Sunday, June 28, 2020

विकासातून विनाशाकडे

या सृष्टीवरील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट निसर्गाची लेकरे आहेत. माणूस सुद्धा त्याचेच अपत्य, हाच माणूस जेव्हा त्याच्या उदरनिर्वाहासाठी निसर्गातल्या काही गोष्टीचा उपभोग घेत होता तोपर्यंत निसर्ग शक्तीला काही देणे घेणे नव्हते. पण जस जसे विज्ञान प्रगत होत गेले, माणसाच्या हातात मशिन नावाचे शस्त्र आले तेव्हापासून मात्र निसर्ग माणसावर राग धरून राहायला. निसर्गाचा नियम तोडून माणूस वागू लागला. या ब्रह्मांडातली सर्वात स्वार्थी जीव म्हणून नावारूपाला येऊ लागला. जंगलचा राजा सिंह, पण त्या जंगलात अतिक्रमण करून तोच सिंह पिंजऱ्यात कैद करून माणूस राजा झाला सर्वांचा.

पोटापेक्षा जास्त खाऊ लागला, कामापेक्षा जास्त जागा घेऊ लागला, बंगल्यावर बंगले बांधून अभाळाशी स्पर्धा करू लागला. तो सृष्टीच्या उदरात घुसून इंधन शोषू लागला. झाडे तोडू लागला, जंगले जाळू लागला, झाडेच ऑक्सिजन देतात हे माहीत होऊनही तो ऑक्सिजनचे सिलेंडर तयार करू लागला. सगळ्या मानवजातीला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न अविरत सुरू आहे. याने प्रचंड हुशारीने बलाढ्य अस्त्र तयार केली पण शेवटी त्याला डोळ्याला न दिसू शकेल एवढ्या एका व्हायरस ने नाकी नऊ आणले. अर्थात त्याला माणसाचा अहंकार कमी करायचा होता म्हणूनच.

आपण खूप खूप वाट्टूळं करून ठेवलय निसर्गाचे. सेल्फीच्या युगात आत्मकेंद्रीपणाची परिसीमा गाठली आहे. जे काही पाहिजे ते आम्हालाच. या भुईवर निसर्गातल्या कोणत्याच प्राणी, पक्षी, किटकांचा अधिकार नाही. अरे माणसा, जी जमिन तू तयार केली नाही ती तुझी होऊच कशी शकते, जे पाणी तू निर्माण केले नाही ते तुझे होऊच कसे शकते फक्त तुझा मेंदू इतर जिवांपेक्षा विकसित आहे म्हणून त्या सर्वांवर तू अधिकार गाजवतोस. ठिक आहे मग निसर्गाशी वाकडे घेण्याआधी तशी तयारी तरी करून ठेव.

माणसा तुला छान लिहिता येते पण ज्यावर लिहितोस तो कागद निसर्गाचा आहे, तू महागड्या गाड्या निर्माण करतोस पण त्याचे इंधन निसर्गाचे आहे, तू गगनचुंबी इमारती बांधतोस पण त्याचे साहित्य निसर्गाचे आहे, तुला पोट भरण्यासाठी लागणारा अन्नाचा प्रत्येक कण निसर्गाचेच देणे आहे. अंगावरच्या कपड्यांचा धागा त्याचीच निर्मिती तरीही तू त्याची म्हणावी तेवढी जाणिव ठेवली नाही. घरातल्या नोकरसारखे फक्त त्याला राबवून घेतलेस. त्यांच्याप्रती सन्मान तर दूरच.

तू समुद्राला छेडछाड केलीस की तो त्सुनामी होऊन उसळतो, तू जमिनीखाली छेडछाड केलीस की तो भूकंप होऊन हादरवतो, तू अभाळाशी छेडछाड केलीस की तो पाऊस होऊन गर्जतो. आजवर निसर्ग विविध माध्यमातून मानवजातीला रागवत तर कधी डोळे वटारीत आला आहे पण मानवाने त्याचे कधी ऐकलेच नाही. या सगळ्यांपासून फक्त स्वतःचे संरक्षण करण्यातच तो आजपर्यंत धन्यता मानत आलाय. निसर्ग ही एक शक्ती आहे ती आपल्याशी विविध माध्यमातून संवाद साधत असते तिचे म्हणणे आपल्याला ऐकावेच लागेल. निसर्गाने बांधलेल्या गतिरोधकाजवळ आपल्याला थांबावेच लागेल.

बैलाकडे शक्ती आहे म्हणून तो कोंबडी, कुत्री, मांजराला मारत नाही, डास रक्त शोषतो म्हणून ती फुलांची नासाडी करत नाही. मधमाशी फुलांचा रस शोषते म्हणून ती कधी माणसाचे रक्त शोषित नाही. नागात विष आहे म्हणून तो पाण्यात मिसळत नाही, मोराकडे सौंदर्य आहे म्हणून तो इतर पक्ष्यांना कमी लेखत नाही. या सर्वांनी निसर्गाचे नियम तंतोतंत पाळले आहेत मग माणसाजवळ असलेल्या सर्व कौशल्याचा शक्तीचा वापर त्याने करून पाहायलाच हवा का ? निसर्गाने माणसालाही काही मान मर्यादा घातल्या असतीलच की. त्या कश्या समजणार ?

अरे माणसा एक लक्षात ठेव निसर्ग नेहमीच प्रयोग करत आला आहे. त्याच्या प्रयोगशाळेपुढे आपण काहीच नाहीत. त्याने करोडो सजीव निर्माण केलेत तसेच निसर्गाला उपयोगी न ठरणारे नामशेष सुद्धा केलेत. कोणती प्रजाती कुठपर्यंत निसर्गात ठेवायची हे तोच ठरवतो. असे नसते तर डायनासोर, सॅबर टूथ्ड टायगर, नियंडरथल्स आजही जिवंत दिसले असते. माणसाचे अस्तित्वही कायमस्वरूपी नक्कीच नाही. काही लाख वर्ष जगल्यानंतर निसर्ग आपल्यालाही नामशेष करेल.

जगातील सर्व धर्माच्या धर्मशास्त्रात निसर्ग संवर्धनाचे महत्व सांगण्यात आले आहेत पण हल्ली माणूस मात्र त्याच्या सोयीप्रमाणे धर्मज्ञान वापरत आणि पसरवत आलाय. तुमचा चौदाशे ग्रॅम मेंदू घेऊन उगाच निसर्गासमोर डांग डिंग करू नका. ज्याने तुमची निर्मिती केली तोच तुमचा ऱ्हास करणेही जाणतोच तेव्हा वेळीच सावध होऊन मानव जातीने निसर्गाचे संरक्षण केलेच पाहिजे अन्यथा व्हॅलीडीटी संपायच्या आधीच आपला बॅलन्स संपून जाईल. आईची कूस मारून पुन्हा त्याच कुशीत निर्माण होण्याचे स्वप्न पाहता येत नाही तेव्हा निसर्ग हिच आपली आई समजून अखंड मानवजातीने तिचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३० एप्रिल २०२०


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...