Wednesday, November 29, 2017

| कोयतं ©

आज डोंगरातल्या वाटेने एकटाच गाडीवर घराकडे निघालो होतो. सुर्य लवकरच मावळल्याने अंधार पडला होता. गाडीची लाईट पडताच दुरवर काहीतरी चमकलं. गाडी जस जसी जवळ गेली तस तशी पांढऱ्या पोशाखाची अंधुक प्रतिमा स्पस्ट दिसु लागली. एक वृद्ध माणुस हातात धारदार कोयतं घेऊन पाऊलवाटेवर दगडं चुकवत आणि झुडपं हुकवत चालत होता. पांढरं मळकं धोतर त्यावर तिन गुंड्यांचा शर्ट आणि डोक्याला एक गमजा बांधलेला. डोळ्याला फारसं दिसत नसल्याने अंदाजे पावलं टाकत चाललेल्या त्या माणसा मागे; त्याला वाट दिसण्यासाठी मी गाडी हळू-हळू चालवू लाजलो. थोडं पुढे गेल्यानंतर मात्र मी हाक मारून त्यांना थांबवलं.
ओऽऽऽ बाबा, हिकडं कुठं निघालांव आंधारात? बाबा बोलले "ऊस टुळीतला हाय म्या, टॅक्टर आल्तं भरायला म्हणुनशा उशीर झाला. आंधार पडल्यानं डोळ्यास्नी दिसनाय नीट." मग मी म्हणलं "बसा गाडीवर सोडतो राहुट्यांजवळ"
एका क्षणात काष्टा खवुन ते बाबा गाडीवर बसले. तसं पाहीलं तर हातात कोयतं बघुन त्यांना कुणी लिफ्त देण्याचा विषयच नव्हता परंतु हातातल्या हत्याराला घाबरण्यापेक्षा चेहऱ्यावरचा भाव पाहुण त्यांना मदत करणं मला जास्त महत्वाचे वाटले.
गाडीवर बसुन खुप गप्पा टप्पा झाल्या. बाबांचे नांव रामा चव्हाण वय वर्ष ९५, गांव यवतमाळ जिल्ह्यातले पण सध्या उसतोडीसाठी मुक्कामी उक्कडगांवात आलेत. स्वतःच्या गावापासुन शेकडो किलोमिटर दुरवर दिवसाकाठी २०० रूपये मिळवण्यासाठी त्यांनी आज दिवसभर ऊस तोडलाय.
एव्हाणा गाडी उक्कडगांवच्या वड्याजवळ पोहोचली, वड्याच्या काठावर वसलेल्या त्यांच्या झोपड्यातुन धुर निघत होता. गाडीवरून उतरताना बाबांसोबत एक सेल्फी घेतला. अचानक फ्लॅश चमकल्याने बाबांनी मला विचारलं "काय चमकलं ?" मी एका क्षणात उत्तरलो "तुमचं कष्ट चमकलं"
अखेर माझ्या डोक्यावर हात फिरवुन हा ९५ वर्षीय युवक त्याच्या राहुटीकडं निघाला. मी खुप वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत तसाच उभा राहीलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की "वयाच्या ९५ व्या वर्षी काम करणाऱ्या या बाबांच्या कष्टाच्या श्रीमंतीपुढं आपण युवा अवस्थेत करत असलेलं काम खुपच गरिब आहे"

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७



No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...