Monday, December 17, 2018

शिवरायांचे दैवतीकरण थांबवा ©

शिवाजी महाराज हे छत्रपती होते त्यासोबतच ते एक सर्वसामान्य माणूसही होते. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक माणूस दोन हात आणि दोन पाय घेऊनच जन्माला येतो. यापेक्षा जास्त हात असणारा व्यक्ती आपण माणूस म्हणुन संबोधित नाही तर देव म्हणुन संबोधतो. महापुरूषांना देव करणं वेगळं आणि त्यांना देवासारखं मानणं वेगळं. जर आपण महापुरूषांना देव केलं तर त्यांनी उभारलेले सर्व कार्य चमत्कार होईल. कर्तुत्वाची जागा जेव्हा चमत्कार घेतो तेव्हा महापुरूषांच्या समकालिन पराक्रमाला फक्त उदबत्त्या लावून पुजलं जातं त्याचे अनुकरण वगैरेतर दुरचं राहतं; कारण माणुस माणसाचे अनुकरण करिन देवांचे थोडी करणार.

फेसबुकवर जेव्हा मी सचिन जुवाटकर या चित्रकाराने रेखाटलेले शिवरायांचे चार हात दाखवलेले व देवत्व ग्लोरीफाय केलेले चित्र पाहिले तेव्हा एक चित्रकार म्हणुन त्यांच्या कलेचे कौतुक वाटले पण ते चित्र रेखाटण्यामागचा हेतू मात्र विघातक वाटला. अहो, जुवाटकर शिवरायांनी बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर उभा केलेल्या स्वराज्याला उगांच चमत्काराचे ठिगळं लावू नका. देवाला देव राहूद्या माणसांना माणूस राहू द्या. चित्रातुन देव रेखाटण्याची एवढीच ईच्छा असेल तर तेहत्तीस कोटी देवांपैकी काहीच देवांची चित्र आपल्याला ठाऊक आहेत. तुमची कलाकारी त्या अज्ञात देवांना चित्र स्वरूपात आणण्यासाठी वापरा त्याचे स्वागतच होईल.

बाकी चित्र हि ठरवूनच काढली जातात. डोळे बंद करून स्वप्नात आलेली एखादी कलाकृती अशी कागदावर उमटली वगैरे वगैरे भंपक असतं. तुमचा मेंदु ज्या विचारांनी पोसला जातो त्याचेच प्रतिबिंब कलेतुन उतरत असते. महापुरूषांची मान्यताप्राप्त चित्रे ही काय नवनवीन प्रयोग करायची साधने नसतात याचे भान असावे. अरे जे आहे ते दाखवा की, तुमची सृजनशिलता दाखवण्यासाठी महापुरूषच बरे सापडतात तुम्हाला. सरतेशेवटी कुणी कोणते चित्र आपल्या घरात लावावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या भिंतीवर आधीपासुनच खुपसाऱ्या देवीदेवतांची चित्रे आहेत त्यातच एक माणसातल्या देवाचे चित्र आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या माणसातल्या देवाला आता देव करून त्याचे माणुसपण मारू नका एवढीच विनंती.

माणसांच्या चित्रांना देव करू नका
जिवंत ईतिहासाला आख्याईका म्हणू नका,
गड कोट किल्ले आहेत साक्षीला
शिवरायांच्या कर्तुत्वाला चमत्कार म्हणू नका.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ डिसेंबर २०१८


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...