Thursday, August 30, 2018

पारिजातक

आज माझ्या कुंचल्यातुन साकारलेलं पवित्र आणि सुगंधी पारिजातकाचे फूल; खास श्रावण महिन्यात माझ्या प्रिय कलारसिकांसाठी शेअर करत आहे. कशाला उगाच झाडाचं फुल तोडायचं डोळ्यांनी पहायचं आणि हाताने काढायचं कलेचा सुगंध आपोआप दरवळतो. हर हर महादेव !

Name-  Parijatak ©
Artist- Vishal Garad
Material- Ball pen & wax crayons
Time required- 2 hrs
Size - 25 × 28 cm

चित्रकार : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑगस्ट २०१८



Friday, August 24, 2018

बातमी कर्नाटकातल्या पेपरातली

कर्नाटक राज्यातील नंबरवन दैनिक असलेल्या दैनिक विजयवाणी मधील लग्नाचा खर्च टाळून पुरग्रस्तांना केलेल्या मदतीची बातमी आज प्रसिद्ध झाली. पेपरात नुसतं नांव जरी आलं तरी लय भारी वाटतंय पण जवा आपली भाषा सोडून कन्नड पेपरात आपली एवढी मोठ्ठी बातमी लागते तेव्हा तर आभिमानानं ऊर भरून येतंय राव. समाजात जे काही चांगलं घडतंय त्याची स्वतःहून दखल घेऊन लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सच्चे पत्रकार नेहमीच तत्पर आसतात. विचार पेरणीच्या या उपक्रमात महाराष्ट्रासह परराज्यातील दैनिकही साथ देत आहेत याचे विशेष कौतुक वाटतंय. मित्रानो मी मदत म्हणून दिलेल्या छोट्याशा हातभाराला अशा बातम्यांमुळे हजारो हात जोडले जात आहेत हाच खरा विचारांचा विजय आहे. या उपक्रमासंदर्भात विविध वृत्तपत्रात निस्वार्थ भावनेने बातमी लावलेल्या तमाम पत्रकार मित्रांस माझं शतशः नमन.

साभार : ಶರಣಪ್ಪ ಫುಲಾರಿ (पत्रकार शरणप्पा फुलारी सर)

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : २४ ऑगस्ट २०१८




Thursday, August 23, 2018

पुस्तकांनी भरली ओटी

बायकोची ओटी पुस्तकाने भरण्यामागचा माझा उद्देश वाचन संस्कृतीला बळ देणे व पुस्तकांची संगत जुळावी हा आहे. असा नाविण्यपुर्ण उपक्रम प्रत्येकानेच राबवायला हवा. माणसाच्या मेंदुला खऱ्या अर्थाने विचारशील बनवण्याचे सामर्थ्य पुस्तकांत असते. मी जेवढं साडेतीन शक्तीपीठांना मानतो. तेवढंच साडेतीन अक्षरांच्या 'पुस्तक' या शब्दालाही मानतो कारण माझ्या आजवरच्या जडणघडणीत यांनी खुप मोठा वाटा उचलला आहे. इथुन पुढील आमच्या संसारात जेवढं महत्व चुल, भाकर आणि लेकरांचं असेल तेवढंच पुस्तकांचेही असेल. संसार फक्त पोट भरण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीपुरता मर्यादित नसुन त्याला जर चांगल्या विचारांची सांगड मिळाली तर येणारी पिढी समृद्ध करण्याची क्षमता त्यात असते म्हणुनच हा अट्टाहास. आता दैनंदिन वाचनाने माझ्या विराचे विचार आणखीन विशाल होवोत हिच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ ऑगस्ट २०१८


Tuesday, August 21, 2018

पुरग्रस्तांना मदत

बॅण्ड बाजा बारातीला फाटा देऊन साखरपुड्यातच लग्न केल्याने त्यासाठीची रक्कम केरळ येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून पाठवतोय. स्वतःच्या क्षणिक आनंदापेक्षा गरजवंतांचे आणि पुरग्रस्तांचे अश्रू पुसणे मला जास्त महत्वाचे वाटतंय. माझा संसार सुरू होत असताना दुसऱ्यांचा संसार उभा करण्याचा विचार मला जास्त आनंद देणारा आहे.

तिथेही माझ्यासारखंच नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असेल अशा पुर परस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल. त्यांच्यावर काय बीतली असले याची जाणिव असल्यानेच मी हा मदतीचा निर्णय घेतला. खरंतर हे लग्नादिवशीच ठरवलेलं परंतु लग्नानंतरच्या कार्यक्रमांमुळे शक्य झालं नाही आज मात्र हातातलं काकण सोडल्या सोडल्या गावातल्या पोस्टात जाऊन मदतीचा चेक केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयात पाठवला.

जे कमावण्यासाठी सगळं आयुष्या खर्ची पडलेलं असतं ते एका क्षणात पाण्यात बुडुन गेल्यावर काय यातना होत असतील याची कल्पनाच करवत नाही. आपली दहा रूपयाची नोट जरी चुकुन पाण्यात भिजली तर तीला वाळवण्यासाठीचा आपला आटापिटा त्या दहा रूपयाची किंमत दर्शवतो पण ईथे तर अख्खे संसारच पाण्यात गेलेत तेव्हा अशांना सावरण्यासाठी आमच्या संसारातला एक घास पुरग्रस्तांसाठी द्यावासा वाटला. ईतरांच्या संसाराचं हित चिंतलं की आपला संसार आपोआपच सुखी होऊन जातो अशी माझी भावना आहे म्हणूनच हा अट्टाहास.
निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या केरळवासीयांना या दुःखातुन सावरण्याचे बळ मिळो एवढीच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक - विशाल गरड
दिनांक - २१ ऑगस्ट २०१८




Thursday, August 9, 2018

विशाल & विरा

ती येतेय; विशाल गरडची बायको म्हणुन माझ्यासमवेत माझ्या कलागुणांचीही स्वामिनी बनून. लिहिता लिहिता राहिलेल्या रेषा पुर्ण करायला. विसरलेला एखादा शब्द आठवण करून द्यायला. थकलो तर बहरवायला, थांबलो तर चालवायला, रूसलो तर मनवायला, रागावलो तर शांत करायला, बावरलो तर सावरायला. ती येतेय; चित्रकाराचे चित्र बनून रंगायला, लेखकाचे अक्षर बनून उमटायला आणि वक्त्याचे शब्द बनून घुमायला.

ती येतेय; एकांताचा यमदूत म्हणून तर सोबतीचे अमृत पिऊन. ती येतेय; अहोरात्र कला उपसण्यात गुंग असलेल्या हातावर मायेचे आणि प्रेमाचे पांघरूण घेऊन. दाहीदिशांत फिरणाऱ्या माझ्या मनाला स्वतःकडे केंद्रीत करायला. देहाच्या आणि मनाच्या सुखांचा दुष्काळ मिटवायला. ती येतेय; तुळशीला पाणी घालायला, घास भरवायला आणि विस्कटलेल्या जिंदगीला संसारात गुंफायला. होय माझी विरा येतीय माझ्या नावाचं कुंकू लावायला.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ ऑगस्ट २०१८


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...