Wednesday, December 5, 2018

श्रीमंती ©

काॅलेजातुन घरी येताना रानात गेल्तो. लय दिवसापसुन त्या आवडीच्या बोरीची बोरं खायची व्हती. लहानपणी वड्यातल्या बोरीची गावरान बोरं खायला दिसं दिसं भटकायचोत. नदीला मासं पकडायला जायचं, हिरीत पवायला जायचं, आळवनात म्हवळं झाडायला जायचं आन् मग बोरं खायला जायचं असा एका दिवसाचा गावठी मिनिस्टरी प्लॅन असायचा आमचा. आता मातर नौकरी, छंद, संसार या त्रिमुर्तीतुन येळंच नाय भेटत. आसंच कधी बोरंबीरं बगीतली की जन्या आठवणींचं म्हवाळ उठतंय डोस्क्यात. तरी बरं तोडकं मोडकं ल्ह्यायला येतंय म्हणुनशान बरंय; नायतर हे आस्लं जब्राट आनुभव तसंच डोस्क्यात कुजत राहिलं आस्तं.

आज येळात येळ काढून रानात गेलो. तिथं गेल्यावर तासभर त्या बोरीखाली हावऱ्यावनी बोरं ईचित बसलो व्हतो. बोरीचं काटं आडकुन शर्टाचं धागं आन् हाताला वरकांडं निघालं. पण पॅन्टीचं आन् शर्टाचं खिसं जवर भरत न्हायतं तवर माझा कार्यक्रम सुरूच व्हता. ताजी बोरं खिशात भरायची आन् वाळल्याली येचत येचत खायची. साखरंवाणी गोड आन् एकबी बोरं किडकं नाय या गुणामुळं उगं डोळं झाकुन वडायचं काम चालू व्हतं. दोन तीन ढेकरा आल्यावरच खादाडखाई बंद झाली.

घराकडं येताना शर्टाचा फुगल्याला खिसा बगुन उगंच लय श्रीमंत आसल्यागत वाटलं. लहाणपणी शेंगदानं, सिताफळं, कणसाचं दाणं, बोरं, उसाच्या बुटकांड्या आसल्या गुष्टींनी भरल्यालं खिस घिऊन फिरणारा पोरगा आमच्यामते श्रीमंत आसायचा. लय हेवा वाटायचा त्येचा, मग उगंच लंडावनी त्याच्या म्हागं म्हागं फिरायचं तवा कुठं त्यातला थोडासा माल हातावर मिळायचं. काय साला लहानपण असतं नाय; आज बोराचा कॅन्टर ईकत घिऊन खायचं म्हणलं तरी शक्य हाय पण ईचुन खायचा त्यो रूबाब मातर त्यात नाय. तवा आसलं काय दिसलं की आपुनबी लहान हुन जायचं. आपली ईज्जत, मोठेपण, आब, रूबाब, पैशांची श्रीमंती हे आस्लं समदं त्या झाडाच्या एका फांदीला टांगायचं आन् जगायचं बिनधास्त बारक्यावानी...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ डिसेंबर २०१८


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...