Sunday, March 11, 2018

| दिलखुलास ©

मी व्याख्यान करताना माझी ही छबी श्रोत्यांना एकदातरी पहायला मिळतेच. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीवर एखादी कोटी करून श्रोत्यांसह मनमुराद हसण्याचा मोह मला टाळताच येत नाही. धीरगंभीर व्याख्यान मला करता येत नसल्याने व्याख्यानाचा परिपुर्ण आनंद मी स्वतः घेतो म्हणूनच श्रोताही आनंदी होतो. वक्ता जर हजरबाबी आणि मिश्किल असेल तर श्रोत्यांसाठी ती एक वैचारिक मेजवानीच असते. मी व्याख्यानाच्या पाच सेंच्युऱ्या मारल्यानंतर आत्ता कुठे माझ्या अलिकडील व्याख्यानात वक्त्याचे हे दोन अलंकार स्वतःमध्ये उतरल्याची खात्री झाली आहे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरू असतो याचीही जाणिव आता क्षणोक्षणी होत आहे.
व्याख्यानाच्या कार्यक्रमात समोर बसलेल्या श्रोत्यांचे आणि व्यासपीठावरील पाहुण्यांचे वक्त्याकडे बारिक लक्ष असते. गर्दीला खिळवुन ठेवण्याचे सामर्थ्य जसे जिव्हेत असते तसेच त्या गर्दीला आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य देखील वक्त्याच्या हसण्यात असते. पुस्तक वाचल्यासारखी व्याख्याने, किंवा बोलण्याला ठरावीक आयत आखुन केलेली व्याख्याने श्रोत्यांना निरस वाटतात; कारण मी एक श्रोता म्हणुन केलेले हे परिक्षन आहे. आज जरी मी वक्ता असलो तरी माझ्या वक्तृत्वापेक्षा मी ईतरांना ऐकायला आणि ईतरांचे वाचायला जास्त वेळ देतो म्हणुनच माझी प्रगल्भता वाढत आहे. माझ्या तोंडापेक्षा माझे कान आणि डोळे मोठे आहेत (शब्दशः अर्थ घेऊ नये) म्हणुन शब्दांच्या फौजा माझ्या सदैव दिमतीला उभ्या असतात. सरतेशेवटी शब्दांच्या समुद्रात चमच्याने पाणी उपसणारा मी एक सामान्य वक्ता आहे अजुनतर सारा समुद्र उपसायचाय...

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१८


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...