Monday, December 10, 2018

एक नाही हजारो छिंदम जन्मलेत ©

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडून आलाय हि बातमी समजली आणि लोकशाहीत असलं पण काही घडू शकतं याचे आश्चर्य वाटलं. मतदान माणसाच्या शरिराला बघून नाही त्याच्या डोक्यातल्या विचारांना पाहून करायचं असतं. छिंदम कोणत्याही पक्षाकडुन उभा नव्हता तरी त्याच्या वार्डातील लोकांनी त्याला समर्थन दिलंय. आजवर आपल्याला एकच छिंदम माहित होता आज मात्र महाराष्ट्राला हजारो छिंदम पाहायला मिळाले. काय राव लोकशाही आहे आपली तडीपार माणूस सुद्धा प्रचाराला न येता निवडून येतो. ही लोकशाही ज्यांच्या विचारांतुन निर्माण झाली त्या सर्व महापुरुषांच्या महान विचारांना निवडणूक नामक लोकशाहीचे सर्वोच्च शस्त्र वापरून हरवलं गेलंय. ही हरवणारी माणसं आणि छिंदमला समर्थन देणारी माणसं मला त्या छिंदमपेक्षाही विषारी वाटायली आहेत.

एक छिंदम प्रवृत्ती ठेचली असती ओ; पण आतल्या गाठीच्या या हजारो सुप्त छिंदमांचं करायचं तरी काय ? खरं तर आपण काहीच करू शकत नाही कारण मतदाराने कुणाला मतदान करायचं हा त्याला घटनेने दिलेला वैयक्तिक अधिकार आहे परंतु घटनापती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन राज्यघटना लिहिली. सबंध राज्यघटनेत शाहू,फुले, आंबेडकरांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या विचारांना अग्रनी स्थान दिलं. समाजातील वाईट राजकिय प्रवृत्तींचा नायनाट करता यावा म्हणुन घटनेने आपल्याला मतदानासारखा श्रेष्ठ अधिकार बहाल केला परंतु आज निवडणूकी सारख्या त्याच पवित्र प्रणालीतुन छिंदमसारखा स्वराज्यद्रोही निवडून देऊन त्या मतदारांनी नेमकं काय साध्य केलंय ? हे सांगायची आणि समजुन घ्यायची गरज आहे.

शिवरायांच्या काळात लोकं स्वराज्यासाठी मरायला तयार होती. स्वराज्यद्रोह्याला टकमक टोकवरून ढकलून दिले जायचे आज मात्र बटनं दाबून अशा नालायकांना निवडून दिलं जातंय हे दुर्दैव. अरे हे फक्त प्रतिस्पर्ध्याला नव्हे तर महापुरूषांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच आव्हान आहे. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडलंय उद्या हेच आपल्या उंबरठयावर घडलं तर नवल वाटू नये. बाकी तुम्ही निषेध करत राहा आम्ही निवडून देत राहतो. छिंदम मुडदाबाद !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० डिसेंबर २०१८


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...