Tuesday, January 23, 2018

| गुडदानीवाला ©

लहानपणीचा गुडदानीवाला आज अचानक स्टॅण्डवर दिसला. गणेश देशमुख त्यांचे नांव. सडपातळ बांधा, सावळा रंग, थोडे केस गेलेले, थोडी पांढरी दाढी वाढलेली, नेहमीच मळलेला तीन गुंड्याचा (ज्या कधीच न लावलेल्या; कारण शर्ट शिवताना फक्त फाॅरमॅलिटी म्हणुन लावलेल्या पण नंतर त्या काज्या आणि गुंड्यांची कधी भेटच नव्हती झालेली) भाया सारलेला शर्ट आणि ढगळी विजार असा पोशाख. तिच सायकल आणि त्याच वायरच्या पिशव्या फक्त त्यात आता गुडदानी नव्हती. दिवसभर गोळा केलेलं भंगार सायकलच्या कॅरेजवर रबराने ताणुन बांधलेले. नळीच्या मध्ये प्लॅस्टीकचे तुटलेले पाईप, लोखंडी वाकडे तिकडे चेंबटलेले पत्रे ठेवलेले. सायकलवर फक्त दोन्ही हॅण्डलला हाताने धरता येईल एवढीच जागा अशातच हे गुडदानीवाले मामा "अऽऽएए लोखंड पत्रेयययय" अशी आरोळी ठोकत आमच्या पांगरीच्या हरएक गल्ली बोळातुन फिरायचे. त्यांची हि आरोळी आजही जस्सीन तस्सी कानात कैद आहे. लहानपणी घरात एखादा लोखंडाचा तुकडा पडलेला असला आन् या गुडदानीवाल्या मामाची आरोळी ऐकली की तोंडाला पाणी सुटायचे.
तब्बल ४२ वर्ष भंगार गोळा करून यशस्वी संसार जोपासलेल्या या गुडदानीवाल्या मामांना पाच पोरी आणि दोन मुले आहेत यापैकी पाचही मुलींची लग्न आणि प्रत्येकीची दोन बाळंतपण या गण्या मामाने याच व्यवसायावर केली. संसार यशस्वी करायला नोकरीच लागते असे काही नाही तो कष्टावर सुद्धा यशस्वी उभा राहू शकतो हेच गण्यामामाने दाखवून दिले. या गुडदानीवाल्या गण्या मामाची आख्खी हयात प्लॅस्टीक, पत्रे, लोखंड आणि बाटल्या गोळा करण्यात गेली पण त्यांच्यातला प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद थोडीही कमी झाली नाही. आज खुप दिवसांनी भेटलेल्या या गुडदानीवाल्या मामांना श्रीराम आप्पाच्या हाॅटेलात चहा पाजला. सोबत राहूल पवार होताच. खुप वेळ चाललेल्या आमच्या आपुलकीच्या गप्पात लहाणपणीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकीकडे गण्यामामा सारखे ६७ वर्षाचे तरूण आजही गल्ली बोळातुन भंगार आणि प्लॅस्टिक गोळा करून रोजगार मिळवत आहेत आणि दुसरीकडे २०-२५ वर्षाचे म्हातारे बेरोजगारीची कारणे सांगत बापाच्या जिवावर रेघोट्या मारत आहेत.


लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ जानेवारी २०१८ 




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...