Friday, November 22, 2019

आत्मविश्वास © Ball Pen Painting


प्रतिकूल परिस्थितीत उगवलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वास हे चित्र अर्पण. मानवनिर्मित दगडी संकटांच्या छाताडावर उभारून मरणाच्या दारात पालवी फुटलेल्या बहाद्दरांना हे चित्र अर्पण. बहुतांशी अवयव निकामी झाल्यावरही जग जिंकलेल्या माणसांना हे चित्र अर्पण आणि कुऱ्हाड हातात घेऊन बसलेल्याला सुद्धा पाणी घालायला प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येक झाडाला हे चित्र अर्पण.

Name : Confidence
Artist : Vishal Garad
Material : Ball Pen on paper
Time required : 3 hrs

चित्रकार तथा लेखक : विशाल गरड



Tuesday, February 19, 2019

पेरणी ©

विचारांची पेरणी करतोय पण हे वाटतं तितकं सोप्प नाही. सकाळी नांदेड येथील व्याख्यान उरकून आज संध्याकाळचे उमरी तालुक्यातील कौडगांव येथे व्याख्यानासाठी निघालो. नविन गाव, नविन तालुका, नविन रस्ते आणि नविन माणसं पण फक्त एक गोष्ट ओळखीची ती म्हणजे शिवरायांचे विचार. बस्स याच एका कारणासाठी अतिशय खडतर रस्त्यावरून माझी गाडी धावू लागते. नांदेडहून गुरूजीच्या कारखान्यापर्यंतच जरा बरा रस्ता होता त्यानंतर मात्र बारड मार्गे मुदखेड पर्यंत ट्रॅक्टरसुद्धा चालवू वाटू नये एवढा खराब रस्ता, उमरी ते कौडगांव व्हाया बेलदारा या रस्त्यावरूनतर गाडी डोक्यावर घेऊन चालत जावे वाटायचे. तब्बल दोनशे बासष्ठ किलोमिटर अंतर पार करून कधी चौपदरी, कधी दुपदरी तर कधी एकेरी रस्त्यावरूनचा प्रवास करत करत संध्याकाळी आठ वाजता गावात पोहचलो. उमरी तालुक्यातील कौडगाव, एन्डाळा आणि महाटी ही गावे आंध्रप्रदेशच्या बाॅन्ड्रीवर असल्याने विकासाच्या बाबतीत यांना सवतीच्या लेकरांसारखी वागणूक मिळते. इथले रस्ते भयंकर खराब आहेत रस्त्यावरून जाताना पोटातलं पाणी कमी पण डोक्यातले विचारच जास्त हेलकांडत आहेत. प्रचंड त्रास, कसरत, जिवाचा अटापिटा, रिस्क आहे पण उगवायची अपेक्षा ठेवायची असेल तर आधी पेरावं तरी लागेलंच या एकाच ध्येयाने पेटलेल्या या विशाल देहाला थकून चालणार नाही. अडीअडचनीतुनच व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघत असते. नाव ठेवणं सोप्प असतं पण ते बनवणं तितकच कठीण. आता थोड्याच वेळात माईक समोर येईल; शरिराचा थकवा, प्रवासाचा त्रास, वैयक्तीक दुखणी बाजूला सारून समोरील गर्दीत विचार पेरण्यासाठी तोंडाची तिफन अविरत चालू ठेवणे अगत्याचे आहे.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ फेब्रुवारी २०१९


Saturday, January 19, 2019

मिशा ©

तारूण्यात आल्यानंतर मिसरूट फुटलं की जाणतं झाल्याची भावना येते. लहान आसताना कधी एकदा मिशा येतात याची भारी हौस असते. मला सुद्धा दाढी मिशाची खुपच हौस होती. त्यात मिशा भरीव पिळदार आणि दाढी फुल असायला पाहिजे असे जणु स्वप्नच होते. लवकर दाढी यावी म्हणुन गुळगुळीत गालावर ब्लेडचा खोऱ्या फिरवणारे कित्येक मित्र मी पाहिले आहेत. परंतु माझी स्वप्नपुर्ती मात्र हे असले कोणतेही गावठी नुक्से न वापरताच झाली. गुणसुत्रातुन मिळालेलं हे वैभव पुढे मी रूबाबात टिकवूनही ठेवलं

