Wednesday, December 30, 2020

मातीचे शत्रू

बूट आणि सूट मातीपेक्षा कसा काय बरं मोठा असू शकतो पण या असल्या मूर्ख मस्तवाल अधिकाऱ्यांसाठी तो तसा असेलही. जोपर्यंत हे असले कृषीशास्त्रज्ञ रेड कार्पेट टाकलेल्या  वातानुकूलित ऑफिस मध्ये बसून शोध लावत आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांची वाट लागणे स्वाभाविक आहे. जे शास्त्रज्ञ मातीची ऍलर्जी न ठेवता प्रामाणिक काम करतात त्यांचा सदैव अभिमानच राहील पण या असल्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा निषेधच.

अरे ये मातीची लाज वाटणाऱ्या साहेबांनो ! अरे तुम्ही अंगावर घातलेली कापडं ज्या सुतापासून तयार होतात तो कापूस याच मातीत उगवतो रे, तुम्ही जरी बुटाला घाण लागू नये म्हणून तिच्यावर तळवट अंथरला असेल तरी खरी घाण तर तुम्हीच आहात हे सिद्ध केलेत. अरे, तुमच्यासाठी ती फक्त चिखल होणारी 'माती' असेल पण आमच्यासाठी मात्र चिखल झालेल्या आयुष्यातून जगण्याचा कोंब उगवणारी ती 'माता' आहे.

अबे, आमच्या टॅक्स मधून तुम्हाला लाख दिड लाख पगार काय हे असले संशोधन करायला दिला जातोय काय ? अर तुमचे आईबाप याच चिखलात राबले असतील तेव्हा तुमचे शिक्षण पूर्ण झाले असावे. ही फक्त माती नाही तर माता आहे जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटून काम करत जा. मला मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार हे येडपाट अधिकारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शास्त्रज्ञ आहेत. कृषीमंत्री साहेब, घ्या जरा यांची एखादी बैठक आणि विचारा जाब मातीच्या अपमानाचा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३० डिसेंबर २०२०


Monday, December 28, 2020

दिशादर्शक दिग्दर्शक

लक्ष्यात राहतील अशा काही भेटी असतात, दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या निवासस्थानी झालेली आजची भेट त्यापैकीच एक. अक्षयला युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमीचा यंग सिनेमा अवॉर्ड मिळालाय. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या 'स्थलपुराण' या वैशिष्टयपूर्ण चित्रपटाची निवड करण्यात आली.

प्रचंड डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्रात चित्रपट तयार करून जर्मनीतले थेटर हाऊसफुल्ल करणारा. सिनेमाची पारंपारिक चौकट मोडून नव्या चौकटी उभारून त्याला वर्ल्ड सिनेमाची दरवाजे बसवणारा हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडीकर होय. जगावर आपल्या कलेची छाप सोडलेल्या अक्षयच्या हातचा स्पेशल चहा गळ्यात उतरवत उतरवत कानातून त्याने सांगितलेल्या चित्रपट क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टीही उतरवल्या.

जेव्हा केव्हा उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या आणि स्थलपुराण हे मराठी चित्रपट रिलिज होतील तेव्हा ते नक्की पाहा. अक्षयचा उधो उधो जागतिक दर्जाच्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये नेमका का होतो ? याची उत्तरे त्याने लिहून दिग्दर्शित केलेले हे सिनेमे पाहिले की लक्ष्यात येते. दोस्ता तु आजवर केलेले तीन आणि लिहिलेले तीन अशा एकूण सहा चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आता भेटत राहू पुन्हा पुन्हा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २८ डिसेंबर २०२०

