आज काॅलेजहुन येताना आमच्या पांगरीच्या काळ्या मारूतीजवळ असलेल्या मृदगंद अॅग्रो प्रोड्युस कंपनीच्या रोडटच बोर्डावर बार्शीचे जाधव पेंटर खुर्चीवर उभा राहुन हातात ब्रश घेऊन रंगकाम करताना दिसले. तिथुन जाताना माझ्या गाडीचा वेग जेवढा जास्त होता तेवढ्याच वेगाने पेंटरचे रंगकाम पाहुन मी दहा वर्ष मागे गेलो; कारण अशा गोष्टी हल्ली दुर्मिळच पहायला मिळतात. रोडवरून जाताजाताच सर्रकन गाडी वळवुन मी त्यांच्या जवळ जाऊन सेल्फी घ्यायलो. वसाड माळावर एवढ्या आवर्जुन माझ्या सारख्या कलाकारासोबत ह्यो कोण बरं फोटो काढत आसलं ? असं त्यांना वाटलं, तेवढ्यात मी त्यांना माझी ओळख सांगुन गप्पा माराय लागलो. बार्शीचे सुप्रसिद्ध पेंटर राम गरड हे आमच्याच खान्दानातले त्यांच्या कुंचल्यातुन साकारलेली जिवंत अक्षरे अजुनही सबंध बार्शीत दिसतील. आजही कुठे सुंदर ऑईलपेंट वर्क पाहीले कि कोपऱ्यात त्या पेंटरचे नांव शोधायला नजर धडपडत असते. माझे हे बोलणे ऐकुण त्यांनीही त्यांचे काही अनुभव मला सांगितले.
आजच्या डिजीटल होर्डींगच्या जमान्यात जाधव पेंटर सारख्या कितीतरी हरहुन्नरी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष टिकणाऱ्या ऑईलपेंट वर्क ऐवजी काही दिवस आयुष्य असलेल्या होर्डींगलाच जास्त पसंदी मिळत असल्याने अशी कामे करणारी माणसं आता क्वचितच दिसत आहेत.
जाधव पेंटर ए.टी.डी. आहेत. गेल्या चाळीस वर्षापासुनचा त्यांचा हा व्यवसाय आहे. "दहा बारा वर्ष्यापुर्वी लई सुकाळ होता. निवडणुक आल्यावर तर रात्रंदिवस कामं उरकत नव्हती पण आता कधीतरीच डिजीटल लावुन लावुन कटाळल्यावर आमच्यासारख्याला असा एकांदा बोर्ड रंगवायचं काम मिळतंय" असे ते सांगत होते. मोजक्याच पैशात पुढील दहा विस वर्ष न पुसणारं नांव; ही पेंटर मंडळी त्या बोर्डावर छापतात. कलाकाराच्या कुंचल्यातुन साकारलेली सुबक व उठावदार अक्षरे दिर्घायुषी असतात परंतु होर्डींगवरची नावे मात्र काही दिवसातच उडुन जातात.
अगदी काही महिन्यांपुर्वी घरात लग्नकार्य असले की मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजुला भालदार चोपदार काढले जायचे परंतु डिजिटल इंडीयात मात्र ते सुद्धा आता डिजीटलवरच छापुन मिळायलेत. अवघ्या काही मिनिटात आपल्याला हवे असे आणि पायजेल तितक्या प्रमाणात हे डिजीटल सहज उपलब्ध होत असल्याने लगीनसराईतली पेंटरची कामे संपली. भव्य दिव्य होर्डींग्जमुळे आणि आधुनिक छपाई यंत्रणेमुळे निवडणुकीची कामे संपली. परंतु जे जितक्या लवकर निर्माण होते त्याचे आयुष्यही त्याच्या निर्मितीच्याच पटीत असते हे ही तितकच खरं.
जुन्या पेंटर मंडळींना त्यांच्या तत्कालिन अभ्यासक्रमात ब्रश आणि रंगांचे प्रशिक्षण मिळाले होते परंतु कम्पुटर मधल्या कोरल ड्राॅ आणि अॅडाॅब फोटोशाॅप या साॅफ्टवेअर मध्ये ब्रश लागत नाही, ना रंग; फक्त ते हाताळण्याचे ज्ञान लागते. जलद गतीने धावणाऱ्या या बहुरंगी जगात टिकुन राहण्यासाठी आपल्या पिशवीत असलेल्या खडु, पट्टी, ब्रश आणि रंगांच्या डब्यांसोबतच फोटोशाॅप अपलोडेड लॅपटाॅप सुद्धा असणे आता तितकेच गरजेचे आहे.
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० जून २०१७