मी अकरावीत असताना एकदा आयडी फोटो काढताना मिशा ठळक दिसाव्या यासाठी त्याला थोडं पाणी लावलं होतं. काॅलेजच्या गॅदरिंगला मिशा आणि दाढी काळ्या बाॅलपेन ने जोडायचो. आज हे सगळं आठवलं की हसू येतं पण खरंच खुप जणांना असा अनुभव असतो. दहावी पर्यंत गुळगुळीत असणारा ओठावरचा भाग आणि हनुवटी अकरावीत भुर्र्या केसांनी वेढू लागली, बारावीत मिशा स्पष्ट दिसायल्या, डिग्रीच्या पहिल्या वर्षात दाढी याय लागली आणि थर्ड यिअरला मग फुल्ल दाढी मिशाचा चेहरा लाभला. विशाल गरड वुईथ दाढी मिशा ही जणु आयडेंटिटीच झाली.

घरच्यांनी जेव्हा माझ्यासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा माझा हा असा फुल दाढीमिशांचा अवतार पाहून आई ओरडायची "आरं दोन लेकराचा बाप दिसायला ह्या दाढीमिशानं, कोण पसंद करल रं तुला ?" तेव्हा मी तिला सांगायचो "वुईथ दाढीमिशाच पसंद करावं लागलं तीला, न्हायतर उगं पसंद करण्यापुरतं चिकनं व्हयचं आन् पुन्हा दाढीमिशा राखल्यावर तिला फसवल्यासारखं व्हईल की." माझ्या अशा विनोदी बोलण्याने आई पुन्हा असे प्रश्न नव्हती करत. तसं पहायला गेलं तर दाढी मिशांचा खुप मोठा ईतिहास आहे. अनेक राजघराण्यातली मंडळी व ॠषी मुनी दाढी ठेवायचे हल्ली मात्र फॅशन म्हणुन ठेवतात हा भाग वेगळा.

आज वयाची तिशी गाठली परंतु अजुनही गालाला ब्लेड नाही लावू वाटली हेच माझं दाढीवरचं प्रेम. लग्नातसुद्धा बऱ्याच मित्रांनी दाढी करण्याचा सल्ला दिला परंतु शेवटी आयुष्यातील या महत्वाच्या क्षणी देखील विराच्या परवाणगीने दाढी सोबतच लग्नसोहळा आटोपला. आता काळ्याभोर दाढी मिशात चार दोन चंदेरी तारा चमकू लागल्या आहेत. तारूण्यातून प्रौढत्वाकडची हि वाटचाल आता चाळीशी ऐवजी तिशीतच सुरू झाली याची खंत वाटतेय पण हे आजच्या पिढीत सर्वांसोबत होतंय मी तरी कसा अपवाद राहील; बाकी अती विचार करण्याने वगैरे केस लवकर पांढरे होतात हे जरं खरं असेल तर पन्नाशीच्या आतच आमचाबी मोदी लुक होणार अशी शक्यता वाटतेय.

भुर्री दाढी ते पांढरी दाढी व्हाया काळी दाढी हा प्रवास सर्वांचा सेमच असतो. फक्त यात काहीजण फुल दाढी राखून जगतात, काही क्लिन शेव्ह करतात तर काहीजन हनुवटीवर दाढी आल्यावर फुल दाढी यायची वाट बघतच आयुष्य काढतात.
आजचा हा विषय जरी वेगळा वाटत असला तरी दाढी मिशा राखणारे व काढणारे दोघेही याबद्दल किती जागृक असतात हे कटिंगवाल्यालाच ठाऊक असते. आता असंच लिहित बसलो तर दाढीमिशावर एक पुस्तक तयार होईल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात यासंदर्भातले अनेक एकशेएक किस्से असतात. तुमच्या अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळावा एवढाच उद्देश होता. बाकी कुछ भी कहो यारों मुँछो पे ताव मारणे की मजा ही कुछ और होती है...

