Tuesday, March 27, 2018

| दोस्ती ©

कवी विकास पाटील म्हणजे माझ्या फेसबुकवरचा एक फाॅलोअर गतवर्षी जयसिंगपूरला झालेल्या व्याख्यानात आम्ही पहिल्यांदा भेटलो. गेली तीन वर्षापासुन तो आणि मी फेसबुक मित्र आहोत. लांबच्या प्रवासावर असताना माझ्या विचारांवर प्रेम करणाऱ्या विकास सारख्या दोस्तांना भेटायला मला आवडते. काल सांगलीला जात असताना विकासच्या ईस्लामपूरातील नवनाथ टि स्टाॅलला सदिच्छा भेट दिली. विकासचे वडील गेल्या दहा पंधरा वर्षापासुन हा व्यवसाय करतात. अतिशय कष्टाच्या जोरावर त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पुर्ण केले आहे. छोट्याशा घराचा बंगला तयार करायला त्यांना तब्बल तेरा वर्ष लागली. मुंगी सारखे काम करून हत्ती एवढे सामर्थ्य तयार केलेल्या विकासच्या वडीलांचा अभिमान वाटला. पर्वा बेंबळी येथील व्याख्यान आटोपल्यानंतर रात्रभरचा प्रवास करून पहाटेच ईस्लामपूरात पोहचलो. विकास पहाटे पाच वाजल्यापासुनच स्टॅण्डवरच्या त्याच्या टपरीवर माझी वाट पहात होता. गाडीतुन उतरताच कडकडुन मारलेल्या मिठीतुन विकासचे प्रेम वाहू लागले. मग आम्ही लगोलगच त्याच्या घरी प्रस्थान केले. आंघोळ अष्टमी उरकुन मी तयार होईपर्यंत मला ओळखणारे ईस्लामपुरातील अनेक युवक विकासच्या घरी आले. कुणी फुले आणली, कुणी बुके आणले तर कुणी शाल आणली. कधीही न भेटलेली व पाहिलेली ही माणसं फक्त आपल्या शब्दांमुळे ईतके प्रेम करतात हे पाहुण कृतार्थ झालो. आयुष्यात ही खऱ्या माणसांची दौलत कमावल्याचे सार्थक वाटले.
जमलेल्यांपैकी अझर काझी कडुन माझ्याबद्दलचीच माहिती ऐकताना मी स्वतःला आरशात बघीतल्याचाच भास झाला. ही माणसं आपल्याबद्धल एवढं सगळं ऐकुण आहेत हि गोष्टच मुळात बळ देणारी असते. चार जिल्हे ओलांडूनही लोकं एवढं प्रेम करतात हे पाहूण शब्दावरची श्रद्धा अजून दृढ होते. खिशात किती पैसे याहून डोक्यात किती विचार आणि ह्रदयात किती प्रेम भरलंय यावरूनच निस्वार्थी प्रेमाचा जन्म होत असतो व असे प्रेम अनुभवने हा सुद्धा एक स्वर्गीय अनुभव असतो जो मला ईस्लामपूरातील मित्र मंडळींकडून मिळाला. दोस्तहो तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद. माझ्यासारख्या वाटसरूला तुम्ही दिलेला पाहुणचार आणि प्रेम चार शब्दात व्यक्त करणे कठिणय बस्स हा प्रेम व जिव्हाळा असाच आखीरी दम तक आबाद रहे यही दुवा..

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मार्च २०१८

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...