Sunday, June 28, 2020

राज रोज मारी माझा शेतकरी

संपला निवडणुकीचे निकाल पण लागले आता नविन सरकार सत्तारूढ होईल. चारपाच आदल्या उडवून गुलाल उधळून जल्लोष होईल. घरी आल्यावर घरचे म्हणतील रानात जाऊन ये तेव्हा रानात मात्र झाडालाच उगवलेले सोयाबीन, मका, ज्वारी दिसेल तेव्हा प्रचार सभे एवढी गर्दी करून सरकारवर दबाव आणण्यासाठी एकी नाही होणार. शेतात भिजलेल्या सोयाबीनचे पुढे काय होणार यापेक्षा मुख्यमंत्री कोण किंवा कुणाचा होणार हे जास्त महत्वाचे वाटणारे कार्यकर्ते देशाचे भविष्य आहेत.


सध्या बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शिकलेली पोरं शेतात राबायला तयार नाहीत. नेते कुठंतरी चिटकवतील या आश्याने अख्खं तारुण्य खितपत घालवत आहेत. काही जण जागा निघतील या आशेने अभ्यास करत आहेत. म्हातारे आईवडील मात्र मोठ्या आशेने पोरगं कायतरी करील म्हणून आस लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि नोकर भरती करणे सरकारचा अग्रक्रम असायला हवा. प्रत्येक आमदारांनी सुद्धा आपापल्या मतदार संघात युवकांना रोजगार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अशिक्षित बेरोजगार पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत. लहान सहान काम करण्याचा त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही पण सुशिक्षित बेरोजगार मात्र नोकरी साठीच झटत आहेत. जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना पोसण्याची जबाबदारी त्यांचा बाप शेती करून पार पडतोय. त्यातच जर शेती तोट्यात गेली तर संपूर्ण कुटुंबाचाच उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतोय. टोकाची श्रीमंती आणि टोकाच्या गरिबीत राहणारा आपला महाराष्ट्र सुवर्णमध्य साधून कधी सुजलाम सुफलाम होणार ?

आज शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट करून उभारलेली पिके पावसात झोडपली. जे दाने वाळवून विकायला न्यायचे होते ते पाणी पिऊन फुटले आहेत. त्यातून उगवलेला कोंब इथल्या शेतकऱ्याचे कष्ट मातीत पुरून इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर उभा आहे. पहिले पाऊस नसल्याने मातीत पेरलेल्या दाण्याला कोंब फुटेना म्हणून शेतकरी रडत होता आणि आता उगवलेले दाने पाऊसात भिजल्याने कोंब फुटले म्हणूनही तो रडतोय. एकूण मतदानाच्या टक्केवारीत सर्वात जास्त मतदान करणारा हा घटक स्वतः मात्र वर्षानुवर्ष उपेक्षितच राहतोय हे दुर्दैव.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३१ ऑक्टोंबर २०१९


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...