Thursday, June 29, 2017

| अज्ञानाचा बळी ©

पर्वा आमच्या पांगरी जवळील कुसळंब या गावी एका महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केली. हि बातमी समजल्यावर मन सुन्न झालं परंतु या घटनेचा तपशिल जेव्हा आमच्या पांगरीचे पत्रकार गणेश गोडसे यांच्या बातमीत वाचला तेव्हा तर अज्ञानाच्या धुंदीत अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांबद्दल माझ्या मनात तिव्र राग निर्माण झाला.
सदर मयत स्रीला दोन मुली झाल्या म्हणुन तिच्या सासरच्या माणसांकडुन तिचा अतोनात छळ सुरू होता. याच छळास कंटाळुन विहिरीजवळ स्वतःच्या एका पाच वर्षाच्या व दुसऱ्या तिन वर्षाच्या मुलीला साडीने बांधुन त्या विवाहित स्रीने विहिरीत उडी घेऊन जिवनयात्रा संपवली. या बातमीचे विश्लेषण मी एक आत्महत्या आणि दोन खुन असेच करेल. कारण त्या दोन चिमुरड्यांना मरायचं नसतानाही आईने स्वतःच्या कुशीत घेऊन जलसमाधी घेतली हे प्रचंड ह्रदयद्रावक आहे.
प्रगत आणि शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडणं खरंच लाजिरवाणं आहे. एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता शंभर टक्क्याहुन पुढे चालली तर दुसरीकडे याच समाजात राहणाऱ्या काही लोकांना नेमकं बायकोला मुलगा होत नसेल तर दोष कुणाचा ? याचं उत्तर ठाऊक नाही. टि.व्ही वर नाही तसल्या बावळट जाहिराती दाखवुन स्वतःचे प्रमोशन करणाऱ्या सरकारने स्रीला मुलगा वा मुलगी होण्यास कोण जबाबदार असतो याची एखादी जरी जाहिरात सह्याद्री वाहिणीवरून प्रक्षेपीत केली तरी अडाणी आणि अज्ञानी माणसांचे डोळे उघडतील व अशा घटनांना आळा बसेल.
मी माझ्या प्रत्येक व्याख्यानातुन स्री भ्रुणहत्या आणि समाजातील स्रीचे महत्व या विषयांना जाणिवपुर्वक स्पर्श करत आलोय. सध्याच्या समाजातील अशा प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी त्यांना समजेल ईतक्या गावरान भाषेत व्यक्त होत आलोय. परंतु अशी एखादी दुर्दैवी बातमी ऐकुण मन सुन्न होतं.
पारावर बसुन मोदीचे राजकारण, अमेरीकेची मैत्री, राष्ट्रपतीची निवडणुक, उपग्रह प्रक्षेपन असल्या बातम्या वाचुन घरी आल्यावर मात्र तुला मुलगाच का होत नाही म्हणुन स्रीला छळणाऱ्या, त्या व्यक्तीला दोष द्यावा, का त्याच्या अज्ञानाला हेच कळत नाही.
जे कोणी बायोलाॅजी शिकतात त्यांनाच याची सविस्तर माहिती असते परंतु अजुनही आपल्या समाजात असे कित्येक लोक आहेत कि ज्यांना वाटते मुलगा वा मुलगी होणे हे सर्वस्वी स्रीवरच अवलंबुन असते. ही गोष्ट किती खोटी आहे हे निदर्शनास आणने आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.
एखाद्या स्रीला मुल होण्यासाठी जेवढा पुरूष जबाबदार असतो तितकाच तो मुलगा वा मुलगी होण्यासाठीही जबाबदार असतो हे एक वैज्ञानिक सत्य आहे. ग्रामिण भागात यावर चर्चासत्रे, व्याख्याने, शिबीरे, आयोजित केल्याने तसेच दुरचित्रवाणी व रेडीओ वरील जाहिराती आणि सोशल मेडीयावर याबाबत जनजागरन केल्याने कदाचित हे सत्य तळागाळापर्यंत पोहचेल; अन्यथा अशा आत्महत्या पुढेही होतच राहतील फक्त एका अज्ञानामुळे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २८ जून २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...