Sunday, November 1, 2020

द आंत्रप्रन्योर

पुस्तकाची सुरुवात 'आंत्रप्रन्योर' या शब्दाने होते आणि शेवट 'Larger than Life' या शब्दाने होतो. संपुर्ण पुस्तक वाचल्यावर हाच विचार मनावर ठसतो. लेखक ओळखीचा असल्याने वाचताना पुस्तकातला नायक म्हणून त्याचाच चेहरा सतत आठवत होता. शरदराव माझ्यासाठी एक मित्र म्हणून जेवढे मोठे आहेत त्याहून हे पुस्तक वाचल्यानंतर ते माणूस म्हणून मोठे वाटतात कारण स्वतःची जिंदगी त्यांनी कसलाही फिल्टर न लावता या पुस्तकात मांडली आहे. जे घडलं, जे अनुभवलं ते जसेच्या तसे इथे वाचता येते.
 
'रॅट रेस' सदरात सगळ्या नोकऱ्यांचा आणि स्पर्धा परीक्षांचा पंचनामा केलाय. कलेक्टर या पदाला हुशारी चे सर्वोच्च शिखर समजणाऱ्या युवकांनी आपला आदर्श कोण असावं, कोण नसावं आणि का असावं याचे उत्तर लेखकाने पहिल्याच सदरात किमान शब्दात समजून सांगितलंय. "जो सतत काम करत असतो त्याला भूतकाळ सांगण्यासाठी वेळ नसतो" हे वाक्य जाम आवडलं आपल्याला. 'मेंटर' या सदरात लेखकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या  नवोदित युवकांना स्वानुभव सांगता सांगता ज्या कानपिचक्या दिल्यात त्या वास्तव सांगून जातात.

मुलगा आणि बापाच्या नात्यातला उलगडा लेखकाने खूप सुंदर मांडला आहे. बहुतांशी बाप-लेकातला संवाद असाच असतो त्यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय युवकाला ही गोष्ट स्वतःची वाटते आणि तो स्वतःला त्यात शोधातही बसतो. पृष्ठ क्रमांक एकशे बावीस वर महाराजांचा उल्लेख आहे तो अतिशय समर्पक आणि पुस्तकाच्या विषयाला अनुसरून मांडला आहे तसेच पृष्ठ क्रमांक एकशे एकोणऐंशी वर टायटॅनिक चित्रपटातील हिमनगाचे उदाहरण देऊन मांडलेला विचार जबरदस्त वाटला

"सॅप कोर्स करून ज्या कंपनीत जॉबची अपेक्षा करत होतो त्याच कंपनीच्या सीईओ सोबत लंडन मध्ये डिनर केलं".
व्हिजन या सदरात पृष्ठ क्रमांक एकशे सदूसष्ठ वरचे हे वाक्य वाचताना अंगावर शहारा येतो. "यंग आंत्रप्रन्योर अवार्ड गोज टू मि.शरद तांदळे फ्रॉम इंडिया" हे वाचताना अभिमान वाटतो आणि "हे सगळं बघायला बाप हवा होता", "बघा पप्पा आज मी कुठे उभा आहे" ही वाक्य डोळ्यातले पाणी उपसून बाहेर काढतात.

हे पुस्तक शरद तांदळे यांची सक्सेस स्टोरी आहे पण इतर सक्सेस स्टोऱ्यांपेक्षा वेगळी, ज्यात उद्योजक होण्यासाठी गरजेच्या अतिशय लहान लहान गोष्टी सांगितल्या आहेत, नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवकांना शरदरावांनी सोप्या भाषेत महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. स्वतःच्या चुका ठळकपणे सांगताना त्यांनी हातचा ठेवला नाही. या पुस्तकातला त्यांचा खरेपणा मनाला भावतो. संघर्ष काळातली प्रत्येक ठेच त्यांनी पुस्तकात मांडली आहे. 'द आंत्रप्रन्योर' हे पुस्तक ऍमेझॉन, फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध आहे, विकत घेऊन नक्की वाचा.

वक्ता तथा लेखक : प्रा. विशाल गरड
दिनांक : १ नोव्हेंबर २०२०

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...