Sunday, January 21, 2018

| कंडक्टर ©

आज बऱ्याच दिवसानंतर बार्शी ते पांगरी असा एस.टी.प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहुन बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातुन माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले आता कंडक्टर येऊन तणतण करतंय काय की; पण झाले उलटेच त्या दरवाज्यातुन काका, मामा, दादा थोडी जागा द्या म्हणत एक ऐण पंचवीशीतले कंडक्टर गाडीत चढले. गाडीतर माणसांनी भरून वाहत होती अशात कंडक्टर सिट तरी थोडीच रिकामी राहणार; तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या. कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या तेवढ्यात कंडक्टर बोलले "बसा आज्जी मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशनीवर बटने दाबुन लगेच तिकीट फाडुन ते म्हणले "द्या तेवीस रूपये". माझ्याकडे बरोब्बर बावीस रूपये होते. एक रूपया शोधुन सापडेना तेव्हा कंडक्टर मला म्हणाले "राहुद्या नसला तर मी भरतो". त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहुन मी सुखावलो. एकुणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमिटरच्या प्रवासात जाणवली. हितुन तिथुन माझ्यासोबतच उभा राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी द्याल का तुमच्या सोबत ?" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले. मी सर्वांना सांगीतले "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो म्हणुन सेल्फी काढतोय." सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुण प्रवासाचा शिन निघून गेला. गाडीतुन खाली उतरून दरवाजा ढकलला तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जिवन प्रवासात असाच आनंद देत घेत आलोय म्हणुनच या प्रेमाचा हकदार झालोय.
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस.टी.ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, कंडक्टरचे खुप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहुन जास्त ग्रमिण भारत यांच्याच जिवावर हिकडुन तिकडं आन् तिकडुन हिकडं फिरतंय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजुनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला. तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यातुन गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वहायचे आणि यातुनही प्रवासी देवो भवः म्हणायचे. खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रूपयाच्या मदतीचा नव्हता ती करण्या मागच्या वृत्तीचा होता. विषय सिटवर बसण्याचा नव्हता तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता. विषय हक्काच्या जागेचा नव्हता, हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता. विषय तिकिटाचा नव्हता ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता. विषय सेल्फीचा नव्हता आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता. विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, एका माणसाच्या माणुसकीचा होता.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ जानेवारी २०१८




No comments:

Post a Comment

आरोग्यदायी तुकाराम

​ दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या  धडक कारवाईमुळे शक्य ...