन एक टरबुज चिरलं आन् त्येजा बी फडशा पाडत राच्च्या बारा वाजता एका तळवटावर मोठ्ठ चवाळं पांघरून तिघंबी घुमटुन घिऊन झोपलाव.
सु.....ऽ॥ऽऽ, सु.....ऽ॥ऽऽ
 
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मे २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...