Wednesday, March 21, 2018

| जळलेला माळ ©

काही महिण्यांपुर्वी याच माळरानाला कास पठारची उपमा देऊन लेख लिहिला होता आज त्याच माळाला जळलेला माळ असं नांव देऊन लेख लिहित आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर फुटणाऱ्या अंकुरापासुन सुरू झालेला गवताचा प्रवास अखेरीस राख होऊन संपतो. माळावर सहज चालता चालता किंवा मोहोळ वगैरे झाडताना गौरी पेटवण्यासाठी लावलेली आग जर वेळेवर नाही विझवली तर हजारो हेक्टरचे वाळलेले गवत जळून राख होतं. काडी टाकणाऱ्याला जर एवढी अक्कल आली तर अशी जळणारी कित्येक वने वाचतील. वाळलेलं गवत जळल्याचे दुःख आहेच परंतु त्याच गवताच्या आळवनात पक्षांनी घातलेल्या अंड्यांचा व डोळेही न उघडलेल्या पशुपक्षांच्या पिल्लांचा झालेला संहार मन हेलावून टाकणारा असतो. हजारो वन्यजीवांच्या तोंडचा घास धुरांच्या लोटात जळताना पाहून काळीज फाटून जातं. निसर्ग देवता हे सारं काही पाहत असते, एका क्षणात पाऊस पाडुन आग विझवण्याचे सामर्थ्य ठेवणारा निसर्ग अशा वेळी मात्र गप्प राहतो कारण त्याने मानवासाठी स्वतःला घालुन घेतलेले नियम तो शक्यतो स्वतःच पाळत असतो. परंतु असा वणवा पेटण्याच्या घटना पाहून त्याच्या लेकरासाठी त्याचाही जीव तिळतिळ तुटत असावा यातुनच जर उन्हाळ्यात पाऊस पडला तर आश्चर्य कशाचे. मी निसर्गाला देव मानणारा माणूस आहे. त्याच्याच लेकरांचा जर आपण असा छळ करायला लागलो तर तो वेळी अवेळी त्याच्या वेळापत्रकात बदल करून आपल्यावर बरसतो त्यालाच मग आपण अवकाळी व गारपीठ म्हणतो. आकाशात उडायची स्वप्न बघणारे पंख जेव्हा माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे आगीत भस्मसाथ होतात तेव्हा त्याला कोण जबाबदार असतं ? परंतु ऐन तारूण्यातली पोरू जेव्हा अकाली मरतात तेव्हा देवाला शिव्या घालून आपण लगेच मोकळे होतो. निसर्ग स्वतःहून कुणाचं वाईट करत नाही आपणच आपल्या मृत्युची कारणे तयार करूण ठेवलेली असतात त्याला तो तरी काय करणार. जर माणसांचा तळतळाट एका माणसाला लागू शकतो तर निसर्गाचा तळतळाट का बरे आपल्याला लागणार नाही?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ मार्च २०१८

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...