Saturday, December 26, 2020

विरोध-बिनविरोध

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत कधी नाही तेवढी बिनविरोधची चर्चा होत आहे, गावोगावी मिटिंगा सुरू आहेत. गावपातळीवरच्या निवडणुका म्हणजे वैरत्व निर्माण होण्याच्या खानी असतात पण बिनविरोध निवडणुकीमुळे असे वैरत्व कमी होण्यास मदत होते. लहान गाव असेल तर दहा लाख, मोठे गाव असेल तर पंचवीस लाख असा एकंदरीत खर्च प्रत्येक पॅनलला करावा लागतो पण जर हाच पैसा निवडणुकांऐवजी गावातील विकास कामासाठी वापरला गेला तर नक्कीच गावचा विकास होण्यास मदत होईल यात दुमत नाही. पण,

ग्रामपंचायत अधिनियम माहित असलेला, सर्व योजनांची बऱ्यापैकी माहिती असलेला, गावासाठी वेळ देऊ शकणारा, उच्च शिक्षितच असावा असेही काही नाही पण किमान त्याला मराठी इंग्रजी वाचता व लिहिता यावे असा. धर्मनिरपेक्ष भावनेने काम करणारा, गावासाठी मुलभूत सुविधांसह शिक्षण आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देणारा. गावची पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करू शकणारा, तेवढ्यापुरते राजकारण आणि दिर्घकाळ समाजकारण करणारा उमेदवार असेल तरच बिनविरोध करा

आणि जर बिनविरोधच्या नावाखाली गावकऱ्यांना वेगवेगळी आमिष दाखवून सिमेंट काँक्रीट रोडमध्ये कमी सिमेंट वापरणारे, पदाचा वापर फक्त स्टार्चची कपडे घालून रुबाब मारायला करणारे, गावठाण जमीन जमीनदारांना वाटणारे, घरकुल मंजूर करून बंगला बांधणारे, ग्रामसेवकाला हाताशी धरून घफळा करणारे, फक्त ग्रामसभेदीवशीच ग्रामपंचायतीचे तोंड पाहणारे, गावातल्या युवकांचा वापर त्यांना दारू पाजून, पार्ट्या देऊन, गुटखा मावा खाऊ घालून स्वतःचा उधोउधो करून घेणारे उमेदवार लादले जाणार असतील तर त्याचा विरोध करा.

बिनविरोध निवडणूक लोकशाहीला जेवढी पूरक तेवढीच ती मारकही असते. निवडणुकीची ताकद फार मोठी असते, ती लढून जिंकण्यातही तितकीच मजा असते. बिनविरोध निवडणुकीमुळे गावातील तंटे कमी होतील, प्रशासनाचा खर्च वाचेल, भाव भावकितली खुन्नस कमी होईल पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गावातील दोन मुख्य विरोधक एकत्र येऊन संघंमताने विकासकामातून स्वतःचा विकास साधण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सरकारने ग्रामपंचायतीत सुद्धा विरोधी पक्षनेता हे पद निर्माण करायला हवे. निवडणूक बिनविरोध झाली तरी वाईट गोष्टींचा आपण विरोध करायलाच हवा कारण विरोधक नसला की लोकशाही लंगडी होते.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ डिसेंबर २०२०


Sunday, December 20, 2020

खंडोबाचा नंगर

खंडेनवमी दिवशी आमच्या श्रीराम पेठेत हनुमान मंदिरासमोर खंडोबाचा नंगर (लोखंडाची जाड साखळी) तोडला जातो, ही खूप जुनी परंपरा आजतागायत सुरू आहे. मी लहान असताना 'ढंगटाक ढढडांग ढंगटाक' असा आवाज आला की आम्ही घरातून धूम ठोकून थेट भराड्याच्या घरासमोर जायचो, ढोलाच्या निनादात वारू वाले हातातील वारू (घुंगरू लावलेला चाबूक) गोल फिरवून हातावर मारीत नृत्य करायचे, उजव्या हातात वारू घेऊन तो हात उंच पकडायचा आणि डाव्या हातात वारूचा शेंडा ताणून धरायचा मग 'ढंग टाक ढढडांग ढंगटाक' ह्या ठेक्यावर डोळे बंद करून वारूचे गुंगरू खळखळ वाजवायचे आणि पुढच्या क्षणातच तो वारू गोल फिरवून डाव्या हातावर जोरात मारायचा त्यानंतर येणारा 'फाट्ट़' हा आवाज ऐकून अंगावर काटा यायचा.

