Thursday, June 8, 2017

| पौस ©

शेतकऱ्याला मानसिक श्रीमंती बहाल करणारा निसर्गाचा सर्वात अद्भुत आणि हुकमी घटक म्हणजेच पाऊस होय. आज पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने उक्कडगांवच्या नदीला पुर आला आहे. अशातच काॅलेजची ड्युटी आटोपुन घराकडे निघताना या नदीतुन गाडीवरून येत असताना माझी खुप पंचाईत झाली. वास्तविक पाहता पुर आलेल्या नदीवरून वाहन घालणे हे अतिशय धोक्याचे असते परंतु पुर ओसरल्यानंतर पिंडरीएवढं पाणी वाहत असतानाच मी गाडी घालण्याचे धाडस केले. हि काळजी सर्वांनीच घ्यायला हवी कारण वाऱ्याच्या आणि पाण्याच्या वेगापुढं माणसाने बनवलेल्या सगळ्याच वस्तु गवताच्या काडीसारख्या वाहत जाऊ शकतात.
नदीच्या पुराची तिव्रता लक्षात घेऊन मी खुप वेळ नदीतिरावरच थांबणे पसंद केले शेवटी जेव्हा एक जण व्यवस्थितपणे बाहेर पडला तेव्हा मी पण पायातले साॅक्स मिटरजवळच्या खोबणीत कोंबले, बुटाडं ब्रेक आणि क्लचच्या वायरीत अडकवले आणि पॅन्ट जाईल तेवढी वर सरकवुन आभाळातुन पडलेल्या या तांबड्या अमृतावरून मी माझी गाडी यशस्वीपणे बाहेर काढली.
हे वाहणारं पाणी दिसायला जरी गढुळ असलं तरी गावाबाहेरच्या डोंगरातुन व बरडाऊन वाहुन आलेलं स्वच्छ पाणी आहे. पुढे हिच नदी गावच्या कडेने जात पाथरीच्या तळ्याला भेटते. गेल्या वर्षभरात साचलेली घाण आणि गावचा कचरा पोटात घेऊन गावकुस स्वच्छ करून हि नदी पुढे-पुढे जात राहते. माझ्या मते स्वच्छ भारत अभियानात सर्वात प्रभावी आणि प्रामाणिक कामगीरी जर कुणाची असेल तर ती अशा नद्या व नाल्यांचीच आहे.
आपल्या शरिरातली एखादीजरी रक्तवाहिणी चोकअप झाली तरी आपल्याला हार्टअटॅक येतो, असंच काहीसं या निसर्गाचे सुद्धा असेल असे मला वाटते. नद्या नाल्यांमध्ये जर आपणही वर्षभर सगळ्या गावाची आणि शहराची घाण टाकत राहिलो तर एक दिवस ते सुद्धा चोकअप होऊन निसर्गाला अटॅक येऊ शकतो जो मनुष्य जातीला कधीच परवडण्यासारखा नसेल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ जून २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...