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ जानेवारी २०१९


Tuesday, January 8, 2019

गाळ ©

नेहमीच्या वाटेवरून येताना डोंगर उतरत व्हतो. भिमा भऊंनी मोठ्यानं आवाज दिला "अय्य सरंऽऽ...आवं या हिर बघाया, गाळ काढायला चालू हाय" आवतानास मान दिऊन मी हिरीवर थांबलो. वाकून बघितल्यावर डोळं गरगरत्याल यवढी खोल व्हती हिर. गाळ काढल्यामुळं हिरीचं बुजल्यालं झरं मोकळं झालं व्हतं, त्यंचा खळखळणारा आवाज समद्या हिरीत घुमत व्हता सोबतच हिरीत उतरल्याली माणसं क्रेनमदी गाळ भरण्यात आणि मशनीवरची माणसं ती क्रेन वरखाली करण्यात गुतली व्हती. म्या आपलं भिमा भऊ आन् उत्राआप्पा बरूबर चार दुन हिकडल्या तिकडल्या गप्पाट्या मारल्या, पंधरा-ईस परसाखालच्या झऱ्याचं निवळसंग पाणी पिऊन गाडीला किक मारली आन् घरचा रस्ता धरला.

आजचा हा प्रसंग छोटाच पण घरी येईपर्यंत माझ्याबी मनातल्या नव्या झऱ्यातून एक विचार बाहेर पडला की; आपल्या मनातले चांगल्या विचारांचे झरे सुद्धा वाईट विचारांच्या गाळाने बुजुन गेलेले असतात. जसे विहिरीतलं पाणी वरून कितीही स्वच्छ दिसत असलं तरी त्याच्या बुडाशी मात्र गाळ असतोच, तसंच मनाच्या बुडाशी सुद्धा असा वाईट विचारांचा गाळ साचणे नैसर्गिकच असते परंतु आपणही कधीतर अशी गाळ काढणारी पुस्तकरूपी किंवा माणूसरूपी क्रेन आणून मनाच्या बुडाशी साचलेला वाईट विचारांचा गाळ काढायलाच हवा जेणे करून मनातल्या चांगल्या विचारांचे झरे पुन्हा सुरू होतील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ जानेवारी २०१९


Friday, January 4, 2019

भुंकणारे कुत्रे ©

काॅलेजला गाडीवर जाताना वाटेतल्या एका कोट्यावरची काही कुत्री भुंकत भुंकत रोज पाठलाग करतात. माझ्या गाडीचा आवाज आला की ती तयारच असतात कान टवकारून. विनाकारण भुंकणाऱ्या या कुत्र्यांचा मी कधी विचारच नाही केला किंवा त्यांना कधी घाबरलोही नाही; उलट ते भुंकत पाठलाग करायले की गाडी जास्त सुसाट चालवायचो. कधी कधी गाडी थांबवून मोठ्याने आर...हाऽऽऽड म्हणलं कि शेपटी मागच्या पायात घालुन ते पळून जायचे. अर्थात त्यांचा पाठलाग त्यांच्या कुंपणापर्यंतच असतो.

त्यांच्या ईलाक्यातुन जर कुणी त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने जात असेल तर त्यांना ते आवडत नसेल म्हणुनच ते भुंकुण विरोध करत असतात. प्राण्याचे काय आणि माणसांचे काय हा नैसर्गिक गुणधर्म मात्र दोघात सारखाच असतो. आपल्या पाठीमागे भुंकणाऱ्या माणसांकडे आपणही दुर्लक्ष करून आपल्या प्रगतीच्या गाडीचा वेग आणखीनच वाढवायला हवा. अशी कुत्री आपोआप पाठलाग सोडून देतात.

खरंतर हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतोच. मी सुद्धा बऱ्याच दिवसापासुन हे शब्दबद्ध करण्याच्या विचारात होतो परंतु या लेखाला साजेसा फोटो मिळत नव्हता. आज कुत्री मागे लागलेली असताना धाडसाने लाइव्ह कंडीशन सेल्फी घेतला. तो त्वेषाने चालून येत होता मी मात्र त्याच्या वागण्याचा आनंद घेत होतो. आपल्यावरील टिकाकारांचा आणि निंदकांचा राग राग करण्यापेक्षा त्यांच्या तशा वागण्याचा आनंद घेत रहा. आयुष्य खुप सुंदर आहे ते अजुन सुंदर होईल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ जानेवारी २०१९


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...