काहीजण हातात खंडोबाची उंच काठी पकडून आभाळाकडे पाहत ढोलक्याच्या ठेक्यावरच तोल सांभाळायचे. मग सर्व वारूवाले लोखंडाचा नंगर घट्ट बांधून त्यावर बसायचे, विठ्ठल भराडे उर्फ आबा कपाळावर हळदीचा भंडारा लावून तो नंगर हातात धरून तोडण्यासाठी सज्ज व्हायचे, उपस्थित सर्व भक्त 'येळकोट येळकोट घे' असा मोठा निनाद करायचे आणि त्याच त्वेषात आबा जोराचा हाबाडा देऊन नंगर तोडायचे. नंगर तुटला की ग्लानी येऊन पडायचे मग त्यांना पुन्हा भंडारा लावला जायचा, टॉवेल टोपी चढवली जायची आम्ही सर्वजण नंगराच्या पाया पडायचो. हा सगळा सोहळा बघण्यासाठी सर्व पेठकरी आणि गावातले लोक मोठी गर्दी करायचे.

आज आबा हयात नाहीत पण प्रत्येक खंडेनवमीला त्यांची आठवण येते. आता नंगर तोडायचा त्यांचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा मोहन भराडे उर्फ आप्पा पुढे चालवत आहेत. आजच्या दिवशी आमच्या गावातले भराडे कुटुंबीय मोठ्या भक्ती भावाने नंगरची पूजा करून हा खंडेनवमीचा उत्सव साजरा करतात. आमच्या पांगरीत पाहिले पाच ठिकाणी नंगर तोडला जायचा आता कालांतराने तीन ठिकाणी तोडला जातो. आधुनिक युगातही नंगर तोडण्याची परंपरा जपणारे मोहन भराडे, आप्पा पुकळे आणि हनुमंत गाढवे तसेच वारू खेळण्याची परंपरा जपलेले सुनील कदम, बबन घोडके, रामचंद्र घोडके , सदाशिव जगदाळे, खंडू जगदाळे, बाबा बाराते, मोहन बगाडे यांना सलाम.

आपल्या प्रत्येक सण आणि उत्सवामागे समाजाच्या हिताचे कारण असते शस्त्र असले की शास्त्र पण असतंच. खंडे नवमीला सुद्धा मराठा, ब्राम्हण, धनगर, वाणी, सुतार, मांग या सर्व जातीतील माणसं हा उत्सव साजरा करायला एकत्र येतात. आजच्या वर्गीकरणाच्या जमान्यात सर्व जातीपातीला पिवळ्या भांडाऱ्यात बांधून एकोप्याची भावना रुजवणारे असे उत्सव आणि परंपरा काळजीपूर्वक जोपासले जाणे काळाची गरज वाटते. आपल्या पुढच्या पिढीला अभिमानाने दाखवण्याची ही गोष्ट जपली गेल्याचे समाधान आहे.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २० डिसेंबर २०२०

Monday, December 14, 2020

बेताल वक्तव्याचा निषेध

तुमच्या बापाने जेव्हा तुमचे नाव प्रताप ठेवले असेल तेव्हा त्याला संदर्भ नक्कीच प्रतापगडाचा असेल. पण तुमच्या आडनावात 'नाईक' कसे आले हा संशोधनाचा भाग आहे. आता नुसती माफी मागून तोंडाची वाफ घालवू नका, गपगुमान सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर नाक घासा. अर्थात हे तुम्ही कराल का नाही याची शंका आहे, कारण तुमच्यासारख्यांना छत्रपती बद्दलचे प्रेम, आदर, जिव्हाळा हे फक्त निवडून येईपर्यंत महत्वाचे असते, नंतर करोडपतीचा अब्जोपती बनण्याचा धंदा सुरू असतो. तुम्ही किती टर्म निवडून आलात यापेक्षा तुम्ही काय कर्म केले हे जास्त महत्वाचे आहे.

जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तेव्हा राजाधिराज शिवछत्रपतींच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वराज्यासाठी बलिदान दिलेला प्रत्येक मावळा हा वेगळा नसून तो छत्रपतींच्या रक्ताचा थेंब आहे. तुमच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी जरा दुसरी उदाहरणे वापरात जावा आणि इतिहासातील उदाहरणे द्यायची असल्यास जरा अभ्यास करून देत जावा. आज तुमच्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि तो यासाठी महत्वाचा आहे; की उद्या दुसऱ्या कुणीतरी इतिहासातील अज्ञानामुळे असे बेताल वक्तव्य करू नये. बाकी नाईक या शब्दाचे जरी पाईक झालात तरी ती आमदारकी पेक्षा मोठी गोष्ट असेल.

वक्ता तथा लेखक :  विशाल गरड
दिनांक : १४ डिसेंबर २०२०


Wednesday, December 9, 2020

आशिया खंडातला 'अक्षय' दिग्दर्शक

आपल्या अक्षयने त्याच्या नावाप्रमाणे काम केलंय, उदाहरणार्थ नेमाडे आणि त्रिज्या या दर्जेदार कलाकृती नंतर त्याला 'स्थलपुराण' या चित्रपटासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम युवा दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला दिग्दर्शक आहे. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या 'स्थलपुराण' या चित्रपटाला 'यंग सिनेमा अवॉर्ड'  मिळालाय. युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमी यांच्याकडून हा पुरस्कार दिला गेलाय. 

मराठी चित्रपटाला हॉलीवूड टच देणारा दिग्दर्शक, सहज सोप्या गोष्टीचे कॅमेऱ्यातुन अद्भुत दर्शन घडवणारा दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडिकर होय. आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक गोष्ट हा एक चित्रपटच असतो फक्त त्या दिसलेल्या किंवा सुचलेल्या  गोष्टीला पुन्हा चित्रबद्ध करून दृकश्राव्य माध्यमाच्या अलंकारांनी मढवले की एक दर्जा कलाकृती निर्माण होते. आपल्या मराठी इंडस्ट्रीत अनेक दिग्दर्शक आहेत त्या प्रत्येकांनी त्यांची त्यांची टेस्ट जोपासली तसंच अक्षयने देखील त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळी टेस्ट चाखायला लावली.

अक्षयने वर्ल्ड सिनेमाचा खूप अभ्यास केलाय आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रपटांच्या प्रत्येक फ्रेम मधून उमटतो. कथा, पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संगीत या सर्व गोष्टीवर खूप बारीक लक्ष देऊन तो काम करत असतो. त्याचे चित्रपट डोळ्यांसोबत मनाला आनंद देणारे आणि  मेंदूला विचार करायला लावणारे असतात. जे सहज कुठे दिसत नाही ते दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याच्या फिल्ममेकिंगची ही युनिक फ्लेवर परदेशी ज्युरींना सुद्धा आवडला म्हणूनच सोलापूरसह भारताच्या शिरपेचात यंग सिनेमा अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराचा तुरा रोवला गेला.

प्रिय अक्षय, तुझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षाही जलद गतीने त्या डोक्यातल्या जबरदस्त कल्पना वाढत आहेत. दोन्ही असेच वाढू दे, भारी दिसतंय. आता ज्या चित्रपटाची वाट अख्ख जग पाहतंय त्या स्थलपुराणच्या प्रीमिअरची मी वाट पाहतोय. एक जागा ऍडव्हान्स बुक करून ठेव ही विनंती. बाकी 'इंडिकर' या नावातच 'इंडिया' आहे, तू आपल्या चित्रपट सृष्टीला जगात 'अक्षय' करशील याचा विश्वास आहे आणि फक्त सोलापूर, महाराष्ट्रच नाही तर आपल्या भारत देशाला अभिमान वाटेल असे काम करशील याची खात्री आहे. पुनश्च खूप खूप शुभेच्छा भावा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ९ डिसेंबर २०२०

