Friday, January 26, 2018

माझ्या राजाची नजर खाली का ?

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते. मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.
महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.
ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ जानेवारी २०१८ 




Tuesday, January 23, 2018

| गुडदानीवाला ©

लहानपणीचा गुडदानीवाला आज अचानक स्टॅण्डवर दिसला. गणेश देशमुख त्यांचे नांव. सडपातळ बांधा, सावळा रंग, थोडे केस गेलेले, थोडी पांढरी दाढी वाढलेली, नेहमीच मळलेला तीन गुंड्याचा (ज्या कधीच न लावलेल्या; कारण शर्ट शिवताना फक्त फाॅरमॅलिटी म्हणुन लावलेल्या पण नंतर त्या काज्या आणि गुंड्यांची कधी भेटच नव्हती झालेली) भाया सारलेला शर्ट आणि ढगळी विजार असा पोशाख. तिच सायकल आणि त्याच वायरच्या पिशव्या फक्त त्यात आता गुडदानी नव्हती. दिवसभर गोळा केलेलं भंगार सायकलच्या कॅरेजवर रबराने ताणुन बांधलेले. नळीच्या मध्ये प्लॅस्टीकचे तुटलेले पाईप, लोखंडी वाकडे तिकडे चेंबटलेले पत्रे ठेवलेले. सायकलवर फक्त दोन्ही हॅण्डलला हाताने धरता येईल एवढीच जागा अशातच हे गुडदानीवाले मामा "अऽऽएए लोखंड पत्रेयययय" अशी आरोळी ठोकत आमच्या पांगरीच्या हरएक गल्ली बोळातुन फिरायचे. त्यांची हि आरोळी आजही जस्सीन तस्सी कानात कैद आहे. लहानपणी घरात एखादा लोखंडाचा तुकडा पडलेला असला आन् या गुडदानीवाल्या मामाची आरोळी ऐकली की तोंडाला पाणी सुटायचे.
तब्बल ४२ वर्ष भंगार गोळा करून यशस्वी संसार जोपासलेल्या या गुडदानीवाल्या मामांना पाच पोरी आणि दोन मुले आहेत यापैकी पाचही मुलींची लग्न आणि प्रत्येकीची दोन बाळंतपण या गण्या मामाने याच व्यवसायावर केली. संसार यशस्वी करायला नोकरीच लागते असे काही नाही तो कष्टावर सुद्धा यशस्वी उभा राहू शकतो हेच गण्यामामाने दाखवून दिले. या गुडदानीवाल्या गण्या मामाची आख्खी हयात प्लॅस्टीक, पत्रे, लोखंड आणि बाटल्या गोळा करण्यात गेली पण त्यांच्यातला प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद थोडीही कमी झाली नाही. आज खुप दिवसांनी भेटलेल्या या गुडदानीवाल्या मामांना श्रीराम आप्पाच्या हाॅटेलात चहा पाजला. सोबत राहूल पवार होताच. खुप वेळ चाललेल्या आमच्या आपुलकीच्या गप्पात लहाणपणीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकीकडे गण्यामामा सारखे ६७ वर्षाचे तरूण आजही गल्ली बोळातुन भंगार आणि प्लॅस्टिक गोळा करून रोजगार मिळवत आहेत आणि दुसरीकडे २०-२५ वर्षाचे म्हातारे बेरोजगारीची कारणे सांगत बापाच्या जिवावर रेघोट्या मारत आहेत.


लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ जानेवारी २०१८ 




Sunday, January 21, 2018

| कंडक्टर ©

आज बऱ्याच दिवसानंतर बार्शी ते पांगरी असा एस.टी.प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहुन बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातुन माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले आता कंडक्टर येऊन तणतण करतंय काय की; पण झाले उलटेच त्या दरवाज्यातुन काका, मामा, दादा थोडी जागा द्या म्हणत एक ऐण पंचवीशीतले कंडक्टर गाडीत चढले. गाडीतर माणसांनी भरून वाहत होती अशात कंडक्टर सिट तरी थोडीच रिकामी राहणार; तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या. कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या तेवढ्यात कंडक्टर बोलले "बसा आज्जी मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशनीवर बटने दाबुन लगेच तिकीट फाडुन ते म्हणले "द्या तेवीस रूपये". माझ्याकडे बरोब्बर बावीस रूपये होते. एक रूपया शोधुन सापडेना तेव्हा कंडक्टर मला म्हणाले "राहुद्या नसला तर मी भरतो". त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहुन मी सुखावलो. एकुणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमिटरच्या प्रवासात जाणवली. हितुन तिथुन माझ्यासोबतच उभा राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी द्याल का तुमच्या सोबत ?" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले. मी सर्वांना सांगीतले "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो म्हणुन सेल्फी काढतोय." सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुण प्रवासाचा शिन निघून गेला. गाडीतुन खाली उतरून दरवाजा ढकलला तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जिवन प्रवासात असाच आनंद देत घेत आलोय म्हणुनच या प्रेमाचा हकदार झालोय.
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस.टी.ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, कंडक्टरचे खुप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहुन जास्त ग्रमिण भारत यांच्याच जिवावर हिकडुन तिकडं आन् तिकडुन हिकडं फिरतंय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजुनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला. तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यातुन गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वहायचे आणि यातुनही प्रवासी देवो भवः म्हणायचे. खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रूपयाच्या मदतीचा नव्हता ती करण्या मागच्या वृत्तीचा होता. विषय सिटवर बसण्याचा नव्हता तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता. विषय हक्काच्या जागेचा नव्हता, हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता. विषय तिकिटाचा नव्हता ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता. विषय सेल्फीचा नव्हता आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता. विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, एका माणसाच्या माणुसकीचा होता.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ जानेवारी २०१८




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...