Thursday, November 5, 2020

लेकीचे प्रयत्न

आज माझ्या मुलीला सात महिने पूर्ण झालेत, सध्या दिसेल त्या वस्तूला धरून उभे राहण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. विरा जेवायला जाताना 'ओ, लक्ष द्या जरा तिच्याकडे असे सांगून गेली. मी देखील दोन तीन खेळणी तिच्यापुढे टाकून तिच्या हालचालींचे निरीक्षण करत बसलो. आपण म्हणतो मोठ्यांचे संस्कार लहानांवर होत असतात पण लहानांचे बारिक निरीक्षण केले तर ते सुद्धा अपल्यावर संस्कार करू शकतात. मी कॉटवर झोपलो होतो आणि ती शेजारी खेळत बसली होती. खेळता-खेळता ती माझ्या जवळ आली, कॉटवरून खाली पडू नये म्हणून मी तिला माझा पाय आडवा लावला; मग ती त्या पायाला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागली. मला उत्सुकता होती की नेमकं ती केव्हा उभारते.

कित्येक वेळा ती पडली पण मी तिला हाताचा आधार दिला नाही. धरायची, पडायची पण न रडता पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करायची. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो पण अखेर तब्बल १६ वेळेस पडल्यानंतर ती तिच्या पायावर उभा राहिली आणि माझ्याकडे पाहून हसली. आपली लेकरं दोनदा पायावर उभी राहतात, एकदा पायाने आणि दुसऱ्यांदा कर्तृत्वाने. उभे राहण्याच्या या दोन्ही वेळा प्रत्येक बापासाठी अभिमानास्पद असतात. प्रयत्न करण्याची कला निसर्ग जन्मजात देत असतो उलट आपणच तुला हे जमत नाही, जमणार नाही वगैरे भंपक गोष्टी लेकरांच्या डोक्यावर बिंबवतो. लेकरं सगळ्यांनाच असतात ओ पण त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टीकोन सगळ्यांनाच असेल असे नाही. हा दृष्टीकोन वृद्धिंगत व्हावा याचसाठी हा शब्दप्रपंच.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ५ नोव्हेंबर २०२०

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...