Monday, December 7, 2020

Global Guruji

He proved that if our work is consistent & creative then whole world appreciate it. He proved that whether you teach in small village & in small school but If you do friendship with Digital gadget, Internet & English language then similarly you will teach thousands of student from more than 140 countries over the world. He proved that money is just an amount but when it share with right peoples at the right time then this amount is converted in to unforgettable history & also He proved that a real teacher works for outcome not for income. Global teacher award winner Mr.Ranjitsinh Disale got 7 Crore ₹ as a prize but  he decided to share 50 % amount with his another nominated teachers. Winning award is great thing but sharing huge amount for noble work is the greatest thing. Proud of you my friend Disale Guruji. Yes, you won the world.

Orator & Writer : Vishal Garad
Date : 7 December 2020

Friday, December 4, 2020

जग जिंकलेला गुरुजी

त्यांना सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले यापेक्षा कितीतरी अब्ज मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी मिळालेल्या बक्षिसातली अर्धी रक्कम सोबतच्या स्पर्धकांना दिली. ही माणसे अशीच जग जिंकत नाहीत त्याच्या मुळाशी माणुसकीचा झरा वाहत असतो. शिक्षणाची तहान भागवण्यासाठी रणजितसिंह डिसले गेली कित्येक वर्ष मेहनत घेत होते अखेर युनेस्कोचा ग्लोबल टिचर्स अवॉर्ड मिळाल्यामुळे हा आमच्या बार्शीचा सिंह जगाला दिसला. याच्या डरकाळीने जगभरासह अख्या भारताची शिक्षण व्यवस्था खडबडून जागी झाली. वाड्या वस्त्याच्या शाळेवर ज्ञानदान करता करता कल्पकतेच्या जोरावर जग जिंकता येते हे गुरुजींनी सिद्ध करून दाखवलंय. 

जगातल्या सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला माणूस आपला मित्र असावा, त्याला असे सहज भेटता यावे, मार्गदर्शन घेता यावे हा सुध्दा आपल्या माणूसपणाचा पुरस्कारंच आहे. प्रिय रणजितदादा आज तुम्ही गुरुजी, मास्तर, सर, अध्यापक, टिचर या शब्दांना सर्वोच्च सन्मान प्राप्त करून दिला. ही पृथ्वी तुम्हाला विसरणार नाही. तुमचे अभिनंदन करताना एक शिक्षक म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. पुरस्कार दरवर्षी कुणाला तरी मिळतो पण पुरस्काराची अर्धी रक्कम सहयोगी स्पर्धकांना देण्याची दानत फक्त एका रणजितसिंहातच असते. सर तुमच्या या दातृत्वाने तुम्ही पुरस्काराबरोबर प्रत्येकाच्या मनातला

"शिक्षक हा इन्कमसाठी नाही तर आऊटकम साठी काम करत असतो. मला पुरस्कार मिळाला म्हणून माझी तुलना इतर शिक्षकांशी केली जाऊ नये कारण प्रत्येक शिक्षक करत असलेले काम त्यांच्या त्यांच्या पातळीवर श्रेष्ठ आहे. जगभरातील इनोवेटीव्ही शिक्षकांना चालना देण्यासाठी यापुढे काम करायचे आहे. जगभरातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणूनच माझ्या पुरस्कारातली  रक्कम मी उरलेल्या नऊ स्पर्धकांना देऊ केली आहे." सरांशी गप्पा मारताना त्यांचे वैश्विक विचार ऐकून, एकदा जिंकलेले मन त्यांनी पुन्हा जिंकले.

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन विश्वातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव झाला. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम निवडीसाठी १० फायनालिस्ट निवडले गेले आणि त्यातून विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान मिळवलेले डिसले सर पाहिले भारतीय शिक्षक ठरलेत. अतिशयोक्ती नाही पण देशाचे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी आणि शिक्षण मंत्री म्हणून देशाला अशा टॅलेंट व्यक्तीची गरज आहे. अभिनंदन गुरुजी !

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ४ डिसेंबर २०२०

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...