Wednesday, November 1, 2017

| पाचशे ©

आज सकाळी उठुन आंघुळ बिंगुळ ऊरकुन कापडं घालायला खुलीत गेलो तर काॅलेजचा गणवेश दिसलाच नाय, म्या लगीच हाक मारली " अय आयं, माझा हितला शर्ट कुठाय" आई चुलीवर भाकरी थापत बसली व्हती ती तिथुनच वरडली "आरं काकु आत्ताच कापडं घिऊन गीली नदीला ध्वायला" तिजं हे उत्तर ऐकुण मी पळतच तिज्या जवळ गेलो. "आगं त्या शर्टाच्या खिशात माझी पाचशेची नोट व्हती की" माझं हे शब्द ऐकताच शेजारी दात घासत बसल्याल्या माझ्या लहान बहीणीला आई वरडुन बोलली "अयं रूपाले पळ लवकर जा नदीवर, न्हायतर नोट जाईल बग नदीला वाहून" बहीणीने जरा कटाळाच केला तेवढ्यात आईनं चुली म्होरच्या चरवीत हात धुतलं आन धुमाट नदीवर गिली, यवढ्या गडबडीत पायात पायतान सुद्धा नाही घातलं तिनं, आन् मी म्हागुन वरडत राहीलो फक्त "अयं आयं, राहुदे काकु यील की घिऊन, माझं हे शब्द कदाचित तिला ऐकु सुद्धा आलं नसत्याल एवढ्या गडबडीत ती निघुन गिलती. म्या आपलं चुलीम्होरं बसुन तीची वाट बघत तापत बसलो.
काही येळानं ती भिजलेली पाचशेची नोट घिऊन आई घरी आली. आन् मोठ्यानं म्हणली सापडलं रे ऽऽ, तिज्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन त्या पाचशेच्या नोटंचं मोल तिच्यासाठी किती व्हतं ते समजलं. भाकरी करपीवली म्हणुन पुन्ह्यांदा रूपालीला दोन शिव्या हासडुन लगीच चुलीम्होरं जाऊन तव्यावरची करपल्याली भाकरी काढुन पाचशेची नोट शेकत बसली. एवढं समदं झाल्यावर ती नोट मागायची हिम्मत माझ्याकडं नव्हती तवा गपगुमान गाडीची किक मारली आन् काॅलेजला गेलो. पैशाचं मोल आईच्या या कृतीतुन आसं काय समजलंय की उभ्या आयुष्यात वाह्यात पैसं घालवायची ईच्छा व्हनार नाय.

टिप : सोबतचा फोटो आईच्याच मागं मागं पळत गेलेल्या रूपालीनं काढलाय.

1 comment:

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...