माझे मित्र ज्ञानेश्वर जाधवर लिखित लॉक डाऊन ही कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून आपण सर्वजण या कोरोनाच्या वातावरणात जगत आहोत या दरम्यान प्रत्येकानेच अनेक बऱ्या वाईट गोष्टी अनुभवल्या असतील पण ज्ञानेश्वर जाधवर यांनी त्या गोष्टीना पुस्तकात कैद करून त्या आठवणी अजरामर केल्या त्याबद्दल प्रारंभीला त्यांचे आभार. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा लॉकडाऊन मधील अनेक घटनांची साक्षीदार आहे. कोरोनाशी संबंधित सर्व माहितीचा खजिना लेखकाने अतिशय कल्पकतेने कथेत गुंफला आहे. जरी सध्या 'कोरोना' हा शब्द उच्चारला तरी इरिटेट होत असले तरी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी मात्र तीच माहिती खूप रंजक पद्धतीने पुस्तकात मांडल्याने ती वाचताना कंटाळवाणी वाटत नाही.
वाईट प्रसंग आला की आपल्या गावाकडच्या मातीची आणि तिथल्या माणसांची आठवण प्रकर्षाने येते. या पुस्तकात देखील पुणे शहर व परिसरात घडणारी कथा आठवणींच्या स्वरूपात अधून मधून गावाकडे आणि गावच्या टेकडीवर फेरफटका मारत राहते. आजवर जे जे काही आपण न्युज चॅनेलवर पाहिलंय, सोशल मिडियावर वाचलंय त्या सर्व गोष्टींची या कादंबरीत रिविजन होते. कादंबरीतील पात्रांच्या परस्पर संवादातून कोरोना आजाराविषयी खूप सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ही कादंबरी जरा लवकर प्रकाशित व्हायला हवी होती असे वाचताना वाटते. कोविड वार्डातील रुग्णांनी सांगितलेल्या पारधी, सफाई कामगार, वेश्या, भाजीवाले, बिगारी कामगार यांच्या गोष्टी भयानक वाटतात. लेखकाने लॉक डाऊन मधील असंख्य उदाहरणांना एका साखळी मध्ये गुंतवून व्यवस्थेला खुबीने प्रश्न विचारले आहेत.
उत्तरार्धात कादंबरीच्या नायकाचा त्याच्या बायकोशी झालेला आभासी संवाद कोरोनाकाळात घडलेल्या आणि घडवलेल्या कृष्णकृत्याचा आरसा आहे. शेवटच्या भागात धर्माबद्दल टोकाची कट्टरता बाळगणाऱ्या व्यक्तींना उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन कथेचा शेवट केला आहे. भविष्यात 'लॉकडाऊन' हे पुस्तक कोरोना काळातला एक दस्तावेज असेल ज्यात पुढच्या पिढीला कोरोनाच्या भयंकर संकटाच्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा ही कादंबरी उपलब्ध होईल तेव्हा विकत घेऊन नक्की संग्रही ठेवा. प्रिय वाचकहो, ज्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'यसन'वर प्रेम केलंत तसंच 'लॉकडाऊन' वरही कराल हिच अपेक्षा.
वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३ नोव्हेंबर २०२०
No comments:
Post a Comment