Saturday, June 17, 2017

| पांघरून ©

हिरव्यागार आंथरूनावरचं तुझं हे पाणीदार पांघरून असंच राहु दे, तुला गार वारा लागुन त्यातुन असंख्य धारा वाहु दे, चिंब चिंब भिजवलंस तु नदी नाले दुथडी भरलेत, शेतातले बांध आता ओसंडुन वाहिलेत.
काल काॅलेजहुन पांगरीला येत असताना उक्कडगांवच्या घाटावरून पांगरी शिवाराच्या अंगावरचं हे निसर्गाचे पांघरून पाहुन वरील शब्द आपसुकच उमगले. असा निसर्गाचा आविष्कार दिसला कि माझ्या मनातली हिरवळ गवतावनी हुरळुन जाते. यातुनच शब्दांचा कल्लोळ डोक्यात धिंगाणा घालायला लागतो. या साऱ्या शब्दांना एका परिच्छेदात मांडता मांडता नाकी नऊ येतात पण प्रयत्न थांबवणे रक्तातच नसल्याने त्या हरएक शब्दांना लाईनीत लावण्यासाठी मेंदुची शिस्त अविरत सुरूच असते म्हणुनच दोन दिवसांच्या गर्भकाळानंतर हा परिच्छेद छायाचित्रासह आपणापर्यंत पोहचलाय.
डोळ्यांनी पाहिलेली निसर्गाची अद्भुत कलाकृती आपल्या कवीमनाला सदैव ढुसण्या मारित असते. जोपर्यंत त्या घुसळण्यातुन शब्दरूपी लोणी बाहेर पडत नाही तोपर्यंत हे असंच सुरू असते. कधी कधी एका सेकंदात सुचणारा शब्द, दिवसभर विचार केल्यावर देखील सुचत नाही.
काल दिसलेलं हे काळेकुट्ट आभाळ जणु बाष्प स्वरूपात हवेत तरंगणारे एक तळेच होते. जर यांना वेळेतच थंड वारा झोंबला तर बोराच्या आटुळी एवढ्या थेंबांचा पाऊस पडुन अवघ्या तास दोन तासातच नद्याला पुर येतो. शेतकरी राजाचं सर्वात आवडतं पांघरून म्हणजेच हे पाण्याने भरलेले ढग असतात, ते नुसतं दिसुन उपयोग नसतो त्याला बरसण्यासाठी गार वारा पण लागतो आणि गार वारा निर्माण होण्यासाठी त्याला झाडं लागतात. आसल्या रौद्र ढगांना पाझर फोडण्यासाठी झाडे लावलीच पाहीजे. सरतेशेवटी "पाणी आडवा, पाणी जिरवा" या सोबतच "झाडे लावा, पाणी पाडा" हे सुद्धा अग्रक्रमाने महत्वाचेच.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ जून २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...