Wednesday, November 15, 2017

| सोन्या ©

सोन्या हा आमच्या पांगरीतला एक निरव्यसणी कष्टाळु पोरगा, याने अकरावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि बारावीत इंग्रजी विषयात नापास झाला. पुन्हा तीनदा प्रयत्न करूनही विषय न निघाल्याने शिक्षणाला कायमचा राम राम ठोकून शेतीवाडी आणि कष्टाची कामे करू लागला. आसपासच्या खेड्यातल्या आठवडीबाजारात माळवं विकणे व प्रचंड ताकदीची कामे करणे  हे त्याच्या रोजच्या वेळापत्रकाचा भाग आहे. आज जेवन आटोपुन गावची हालहवा जाणून घ्यायला राहूलच्या टपरीवर गेलो होतो. गावपातळीवर या सारखं माहिती केंद्र दुसरं कोणतंच नसतं. टपरीच्या काऊंटरवर हात ठेऊन आरशात बघत थोडे केस सावरत होतो तेवढ्यात संतोष बाराते उर्फ सोन्या तिथे आला. दिवसभराची कामे आटोपुन गावातले अनेक मित्र विरंगुळा म्हणुन राहुलच्या टपरीवर जमत असतात त्यापैकीच आम्ही एक.
आरं सोन्या ! तु बारावी काढायला पायजेल लका, यावर सोन्या म्हटला " आवं पाॅटापुरतं शिक्षाण बासं झालं की. सर, ती इंग्रजी माझ्या डोक्यातच जात नाय बगा ! आन् घरच्यांलाबी सारखं सारखं पैसं मागू वाटतं न्हायतं. एकदा फाॅर्म भराया सातशे रूपये लागत्यात. आत्तापतुर तिनदा झालंय. वडील शेतकरी हैतं. ईनबीन ईसएक शेरडं आन् एक म्हैस यवढ्यावरच काय ते चालतंय बगा, पण म्या बी काय कच्चा नाय, दिसाकाठी माळवं टाळवं ईकुन आनं हमाली टमाली करून सातशेचा तरी मेळ घालतोच. बाजार नसल्यावर खताची पुती उचलायला, मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंटची पुती उतरायला, कंचबी काम आसुद्या आपुन ढिला नसतोच. वडलांचं लय लक्ष हाय माज्यावर; आजुनबी मला सुडुन जेवत न्हायतं. यीलच बगा आता त्यंचा फोन. ह्यवढं पोरात फिरतो पण सुपारीच्या खंडाचं सुद्धा यसन न्हाय लागलं मला"
सोन्याचे हे बोलणं ऐकुण त्याचा अभिमान वाटला. याआधी खुपदा राहुलकडुन मी सोन्याबद्दल ऐकलं होतं. "आरं विशाल ! हि सोन्या कामाला लई निब्बर पोरगं हाय लका, त्यादिवशी मला ती पंच्याहत्तर किलोचा कट्टा हालतबी नव्हता पण सोन्यानं एका झटक्यात उचलुन डोस्क्यावर न्हेला लका", ह्यवढंच नाय, एकदा त्या खतांच्या पोत्यानं भरलेला पिकअप पठ्ठ्यानं एकट्यानच खाली केला व्हता रांव" राहुलकडुन ऐकलेली हि माहिती सोन्याची धष्टपुष्ट शरिरयष्टी पाहुन विश्वास बसला. प्रत्येक व्यक्तीकडुन काहिना काही शिकण्याचा भाग असतोच तो शिक्षित आहे का अशिक्षित यावर ते अजिबात अवलंबुन नसतं. सोन्याच्या वयातली ईतर पोरं आजही पारंपारीक शिक्षण घेऊन बेरोजगारीचे कारण सांगुण वडीलांच्या जीवावर जगत आहेत. परंतु पडेल ती कामे प्रामाणिकपणे करून घराला हातभार लावणारा सोन्या मला त्या शिकलेल्या पोरांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतो. बोर्डात पहिला आलेल्या, एम्पीएस्सीतुन साहेब झालेल्या, डाक्टर इंजिनीअर झालेल्यांचं तर समदीच कौतुक करत्याती पण समाज नावाच्या व्यवस्थेत सोन्या सारख्या पोरांचे सुद्धा कौतुक व्हायलाच हवे म्हणुन हा अट्टाहास.
"हि पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे" होय, आण्णाभाऊंचे हे वाक्य खरंच हाय !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ नोव्हेबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...