Sunday, December 17, 2017

| येळवस ©

मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काळ्या आई प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा एक महत्वाचा सण म्हणजेच येळवस होय. वेळ अमावस्येच्या निमित्ताने सर्व कुटुंब शेतात पुजा वगैरे करून रानजेवन करतात. आजवर पोटाची भूक भागवीलेल्या काळ्या मातीची व शेताची पुजा करून भुकेल्या माणसांना पोटभर जेऊ घालण्याची हि परंपरा लातुरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात आजही सुरू आहे. आज आमचे सहकारी प्राध्यापक श्री. व्हि.आर. उतके सरांनी येळवस चे आमंत्रण धाडलं. औसा तालुक्यातील तांबरवाडीच्या शिवारात मी डिजे देशमुखसह सकाळी लवकरच पोहचलो. पाहुणा म्हणुन व्हि.आय.पी पेक्षा दर्जा पाहुणचार उतके सरांनी ठेवला. लातूर ते तांबरवाडी या प्रवासादरम्यान हरएक टु व्हिलर आणि फोर व्हिलर शहराकडुन शेताकडे जाताना दिसल्या. लातूरचा तर दर्श वेळा अमावस्या हा वर्षातला प्रमुख सण म्हणुनच आजचे लातूर जर हेलिकाॅप्टर मधुन पाहीले तर वारूळातुन मुंग्या निघाल्यासारख्या गाड्या व माणसं गावाकडे जाताना दिसतील. ईथला प्रत्येक माणुस येळवसचे महत्व विलासरावांचा किस्सा सागूनच पुर्ण करतो. लातूरच्या जडणघडणीमध्ये अजरामर स्थान असलेल्या स्व.विलासराव देशमुख साहेब देशाचा कारभार हाकत असतानाही वेळात वेळ काढुन येळवसला बाभळगावात यायचेच.
कुणी बैलगाडीत तर कुणी डोक्यावर मडक्यात रानवाटेवरून आंबील घेऊन जाताना पाहूण मातीशी माणुसकी जोडणारी एक जुनी संस्कृती पाहुण धन्य झालो. ठिकाण्यावर पोहचल्यानंतर एका कोपीमध्ये आणलेले सर्व नैवैद्या ठेवुन पुजा केली आणि नंतर संपुर्ण शेतात आंबील शिंपडत "वलघे वलघे सालम पलघे", "हर हर महादेव" असं म्हणत म्हणत कोपीला प्रदक्षिणा मारून मग जेवणासाठी एका झाडाखाली बसलोत. गप्पा टप्पा मारत आंबील, आंबट भात, भजी, खिर, कोंदीची भाकर, बाजरीच्या भाकरी, पिठाच्या वड्या, वांग्याचे भरीत आणि उंडे असा दशपक्वानी आहार खाऊन तृप्त झालो. जेवनानंतर शिवारात फिरायला गेल्यावर ओढयाच्या आळवनात दोन मधाचे पोळे सापडले. रानातला शुद्ध मध खाऊन झाडाच्या गार सावलीत एक वामकुक्षी घेतली. यथेच्छ आहार, विहार आणि आरामानंतर उतके सरांच्या सर्व कुटुंब सदस्यांचा जिव्हाळा व प्रेम सोबत घेऊन सायंकाळी उशीरा पांगरीकडे प्रयान केले.
पोटात भरलेल्या येळवसच्या जेवणाने मेंदुला शब्दांचा भंडारा लावलाय तेव्हाच हे शब्द इथे अवतरलेत. शहरात बसुन या लोकसंस्कृतीचा ठेवा अनुभवता यावा याचसाठी हा शब्दप्रपंच. आपल्या मराठवाड्याची हि परंपरा अशीच तेजोमय होत जावो हिच लातूरच्या सिद्धेश्वरचरणी प्रार्थना.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ डिसेंबर २०१७ 



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...