Friday, November 10, 2017

| पायतान ©

उद्या सकाळी लवकर व्याख्यानासाठी पंढरपूरकडे जायचंय. आज दिवसभराचे काॅलेज आटोपुन घरी येऊन उद्या व्याख्यानात मांडायच्या मुद्द्यांचे वाचन, चिंतन आणि मनन पुर्ण केले. वैचारीक मांड पक्की करण्यासोबत मी पेहरावाला सुद्धा तितकच महत्व देतो. त्याचाच एक भाग म्हणुन माझं आवडीचं पायतान असलेल्या कोल्हापुरी चप्पलला तेलपाणी करत बसलो होतो. कोणतेही काम निटनिटके आणि आवडीने करायची सवय असल्याने. घरातली तेलाची बाटली घेऊन पंधरा मिनिटे मन लावुन चप्पलीला तेल लावत बसलेलो. कोल्हापुरी चप्पल तेलात मुरवली की मऊ पडते. पायांना आणि डोळ्यांनाही आराम पडतो. चप्पलची काळजी फक्त चांभारानेच घ्यायची असते का ? त्यांची काळजी मी आजही आवडीने घेतो आणि यात मला काही कमीपणा वाटत नाही, लहाणपणी घरात कोणी पाहुणे माणसं आली की त्यांच्या चप्पला आणि बुटात पाय घालुन चालायची मला भारी हौस असायची. रानात गेल्यावर तर आमच्या सालगड्याच्या बुटात माती भरून गाडी-गाडी खेळायचो. आमच्या दादांनी बाजारातुन नवीन चप्पल आणल्यावर त्या दिवशी शाळेत लई शायनिंग मारीत जायचो. पंचेचाळीस रूपयाची पॅरागाॅन टाचेखाली भोक पडुस्तर वापरायचो. पळता-पळता कधी पन्ना निघाला तर थुका लावुन लगीच बसवायचो. रूळलेल्या चप्पलवर रेनाॅल्ड्स पेनने विशाल गरड लिहायचो, या सगळ्या आठवणी आज माझ्या कोल्हापुरी चप्पलला तेल लावताना जाग्या झाल्या. खरंच लहाणपणीची पायतानाची खेळणी मोठेपणी खेटरं कशी बरं होतात हेच नाही राव कळत. खेटरांना आपल्या संस्कृतीत नेहमीच हिन दर्जा दिला जातो. परंतु आपल्या अंगावरच्या सगळ्या पेहरावाला पायतानाशिवाय शोभा नसते. पायात चप्पल, बुट, सॅडल घालायला सगळ्यांनाच आवडतं. डोळ्याचा आणि पायांचा थेट संबंध असतो असे म्हणतात, त्यामुळेच पायात काय घातलंय यावर डोळ्याचं आरोग्य अवलंबुन असतं. माझे तर कलाकाराचे डोळे असल्याने त्यांची काळजी सुद्धा जरा जास्तच घ्यावी लागते. याच डोळ्यांच्या गरूडासारख्या नजरेतुन 'रिंदगुड' साकार झालंय. तेव्हा पायतान मऊ ठेवण्यासाठी चप्पल तेलात मुरवण्याचे काम आठवड्यात एकदा तरी मी आवडीने करतोच कारण यानिमित्तानेच का होईना मला लहाणपण जगता येते. आपली ऐप्पत कितीजरी मोठी झाली तरी आपल्या आयुष्यातली आपल्या पायतानाची किंमत मात्र कधीच कमी होत नसते. सरतेशेवटी आपली काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वस्तुची आपणही काळजी घ्यायलाच हवी मग ती वस्तू वा माणूस कुणीका असेना !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० नोव्हेबर २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...